आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२० एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
साखरेच्या किंमती नियंत्रणात रहाव्यात, आणि साठेबाजीवर नियंत्रण
ठेवण्यासाठी २७ ऑक्टोबर २०१६ रोजी घेतलेल्या निर्णयाला, केंद्रीय मंत्रीमंडळानं आणखी
सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. साखर कारखान्यांमधून निघणाऱ्या साखरेच्या विक्रीवर
आणि किरकोळ विक्रीवर अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्या मार्फत नियंत्रण ठेवलं जातं.
गेल्या वर्षी साखरेचं उत्पादन कमी झाल्यानं, साठेबाजी होऊ नये म्हणून, ही मुदतवाढ देण्यात
आली आहे.
****
भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणानं आधार कार्डाशी संलग्नित
सेवा देणाऱ्या आठ अवैध संकेतस्थळांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. नागरिकांनी
www.uidai.gov.in या प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच आधार कार्डशी संबधीत माहिती
घेऊनच व्यवहार करावेत, असं आवाहन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय
यांनी केलं आहे. असे अवैध व्यवहार करणाऱ्यांविरुद्ध तीन वर्ष तुरुंगवास आणि दहा लाख
रुपयांच्या दंडाची तरतूद या संबधीच्या कायद्यात आहे. आता पर्यंत देशात ११३ कोटी पेक्षा
जास्त नागरिकांना आधार क्रमांक देण्यात आले आहेत.
****
भारतीय क्रीडा प्राधिकरण - साईच्या काही केंद्रांची अवस्था
दयनीय असून, प्रशिक्षक आपली जबाबदारी प्रामाणिकपणे
पार पाडताना दिसत नसल्याबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तीव्र नापसंती
व्यक्त केली आहे. साई केंद्रांमधल्या सुविधा, तसंच प्रशिक्षकांच्या कामगिरीबद्दलचा
अहवाल त्यांनी मागविला आहे. अत्याधुनिक तंत्राचा वापर करत, किती खेळाडू घडवले हे पाहिल्यानंतरच
यापुढे प्रशिक्षकांच्या वेतनात वाढ केली जाईल, याशिवाय प्रशिक्षक स्वत: किती तंदुरूस्त
आहेत यावर भर दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
सीमेवर तैनात जवानांना मिळणाऱ्या आहाराच्या दर्जाबद्दल सामाजिक
संपर्क माध्यमातून प्रश्न उपस्थित करणारा जवान तेज बहादूर यादव यांना सीमा सुरक्षा
दलातून बडतर्फ करण्यात आलं आहे. यासंदर्भात झालेल्या चौकशीत भोजनाच्या दर्जाबाबत यादव
यांनी लावलेले आरोप, खोटे असल्याचं सिद्ध झालं.
//****//
No comments:
Post a Comment