Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 April 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.
*****
दहशतवादी
कट रचण्याच्या आरोपाखाली इसिसच्या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. मुंबई, जालंधर, नारकटियागंज, मुजफ्फराबाद आणि बिजनोर इथं
आज सकाळपासून राबवण्यात आलेल्या कारवाईनंतर या तिघांना मुंबई, जालंधर आणि बिजनौर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी सहा जणांची चौकशी सुरू असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक, आंध्र
प्रदेश पोलिसांचं गुप्तहेर पथक, उत्तर प्रदेश तसंच महाराष्ट्राचं दहशतवादविरोधी पथक
आणि पंजाब तसंच बिहार पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या दहशतवाद्यांना अटक केली आहे.
****
शेतकऱ्यांना
कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी काढलेल्या आसूड
यात्रेला आज नंदूरबार जिल्ह्यात नवापूर इथल्या पथकर नाक्यावर रोखण्यात आलं. ही यात्रा गुजरातमध्ये प्रवेश करणार होती. गुजरात सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात
आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या
मालाला हमीभाव मिळावा यासह इतर मागण्या या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
****
राज्यातल्या
पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या तीन महानगरपालिकांसाठी येत्या २४ मे रोजी मतदान
होणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. संबंधित महानगर पालिका क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाल्याचंही
सहारिया यांनी सांगितलं.
दरम्यान परभणी, लातूर आणि चंद्रपूर महापालिकांसाठीची मतमोजणी उद्या होणार आहे.
मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली असून, या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
****
उन्हाळी सुटीत महाराष्ट्रातल्या विविध शहरातून उत्तर भारतात
जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात अशी मागणी मुंबई भाजपच्या नेत्यांनी रेल्वेमंत्री
सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. प्रभू यांच्या कालच्या मुंबई दौऱ्यात या मागणीचं
निवेदन त्यांना सादर करण्यात आलं. वाराणसी, लखनौसह इतर शहरांसाठी सुटीच्या काळात अनारक्षित
रेल्वे गाड्या चालवाव्यात असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
संरक्षण
सेवेत ३० डिसेंबर १९९१ ते २९ नोव्हेंबर १९९९ या काळात कार्यरत असलेल्या तसंच निधन
झालेल्या अथवा काही कारणानं सेवेतून बाहेर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या
संचित रजेचा मोबदला देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं
मंजुरी दिली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ १५ वर्षांपेक्षाही कमी आहे अशा कर्मचाऱ्यांनाही
या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
****
आर्ट
ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातल्या
मुळा, मुठा,
रामनदी, पवना, इंद्रायणी, कृष्णा आणि गोदावरी या सात नद्यांच्या शुद्धीकरणासाठी “जीवन
सरिता अभियान” हाती घेण्यात आलं आहे. या अभियानाचा प्रारंभ केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री
प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल पुण्यात झाला. जल सुरक्षा हे सर्वांचं आद्य कर्तव्य
असून पाणी हेच जीवन आहे त्यामुळे ते शुद्ध ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं
आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी
म्हटलं आहे.
****
आकाशवाणीवर नवीन
कल्पनांवर आधारित श्रोत्यांना पसंत पडतील असे दर्जेदार कार्यक्रम तयार करावेत अशी
सूचना आकाशवाणीच्या पश्चिम विभागाचे महानिदेशक
एम एस थॉमस यांनी केली आहे. आकाशवाणी
पुणे केंद्राच्या वतीनं आयोजित प्रादेशिक कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीचं
उद्घाटन आज थॉमस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. आकाशवाणीच्या राज्यातल्या
तसंच गोव्यातल्या केंद्रांचे कार्यक्रम अधिकारी या दोन-दिवसीय बैठकीला
उपस्थित आहेत.
****
येत्या सात मे रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सी बी एस ई कडून घेण्यात येणाऱ्या, राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एनईईटी साठी
नांदेड केंद्रांतर्गत ३५ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षेच्या
पूर्व तयारीबाबत काल नांदेड इथं
झालेल्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी जयराज
कारभारी यांनी, या परीक्षेबाबत काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
यांच्यात ‘बिग थ्री’ या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादामुळे भारत चॅम्पियन्स करंडक
स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘परिषद’मधील ‘बिग थ्री’अंतर्गत
भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन क्रिकेट मंडळांना एकूण निधीपैकी जास्त निधी आणि
ज्यादा अधिकार आहेत. मात्र, परिषदेच्या नव्या संविधान नियमावलीनुसार ‘बिग थ्री’ ही
संकल्पना रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा १ जूनपासून सुरू होणार
असून भारताची सलामीची लढत पाकिस्तानशी ४ जूनला होणार आहे.
//*******//
No comments:
Post a Comment