Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date- 21
May 2017
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २१
मे २०१७ सकाळी ६.५०
****
· वस्तू
आणि सेवाकरांशी संबधित दोन विधेयकांना विधानसभेची मंजुरी
· इलेक्ट्रॉनिक
मतदान यंत्रं पूर्णपणे सुरक्षित असल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा दावा
· उत्तराखंडमध्ये
भूस्खलनात अडकलेले महाराष्ट्रातले एकशे एकोणएंशी प्रवासी सुखरुप- मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
आणि
· चला गावाला जाऊ,
ध्यास विकासाचा घेऊ, अभियानाचा शुभारंभ
****
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर आणि
स्थानिक प्राधिकरण भरपाई विधेयक अशी
दोन विधेयकं काल विधानसभेत चर्चेअंती एकमतानं
मंजूर करण्यात आली. वस्तू आणि सेवा कर - जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी राज्य
विधीमंडळाचं विशेष अधिवेशन कालपासून मुंबई इथं सुरू झालं. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक, स्थानिक प्राधिकरण भरपाई विधेयक, कर विषयक
कायदे सुधारणा विधेयक, ही तीन विधेयकं काल विधानसभेत मांडली.
वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यामुळे
स्थानिक संस्था कर, जकात कर रद्द होणार असून, त्यामुळे सामान्य जनतेला कमी कर भरावा
लागणार असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. या कायद्यामुळे राज्यातल्या
२७ महानगर पालिकांना कायद्याचं आर्थिक कवच लाभणार असून, ही देय रक्कम महापालिकांना
दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
लोकप्रतिनिधी आणि जनतेला वस्तू आणि
सेवा कर - जीएसटी कायद्याचं प्रशिक्षण आवश्यक असल्यामुळे याची अंमलबजावणी दोन महिने
उशीरा करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दरम्यान, या अधिवेशनात शेतकरी कर्ज
माफीचीही घोषणा करण्याची मागणी विरोधकांनी यावेळी लावून धरली.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं - ईव्हीएम
आणि मतदान पडताळणी पावती यंत्रे - व्हीव्हीपॅट पूर्णपणे सुरक्षित असल्याचं केंद्रीय
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी स्पष्ट केलं आहे. नवी दिल्ली इथं काल ईव्हीएम
आणि व्हीव्हीपॅट यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार होऊ शकतो, हा राजकीय पक्षांनी केलेला आरोप त्यांनी यावेळी
फेटाळून लावला. या यंत्रात फेरफार केल्यास ते निष्क्रीय होतं, असा खुलासा झैदी यांनी
केला. आगामी सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसह मतदान पडताळणी पावती
यंत्रे वापरण्यात येणार असून, त्यामुळे मतदान प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी,
२१ मे हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. आज पाळल्या जात
असलेल्या या दिनानिमित्त काल राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात दहशतवाद आणि हिंसाचार
विरोधी शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करुन आदरांजली वाहिली. औरंगाबाद, बीड सह मराठवाड्यात सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयातही
राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण करुन दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात
आली.
****
येत्या एक जुलै रोजी ‘राज्य मतदार दिवस’
साजरा करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी जे एस सहारिया यांनी काल ही माहिती
दिली. मतदारांना लोकशाहीचं महत्व पटवून जागृत करण्यासाठी तसंच मतदान प्रक्रियेत सहभाग
वाढवण्यासाठी ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या धर्तीवर हा दिवस साजरा केला जाणार आहे. या
अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला जाणार आहे.
****
उत्तराखंडमध्ये बद्रीनाथजवळ झालेल्या
भुस्खलनात अडकलेले महाराष्ट्रातले एकशे एकोणएंशी प्रवासी सुखरुप असून, त्यांना रेल्वेनं
परत पाठवण्याची व्यवस्था केली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत
सांगितलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. आमदार सतीश
चव्हाण यांनीही काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या भाविकांना सहकार्य करण्यासंदर्भात
निवेदन दिलं.
औरंगाबादसह लातूर आणि बीड जिल्ह्यातले भाविकही या भागात अडकून
पडले असून, ते सर्व सुखरुप असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं
आहे. लातूरच्या काही भाविकांशी संपर्क झाला असल्याचं लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत
यांनी सांगितलं.
दरम्यान, या भाविकांना टप्प्याटप्प्यानं आपापल्या गावी
सुरक्षितपणे हलवण्याची प्रक्रिया काल सुरु झाली असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.
