Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 November
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ नोव्हेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानं
खरेदी करण्याच्या व्यवहाराबाबत न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा, अशी मागणी करणाऱ्या
याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई,
न्यायमूर्ती एस.के कौल आणि के.एम.जोसेफ यांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. विधीज्ञ
मनोहरलाल शर्मा, विनित ढांडा आणि आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी स्वतंत्रपणे,
तर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि विधीज्ञ प्रशांत भूषण या तिघांनी
एकत्रितपणे याबाबत याचिका दाखल केल्या आहेत. सरकार गोपनीयतेच्या मुद्द्याआड लपत राफेल
विमानांची किंमत सांगत नसल्याचा आरोप करत, या मुद्द्याची माहिती सादर करण्याच्या विधीज्ञ प्रशांत भूषण यांच्या मागणीला महान्यायवादी
के. के. वेणुगोपाल यांनी विरोध केला.
****
केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे
संसदीय कामकाज मंत्रालयाचा भार सोपवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या
निधनामुळे हे पद रिक्त झालं होतं.
****
सगळ्या वयोगटाच्या महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेश
देण्याबाबतच्या आपल्या अट्ठावीस सप्टेंबरच्या निर्णयाला स्थगिती देण्यास आज सर्वोच्च
न्यायालयानं नकार दिला. याबाबतची याचिका दाखल करणाऱ्या विधीज्ञांना न्यायालयानं येत्या
बावीस जानेवारीपर्यंत प्रतिक्षा करण्यास सांगितलं. या तारखेला यासंदर्भातल्या पुनर्विचार
याचिकांची घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे.
****
देशाचे पहिले पंतप्रधान
पंडीत जवाहरलाल नेहरुं यांची जयंती आज बालदिन म्हणून साजरी केली जात आहे. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद, उप राष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
जवाहरलाल नेहरू यांच्या एकशे एकोणतिसाव्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि वरिष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, यांनी नेहरू
यांच्या शांतीवन या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. संसदेच्या मध्यवर्ती
सभागृहात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही संसद सदस्यांसह पंडित नेहरू यांना
आदरांजली वाहिली.
****
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमधील पोर्ट ब्लेयर
इथं तिरंगा फडकवण्याच्या पंचाहत्तराव्या वर्धापनदिनी पंचाहत्तर रुपयांचं नाणं जारी
करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. अर्थमंत्रालयानं याबाबतची सूचना जारी केली
आहे. या नाण्यावर, कारागृहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ध्वजाला वंदन करत असलेलं नेताजी
सुभाषचंद्र बोस यांचं चित्र असेल.
****
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नीतिन
गडकरी उद्या मुंबईत एका वाहन फेरीद्वारे पथकर वसुली आणि हस्तांतर प्रणालीच्या माध्यमातून,
पाचशे शहाऐंशी किलोमीटर राज्यमार्ग प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी गुंतवणूकदारांना
आकर्षित करणार आहेत. राज्यमार्गाचा हा दुसरा
टप्पा राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये पूर्ण झाला असून, यातल्या चार
राज्यमार्गांवरच्या प्रस्तावित बारा पथकर केंद्रांसाठी ही गुंतवणूक अपेक्षित आहे.
****
कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर केल्यानं सर्व नागरिकांना आरोग्य सेवा मिळणं सोपं होईल आणि आरोग्यसेवांचा दर्जा
उंचावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारनं
नीती आयोग आणि विश, अर्थात वधवानी कृत्रिम बुद्धिमत्ता संस्थेबरोबर आरोग्यक्षेत्रात
सहकार्य वाढवण्यासाठीच्या इरादापत्रावर काल स्वाक्षरी केली, त्यावेळी ते बोलत होते.
यानुसार आता कर्करोग आणि क्षयरोग यासारख्या रोगांच्या निदान आणि उपचारांसाठी तसंच संशोधनासाठी
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना केली जाणार आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात वडगाव खंडोपंत
इथे एक शेतकरी बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. काल सकाळी
सहा वाजता शेतात जात असताना बिबट्यानं हा हल्ला केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेत पी. वी. सिंधू आणि समीर वर्मा उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल
झाले आहेत. कोवलूनमध्ये आयोजित स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात सिंधूनं थायलंडच्या नीटचाओन जिंदापोलचा २१-१५, १३-२१ आणि २१-१७ असा
पराभव केला.
*****
***
No comments:
Post a Comment