Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
§
मराठा
आरक्षण विषयक विधेयक येत्या गुरूवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्याची मुख्यमंत्र्यांची
घोषणा
§
विद्यार्थ्यांच्या
दप्तराचं वजन कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना
§ गोवर आणि रुबेला आजारांच्या समूळ उच्चाटनासाठी आजपासून
राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम
आणि
§
साखर
कारखान्यांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचे हितसंबंध असल्यामुळे उस उत्पादकांना लुटण्याबाबत
सर्वांचं एकमत असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप
****
मराठा आरक्षण विषयक विधेयक येत्या गुरूवारी विधीमंडळाच्या
दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल, अस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं.
मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही शिफारसी समितीनं स्वीकारल्या असून आयोगाच्या अहवालावरचा
कृती अहवालही सभागृहात सादर केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. या विधेयकातल्या त्रुटींवर
त्याच दिवशी चर्चा होईल, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देणं
शक्य नसल्याचं महसूल मंत्री पाटील यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं. आंध्र प्रदेश आणि
केरळ राज्यानं अशाप्रकारे दिलेलं आश्वासन न्यायालयात टिकलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.
****
विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची
सुरूवात काल गदारोळानं झाली. विधानसभेत मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा
मुद्दा विरोधकांनी लावून धरला. गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज
दहा मिनिटांसाठी स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा लावून
धरत विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या गोंधळातच पाच विधेयकं
मंजूर झाली. त्यानंतर अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. याच मागणीसाठी विधानपरिषदेतही
काल विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे कामकाज वारंवार थांबवावं लागून शेवटी
दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं.
****
विधानसभेत
काल महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियमन सुधारणा विधेयक
२०११ मंजूर करण्यात आलं. शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार पालकांनी
मासिक, द्वैमासिक, किंवा त्रैमासिक पद्धतीनं शुल्क भरण्याची तरतूद या विधेयकात करण्यात
आली आहे. सहामाही किंवा वार्षिक पद्धतीनं शुल्क भरू इच्छिणाऱ्या पालकांना शुल्कामध्ये
सवलत दिली जाऊ शकते तर विलंबानं शुल्क भरल्यास दंड आकारला जाण्याची तरतूद या विधेयकात
करण्यात आली आहे. दंडाचा दर ठरवण्याचा निर्णय सरकार घेईल. कार्यकारी समिती किंवा विभागीय
शुल्क नियमन समितीच्या मान्यतेनुसार दोन वर्षानंतर शुल्कात वाढ करण्याची तरतूद या विधेयकात
आहे.
****
विधानपरिषदेचं
कामकाज सुरू होताच काल संपूर्ण सभागृहानं २६/११
च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांना
आणि या हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी
यावेळी सागरी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. यासंदर्भात गेल्या चार वर्षात एकही बैठक
झाली नसल्याचं ते म्हणाले. या हल्ल्यातल्या सामान्य पीडितांचं पुनर्वसन करावं अशी मागणी
शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी केली.
****
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं पहिली आणि दुसरीच्या
मुलांना गृहपाठ देऊ नये तसंच विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन कमी करावं अशा सूचना जारी
केल्या आहेत. मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं सर्व राज्यांना पाठवलेल्या
या परिपत्रकात पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि भाषा हे दोनच विषय शिकवण्यात
यावेत, तर तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित, भाषा आणि सामान्य विज्ञान शिकवण्याच्या
सूचना देण्यात आल्या आहेत. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन दीड
किलो, तिसरी ते पाचवीपर्यंतच्या दोन ते तीन किलो, सहावी ते सातवीच्या चार किलो, आठवी
ते नववीच्या साडेचार किलो आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं वजन पाच किलोपेक्षा
अधिक असता कामा नये अशादेखील सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.
****
गोवर आणि रुबेला या आजारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी
आरोग्य विभागामार्फत आजपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. नऊ
महिने ते पंधरा वर्षाखालच्या सुमारे तीन कोटी अडोतीस लाख बालकांना लस देण्याचं उद्दिष्ट
ठेवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात
या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार असून, लसीकरणाच्या पहिल्या सत्रात म्हणजेच पहिल्या
दोन आठवड्यांमध्ये सगळ्या शाळांमध्ये, आणि त्यापुढच्या दोन आठवड्यांत अंगणवाड्यांमध्ये,
तसंच फिरत्या पथकांमार्फत लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यातल्या साखर कारखान्यांमध्ये सगळ्याच राजकीय
पक्षांचे हितसंबंध असल्यामुळे शेतकऱ्यांना लुटण्याबाबत सर्वांचं एकमत आहे, असं मत स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. या संघटनेच्या वतीनं नांदेड
इथं घेण्यात आलेल्या पहिल्या ऊस परिषदेत ते बोलत होते. ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर
दरात वरकरणी वाढ केली असली तरी या दराचा आधार साडेनऊ टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर नेल्यानं
शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भारतीय संविधानाच्या प्रतिमेलाही
पुष्पं अर्पण केली. संविधान दिनानिमित्त राज्यात काल सर्वत्र भारतीय संविधानाच्या
उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचही आयोजन करण्यात
आलं होतं.
****
पत्रकारांना पेन्शन मिळावं, पत्रकारांवरचे हल्ले
रोखण्यासाठी कडक कायदा करावा, यासह विविध मागण्यांसाठी पत्रकारांच्या संघटनांनी काल
राज्यात धरणं आंदोलन केलं. औरंगाबाद, परभणी आणि
हिंगोलीसह राज्यभरातले पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. परभणी जिल्ह्यात
तालुका पातळीवरही धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड महसूल मंडळाचा दुष्काळी
यादीत समावेश करावा, ऊड्डाण पूल वळण रस्त्याचं डांबरीकरण करावं या आणि इतर मागण्यांसाठी
गंगाखेड तालुका आणि शहर कॉंग्रेस समितीच्या कार्यकर्त्यांनी नांदेड - पुणे महामार्गावर
काल रस्ता रोको आंदोलन केलं. तहसीलदारांनी यावर दोन दिवसांत बैठक घेण्याचं अश्वासन
दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं.
****
कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी लोकसभा निवडणुकीत
विजय मिळवू, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल
परभणीत वार्ताहरांशी बोलतांना व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामावर जनतेचा
विश्वास असल्याचं नमूद करत, समविचारी पक्षांनी या निवडणुकीत एकत्र यावं, अशी इच्छाही
दानवे यांनी यावेळी व्यक्त केली.
*****
***
No comments:
Post a Comment