****
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी, शालेय
शिक्षण विभागामार्फत एक समिती गठीत करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांच्या
अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली ही समिती, अशा
प्रकारांना आळा घालण्यासाठीच्या उपाययोजना तसंच असे गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक
नियमांचा सविस्तर अभ्यास करुन, याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करेल.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
चला गावाला जाऊ, ध्यास विकासाचा घेऊ,
या अभियानाला काल विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी शुभारंभ केला. येत्या
२९ तारखेपर्यंत चालणाऱ्या या अभियानात, महसूल खातं तसंच इतर संबंधित खात्यांचे अधिकारी
कर्मचारी आपापल्या गावात जाऊन ग्रामपंचायतींना भेट देणार आहेत. यावेळी ते गावातल्या
नागरिकांना शासकीय उपक्रम, ग्रामीण भागांसाठी असलेल्या योजना यांची माहिती देतील. विभागीय
आयुक्त कार्यालयातले जवळपास ८० टक्के कर्मचारी मराठवाड्याचे भूमिपुत्र असून, या अभियानाच्या
माध्यमातून शासकीय सुविधांची माहिती जनतेपर्यंत पोहोचेल असं भापकर या अभियानासंदर्भात
काल औरंगाबाद इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत म्हणाले.
****
शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांचं
संपूर्ण पुनर्वसन करण्याच्या उद्देशानं खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठवाड्यातल्या
आठ जिल्ह्यांमध्ये ‘उमेद’ या सहायता उपक्रमाची सुरुवात केली आहे. याअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या
पंचवीस आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांना उद्या व्यवसायाच्या विविध साधनांचं वाटप
करण्यात येणार आहे. यशस्विनी सामाजिक अभियान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या
माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. समुपदेशन, प्रशिक्षण, आणि प्रत्यक्ष
मदत या त्रिसुत्रीच्या आधारे सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातल्या दोनशे विधवा महिलांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक
जिल्ह्यातल्या २५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या विधवा महिला या उपक्रमात सहभागी
होणार आहेत.
****
औरंगाबाद विभागात गेल्या पाच महिन्यात
३१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, यापैकी १९७ प्रकरणं शासकीय मदतीस पात्र ठरली
आहेत. या कुटुंबांना एकूण एक कोटी ४८ लाख रूपये मदत देण्यात आली आहे. ४० प्रकरणं मदतीस
अपात्र ठरली असून, एकोणएंशी प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचं, सांगण्यात आलं आहे.
****
मुंबई पोलिस भरती परीक्षेत बनावट उमेदवार
बसवणाऱ्या मुख्य गुन्हेगाराला जालना पोलिसांनी काल औरंगाबाद इथून अटक केली. मदन गंगाराम
राजपुत असं त्याचं नाव असून, त्याला काल मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.
****
सांसद आदर्श ग्राम आणि आमदार आदर्श
ग्राम योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या गावांना भेटी देवून विकास कामांचा आढावा घेण्याचे
निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. या योजनांच्या प्रगतीचा
आढावा घेण्यासाठी काल नांदेड इथं घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. विकास कार्यात
लोकसहभाग वाढवण्यासाठी ग्राम विकासाच्या आराखड्यात समाविष्ट कामं आणि योजनांची माहिती
जनतेला संवादाच्या माध्यमातून देण्याच्या सूचना डोंगरे यांनी यावेळी केल्या.
****
वीज महावितरणतर्फे औरंगाबाद शहरात वीज
चोरी विरोधात एक विशेष मोहिम राबवली जात आहे, या मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षभरात वीज
चोरीची दोन हजार ६४ प्रकरणं उघडकीस आली असून, याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले असल्याची
माहिती महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील जाधव यांनी वार्ताहरांना दिली. ही
मोहिम यापुढेही सुरू राहील असं सांगून, ग्राहकांनी वीज चोरी करू नये असं आवाहन जाधव
यांनी केलं आहे.
****
शालेय विद्यार्थ्यांना
ऐतिहासिक, भौगोलिक तसंच सांस्कृतिक बाबींचं ज्ञान मिळावं यासाठी त्यांच्या शैक्षणिक
सहली काढाव्यात असा आदेश शालेय शिक्षण विभागानं राज्यतल्या सर्व शाळांना जारी केला
आहे.
//*******//
No comments:
Post a Comment