Thursday, 22 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.11.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22  November 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ नोव्हेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø मराठा आरक्षणासंदर्भातला मागसवर्गीय आयोगाचा अहवाल विधीमंडळाच्या पटलावर मांडण्याची प्रक्रिया सुरू

Ø मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विस्तार; पालघर आणि रायगड जिल्ह्यातला उर्वरीत भागाचा समावेश

Ø पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ना.वि देशपांडे यांना प्रदान

आणि

Ø तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर चार धावांनी मात

****



 राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भातला मागसवर्गीय आयोगाचा अहवाल विधीमंडळाच्या पटलावर मांडण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अभिनंदन वग्यानी यांनी काल मुंबई उच्च न्यायालयात दिली. औरंगाबादचे मराठा समाजाचे कार्यकर्ते विनोद पाटील यांच्यासह इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकारच्यावतीनं ही माहिती देण्यात आली.  विधीमंडळात आ अहवाल मांडल्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं वग्यानी यांनी न्यायालयाला सांगितलं. न्यायालयानं यापूर्वी दिलेल्या निर्णयानुसार आयोग अणि सरकारनं कारवाई केली असल्यामुळे प्रलंबित याचिकांवर आणखी सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचं सांगत न्यायालयानं मराठा समाजाच्यावतीनं दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका काल निकाली काढल्या. 

****



 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विस्तार करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या पालघर तालुका, वसई तालुक्यातला उर्वरित भाग आणि रायगड जिल्ह्यातला अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांचा उर्वरित भाग प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बृहन्मुंबई आणि परिसराचा सुयोग्य आणि नियोजित पद्धतीनं विकास व्हावा, यासाठी हा परीसर प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. प्राधिकरणाचं क्षेत्र आता ४ हजार २५४ चौरस किलोमीटरवरून ६ हजार २७२ चौरस किलोमीटर इतके झाले आहे. याच बैठकीत मुंबई आणि परिसरासाठी १८ हजार कोटी रुपये खर्चाच्या तीन मेट्रो मर्गांच्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली.

****



 अणुऊर्जा प्रकल्पांना आवश्यक विविध उपकरणं आणि सामग्रीचा पुरवठा करणाऱ्या जगप्रसिद्ध होलटेक इंटरनॅशनल या कंपनीनं राज्यात अणुऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारी उच्च दर्जाची सामग्री उत्पादित करणारा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी काल या कंपनीनं राज्य सरकारसमवेत सामंजस्य करार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थ‍िती या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. जवळपास चार हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पामध्ये होणं अपेक्षित आहे.

****



 आदिवासींसाठी वन हक्क कायदा लागू करणं तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी आणि शेतकऱ्यांचा मोर्चा काल सकाळी ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं निघाला. मॅगेसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चात ठाणे आणि भुसावळ इथले आदिवासी आणि मराठवाड्यातले शेतकरी सहभागी झाले आहेत. लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा आज विधानभवनावर पोहोचण्याची शक्यता आहे.

****



 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ स्मृती पुरस्कार काल औरंगाबाद इथं ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ना.वि देशपांडे यांना समर्थ अभ्यासक डॉ. राम साठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साठे यांनी यावेळी केलेल्या भाषणात ना.वि. देशपांडे यांनी उत्तम ग्रंथालयाची निर्मिती करत मराठवाडा सुसंस्कृत घडवण्याचं कार्य केलं, असे गौरवोद्गार काढले. देशपांडे यांच्या आयुष्यावर लिखीत 'संस्कृती उपासक आणि संवर्धक' या गौरव ग्रंथाचं संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांच्या हस्ते प्रकाशन झालं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला कालचा पहिला सामना ऑस्ट्रेलियानं चार धावांनी जिंकला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला पाचारण केलं. ऑस्ट्रेलियानं १७ षटकांत चार बाद १५८ धावा केल्या होत्या. मात्र पावसाचा व्यत्यय आल्यानं भारताला विजयासाठी डकवर्थ लुईस नियमानुसार १७ षटकांत १७४ धावा करण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. निर्धारित भारत १७ षटकांत सात बाद १६९ धावांच करू शकला. मालिकेतला दुसरा सामना उद्या मेलबर्न इथं होणार आहे.

****



 पालघर जिल्ह्यातल्या केळवे मांगेला वाडी इथल्या माधुरी कैलास पाटील यांनी दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन  केलं. “माझी कन्या भाग्यश्री” योजनेअंतर्गत त्यांना २५ हजार रुपयांचा डिमांड ड्रॉफ्ट सरकारकडून मिळाल्याच्या त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या……



माझी कन्या भाग्यश्री कन्या बाईंनी सांगितले हे हे फार्म भरायचे आहेत. मग मी ते फार्म आणून भरले आणि बाईंनी ते पूढे पाठविले. मग पूढे आम्हाला पालघरला आमच्या मुलींना २५ हजार रूपयांची एफडी मिळाली. हे आमचं खूपचं भाग्य आहे. की, आमच्या मुलीसाठी एवढ आम्हाला योजना करून मिळाली.

****



 नाशिक जिल्ह्यात येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातल्या सहा जणांचा मृत्यू झाला. कार आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. काल पहाटे अंकाई बारी जवळ ही दुर्घटना घडली. मृत्युमुखी पडलेले सर्व जण अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथले रहिवासी होते.

****



 कर्नाटकात विजापूर जिल्ह्यात झालेल्या अन्य एका रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये लातूर इथल्या तिघांचा तर नांदेड इथल्या एकाचा समावेश आहे. पुण्याहून विजापूरकडे जाणाऱ्या जीपला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला.

****



 लातूर तालुक्यात चिकलठाणा-भातखेडा मार्गावर मांजरा नदीवरच्या मोठ्या पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी शासनानं सुधारीत अंदाजपत्रकाव्दारे पाच कोटी रुपय निधी मंजूर केला आहे. तालुक्यातून जाणाऱ्या कोळपा-कासारखेडा-कारेपूर तसंच रेणापूर तालुक्यात धानोरा-अरजखेडा या दोन्ही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये, सा एकूण नऊ कोटी रुपय निधी सार्वजनिक बांधकाम विभागानं नुकताच मंजूर केला आहे.

****



लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी जिल्ह्यातल्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामध्ये जिल्हा रुग्णालय, जिल्हा न्यायालयाचं विस्तारीकरण तसंच औद्योगिक वसाहतीचं तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचं विस्तारीकरण या प्रमुख मागण्या आहेत. विधीमंडळ अधिवेशनानंतर जिल्ह्यातल्या सर्व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्य केलं

****



 औरंगाबाद इंथल्या  जैन अतिशय क्षेत्र कचनेरजी इथं उद्यापासून तीन दिवस वार्षिक यात्रा महोत्सव होणार आहे. यादरम्यान विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक समितीनं दिली आहे.

*****

***

No comments: