Thursday, 20 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.04.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरचे लाल दिवे काढून टाकण्याचा निर्णय,  तदानानंतर पडताळणी पावती देणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्रांच्या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

·      बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजु

·      जलयुक्त शिवार योजनेसह शेततळ्यांची कामं येत्या दोन महिन्याच्या निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      राज्य शासनाचे राजकपूर आणि चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार जाहीर

आणि

·      परभणीत ६५ तर लातूर महानगरपालिकेसाठी ६२ टक्के मतदान; उद्या मतमोजणी

****

देशातल्या, सर्व उच्चपदस्थ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरचे लाल दिवे काढून टाकण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या एक मे पासून केली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, यांनी ही माहिती दिली. यासाठी कायद्यात आवश्यक तरतूद करणार असल्याचं, गडकरी यांनी सांगितलं. अग्नीशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन, अशा, आणीबाणीच्या सेवा देणाऱ्या वाहनांवर मात्र निळा दिवा लावता येईल, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयांनंतर केंद्रातल्या तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी या निर्णयाचं स्वागत करत, आपल्या वाहनांवरचे लाल दिवे तत्काळ काढून टाकले.

****

तदानानंतर मतदारांना पडताळणी पावती देणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्रांच्या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगानं मंत्रिमंडळाकडे अशा यंत्रांच्या खरेदीचा प्रस्ताव दिला होता. अशा एकूण सोळा लाख पंधरा हजार यंत्रांच्या खरेदीसाठी निवडणूक आयोगाला तीन हजार १७४ कोटी रुपये निधी देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या इलेक्ट्रॉनिक यंत्रासोबत या यंत्रांचाही वापर केला जाईल. सध्या वापरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात मतदारांना मत पडताळणीची अशी व्यवस्था नसल्यानं, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केला जात असल्याचा आरोप काही राजकीय पक्षांकडून केला जातो आहे.

****

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवावा, अशी मागणी करणारी केंद्रीय अन्वेषण विभागाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल मंजूर केली. या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण डवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि अन्य भाजप नेत्यांवर आता गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून खटला चालवला जाईल. यासंदर्भातले दोन्ही खटले लखनऊमध्ये एकत्रितपणे चालवावेत आणि दोन वर्षांमध्ये सुनावणी पूर्ण करावी, असेही आदेश न्यायालयानं दिले आहेत. आरोपींमधले राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांच्याविरूद्ध ते राज्यपाल पदावर असेपर्यंत खटला चालवू नये, असं सर्वोच्च न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे.

****

जलयुक्त शिवार योजनेसह शेततळ्यांची कामं येत्या दोन महिन्यांच्या निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळं, आदी योजनांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जलयुक्त शिवार आणि शेततळं योजनेअंतर्गत कामं मंजूर करण्याची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावीत, तसंच येत्या दोन महिन्यांच्या काळात शेती तसंच शेतीपूरक कामांना प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली. प्रधानमंत्री आवास योजनेचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या.

****

राज्य शासनाचे, चित्रपट क्षेत्रासाठीचे जीवनगौरव तसंच विशेष योगदान पुरस्कार काल जाहीर झाले. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, यांना तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द अभिनेते अरुण नलावडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत ही घोषणा केली. पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप असून, विशेष योगदान पुरस्काराचं स्वरुप तीन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं आहे.

****

नदीपात्रातून वाळू उपसा करण्यावर राष्ट्रीय हरीत लवादानं बंदी घातली आहे. आतापर्यंत बेकायदा वाळू उपशा करणाऱ्या किती जणांना अटक केली, अशी विचारणा, राष्ट्रीय हरीत लावादाचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं राज्य सरकारला केली. बेकायदा वाळू उपशांशिवाय, पंपाचा वापर करून यांत्रिक पद्धतीनं वाळू उपसा करण्यासही लवादानं बंदी घातली आहे.

****

मराठवाड्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पाचपट दंड आकारण्याऐवजी, ही वाहनं जप्त करून त्यांचा फेर लिलाव करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम  भापकर यांनी काल दिले. मराठवाड्यात यंदा ३६२ वाळू पट्ट्यांचे लिलाव करण्यात आले. त्याची किंमत २११ कोटी रुपये इतकी आहे. मात्र आता पर्यंत केवळ ४० कोटी ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. चोरटी  वाहतूक करून वाळू उपसा केला जात असल्याचं लक्षात आल्यानं, विभागीय आयुक्तांनी  वाहनाच्या फेरलिलावाचा निर्णय घेतला.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

परभणी महानगरपालिकेसाठी ६५ टक्के तर लातूर महानगरपालिकेसाठी ६२ टक्के मतदान झालं. काही किरकोळ अपवाद वगळता, हे मतदान शांततेत पार पडलं. परभणी इथं बोगस मतदानावरून उमेदवारांमध्ये झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झाला, एका प्रभागात गोंधळ घालणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

लातूर इथं मात्र शांततेत मतदान झालं. वाढत्या उन्हामुळे मतदारांना मतदानासाठीचा वेळ एका तासानं वाढवून देण्यात आला होता. दोन्ही ठिकाणची मतमोजणी उद्या होणार आहे.

****

कोल्हापूर इथं काल झालेल्या, मराठा समाजाच्या महागोलमेज परिषदेत सकल मराठा समाजाची राज्य स्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजातल्या विविध प्रश्नांवर ही समन्वय समिती सरकार सोबत चर्चा करेल. २५ ते ३० समन्वयक या समितीत असतील. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करावी, यसह अन्य काही ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले.

****

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये जालना जिल्ह्यानं, २०१६-१७ या वर्षात उत्कृष्ट काम करुन, संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. उद्या  नवी दिल्लीतल्या  विज्ञान भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या, नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हे यावेळी पारितोषिक स्वीकारणार आहेत.

      जालना जिल्हयात  २०१६-१७ या वर्षात खरीपाच्या मोसमात ४ लाख ६९ हजार रुपये आणि रब्बी मध्ये, १ लाख २७  हजार शेतक-यांनी, ३९ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरुन पिक विमा योजनेत भाग घेतल्याचं, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, दशरथ तांभाळे यांनी सांगितलं.

****

टेम्पो चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करणं तसंच पुढील तपासात मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब पोलीस ठाण्यातल्या तीन पोलीसांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल गुन्हा नोंदवला. यापैकी अनिल सिरसाट आणि अमजद पठाण या २ पोलीस नाईकांना अटक करण्यात आली तर बाळू मेदने हा पोलीस नाईक फरार झाला आहे.

****

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, मका आणि गहु या शेतमालासाठी ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम तारण कर्ज म्हणून देण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. चालू हंगामात राज्यातल्या सर्व बाजार समित्यांनी याची अंमलबजावणी करण्याचं आवाहन मंडळानं केलं आहे.

****

पांगरमल दारु दुर्घटनेसारख्या घटना राज्यात कोठेही घडू नये, यासाठी राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामरक्षक दल स्थापण्यात येणार असून सर्वात प्रथम अहमदनगर जिल्ह्यात त्याची सुरुवात केली जाणार असल्याचं  ऊर्जा, तसंच राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

//*****//






No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...