Saturday, 1 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.04.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ एप्रिल २०१ दुपारी .००वा.

*****

देशाच्या अर्थव्यवस्थेत २०१७ या वर्षात सात पूर्णांक दोन टक्क्यांनी, तर २०१८ मध्ये सात पूर्णांक सात टक्क्यांनी वाढ होणं अपेक्षित असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ब्रिक्स राष्ट्रांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या वार्षिक बैठकीत बोलत होते. भारतात पायाभूत सुविधांमधल्या गुंतवणुकीसाठी दोनशे कोटी डॉलर्सच्या कर्जाची मागणी बँकेकडे केल्याचं ते म्हणाले.

****

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारु विक्री बंदीच्या गेल्या १५ डिसेंबरला दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं सुधारणा केली आहे. नवीन आदेशानुसार महामार्गालगत २२० मीटर अंतरावर दारु विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वीच्या आदेशात ५०० मीटर अंतरासाठी ही बंदी घालण्यात आली होती. मद्यपान करुन गाडी चालवण्यामुळे होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा आदेश दिल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

****

मोटार वाहन कायदा २०१६च्या सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या सुधारणेनुसार वाहन नोंदणी, तसंच वाहन चालविण्याचा परवाना आता आधारशी संलग्न करण्यात येणार आहे. अल्पवयीन चालकांनी केलेल्या अपघातासाठी पंचवीस हजार रुपये दंड, तसंच तीन वर्ष तुरुंगवास, तसंच वाहन नोंदणी रद्द करण्याची तरतूद या मसुद्यात आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत सादर झालेलं हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आलं होतं. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता हे विधेयक संसदेसमोर सादर केलं जाईल.

****

प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी सरकारने आजपासून आयटीआर-१ हा एक पानी अर्ज करदात्यांसाठी आणला आहे. आधीच्या आयटीआर-२ ए या सात पानी अर्जाऐवजी आता आयटीआर -१ हा एकच पानी अर्ज असेल. वेतन, घर आणि व्याज या माध्यमातून ५० लाखांपर्यंत उत्पन्न मिळणारे करदाते हा अर्ज भरू शकतील. दरम्यान, आजपासून ऑनलाईन प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करणे सुरू होत असून, त्यासोबत आधार क्रमांक देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

****

ऑनलाईन रेल्वे तिकिटांवर सेवा शुल्क न आकारण्याची मुदत रेल्वे विभागानं ३० जून पर्यंत वाढवली आहे. सरकारनं डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी ऑनलाईन तिकिटांवरील सेवा शुल्क ३१ मार्च पर्यंत आकारणार नसल्याचं जाहीर केलं होतं, मात्र ही मुदत आणखी वाढवण्यात आली आहे.

****

भारतीय रिझर्व्ह बँक स्वतंत्र सक्तवसुली विभाग सुरु करणार आहे. सोमवारपासून हा विभाग सुरु होणार असून, यात बँकेच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास चौकशी करण्यात येणार आहे, तसंच दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली.   

****

शिर्डी इथल्या श्री साईबाबा यांच्या महानिर्वाणास १८ ऑक्टोबर २०१८ रोजी शंभर वर्षे पूर्ण होआहे. त्यानिमित्त श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य शासन आणि संस्थानमार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध कामांसाठी सुमारे तीन हजार २३ कोटी १७ लाख रुपयांच्या कृती आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं मान्यता दिली. केंद्र शासनाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांनाही मान्यता देण्यात आली.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधिक्षक आदी वर्ग एक आणि वर्ग दोनच्या विविध पदांसाठी उद्या राज्यातल्या ३७ जिल्हा केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परिक्षा होणार आहे.

****

उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत आपल्या घरातील पाच वर्षाखालील बालकांना नजीकच्या आरोग्य केंद्रात पोलिओची लस द्यावी, असं आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

अंबाजोगाई इथले डॉ. आदित्य पतकराव यांच्या पुणे इथल्या “आदित्य डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर”ला युरोपियन मेडिकल असोसिएशनचा “जागतिक सॉक्रेटिस पुरस्कार” जाहीर झाला आहे. येत्या चार जुलैला स्वित्झर्लंड इथं हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.

****

आदिवासी शेतकऱ्यांनी आर्थिक फायदा आणि उत्पन्नातील सातत्य टिकवण्यासाठी विविध पिकांचं बीजोत्पादन करावं, असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी केलं आहे. नांदेड इथल्या कापूस संशोधन केंद्रामध्ये आदिवासी शेतकरी प्रशिक्षण आणि उपकरण वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. आदिवासी शेतकऱ्यांनी नैसर्गिक साधनांवर आधारित कृषी व्यवसाय सुरू करून कृषिपूरक जोडधंदे करण्यास पुढाकार घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. कार्यक्रमात नांदेड इथल्या आदिवासी शेतकऱ्यांना पीक संरक्षण उपकरणांचं वाटप करण्यात आलं.

//********//

No comments: