Sunday, 25 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.11.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 November 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 भारताचा मूळ प्राण राजकारण नसून, समाजकारण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते. या मालिकेचा आज ५०वा भाग प्रसारित झाला. राजकारणंच महत्वाचं झालं, तर ते समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं चांगलं लक्षण असणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.



 रेडिओ हे माध्यम नागरिकांच्या मनामध्ये रूजलं असून, या माध्यमाची खूप मोठी ताकद असल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यामुळेच देशाचा प्रधान-सेवकम्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर, देशाच्या अगदी दुर्गम भागामध्ये, टोकाच्या गावापासून ते मेट्रो शहरांपर्यंत, शेतकरी बांधवांपासून ते युवा व्यावसायिकापर्यंत पोहोचण्यासाठी, रेडिओ हे माध्यम निवडलं असल्याचं त्यांनी सांगितलं.



 मन की बात’ या कार्यक्रमाविषयी केलेल्या सर्वेक्षणामधून सरासरी ७० टक्के लोक नियमितपणे मन की बातऐकतात, असं दिसून आलं, समाजामध्ये सकारात्मक भावना वाढीस लावण्यामध्ये मन की बातचं मोठं योगदान असल्याचं ते म्हणाले. आकाशवाणी, एफ.एम. रेडिओ, दूरदर्शन, इतर दूरचित्रवाणी वाहिन्या, समाज माध्यमांसह या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या सहकाऱ्यांचेही पंतप्रधानांनी आभार मानले.



 संविधान दिन उद्या साजरा होणार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, ‘घटना समितीम्हणजे आपल्या देशातल्या महान प्रतिभावंत व्यक्तींचा एक संगम होता, असं नमूद केलं. या घटना समितीच्या केंद्रस्थानी राहिलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा येत्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस आहे, त्यानिमित्त पंतप्रधानांनी डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन केलं. २०१९ मध्ये श्री गुरु नानक यांच्या पाचशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त प्रकाश पर्व साजरा करण्याचे निर्देश सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्याचं ते म्हणाले. २०२० मध्ये एक स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून आपण ७० वर्ष पूर्ण करणार आहोत, आणि २०२२ मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. 

****



 प्रसार भारतीला आज २१ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोक प्रसारकाच्या रुपात प्रसार भारती खूप मोठी जबाबदारी पार पाडत असल्याचं ते म्हणाले.

****



 राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या कराड इथल्या चव्हाण यांच्या प्रितीसंगम समाधी स्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाणांचा मोठा वाटा असून, राज्याच्या प्रगतीकरता त्यांनी पाया रचला, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****



 राम मंदिराचा मुद्दा हा नवीन नसल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अयोध्येला गेल्यामुळे त्यांना राजकीय फायदा होणार नाही, आणि भारतीय जनता पक्षाला तोटाही होणार नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी ते आज लातूर इथं आले असता वार्ताहरांशी बोलत होते. हिन्दुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये, म्हणून शिवसेनेनं युती करावी अशी भाजपाची भुमिका असल्याचं ते म्हणाले. सध्या जाती पातीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाला महत्व आलं असून, जनतेला भाजपा विषयी विश्वास वाटतो, असंही दानवे यांनी नमूद केलं. 

****



 दरम्यान, सध्याच्या सरकारकडून जर राम मंदिर उभारण्यात येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अयोध्येत आज राम जन्मभूमीवर जाऊन भगवान रामाचं दर्शन घेतल्यानंतर ते वार्ताहारंशी बोलत होते. राम मंदिरासाठी अध्यादेश आणा, कायदा करा, शिवसेना पाठिंबा देईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. 

****



 जम्मू-कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बाटगूंड गावामधे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत सहा अज्ञात दहशतवादी मारले गेले. या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं मध्यरात्री शोधमोहिम सुरु केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. ही चकमक आता संपली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 ऑस्ट्रेलियात कॅनबेरा इथं झालेल्या वरिष्ठ गट राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारताच्या भवानी देवीनं सुवर्ण पदक पटकावलं. तिनं इंग्लंडच्या एमिली रॉक्सचा १५ - १२ अशा गुण फरकानं पराभव केला.

****



 उत्तर प्रदेशात लखनौ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या समीर वर्मा आणि सायना नेहवालसह, पुरुष आणि महिला दुहेरीत भारतीय जोड्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

*****

***

No comments: