आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
उपराष्ट्रपती
एम. वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी विश्वबंधुत्वासाठी मानवतेचा मार्ग
दाखवून दिला आहे, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर, मोहम्मद पैगंबर
यांच्या शिकवणीचं स्मरण करून पंतप्रधानांनी, संपूर्ण विश्वात शांती, सौहार्द आणि बंधुभाव
असावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात
येवला-मनमाड रस्त्यावर अंकाई बारी इथे आज पहाटे दोन गाड्यांमध्ये समोरासमोर धडक होऊन
झालेल्या अपघातात एका गाडीतले सहा जण मृत्युमुखी पडल्याचं वृत्त आहे. मृतांमध्ये तीन
महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. अपघातात मरण पावलेल्या व्यक्ती अहमदनगर आणि कोपरगाव
इथल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
केंद्र शासनाच्या
उडान योजनेअंतर्गत नाशिकमध्ये विमान सेवा सुरू करून ती सुरळीत न चालविणाऱ्या एयर डेक्कन
कंपनीची विमान सेवा भारतीय विमान पत्तन प्राधिकरणानं रद्द केली आहे. या कंपनीनं गेल्या
डिसेंबर महिन्यात नाशिक ते मुंबई आणि पुणे सेवा सुरू केली होती. नाशिक मध्ये गेल्या
तीन महिन्यापासून सेवा बंद असल्यानं कंपनीचं कंत्राट रद्द करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
प्रसिद्ध
अभिनेते अमिताभ बच्चन यांना यावर्षीचा सयाजी रत्न पुरस्कार देण्यात आला आहे. बडोद्याचे
संस्थानिक सयाजीराव गायकवाड तृतीय यांच्या स्मरणार्थ, बडोदा व्यवस्थापन संघटनेतर्फे
हा पुरस्कार दिला जातो. इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर.नारायणमूर्ती आणि उद्योजक रतन
टाटा यांना हा पुरस्कार याआधी देण्यात आला आहे.
****
दिल्ली इथे
सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या मेरी कोमनं उपान्त्य फेरीत प्रवेश
केला आहे, यासोबतच तिचं किमान एक पदक निश्चित झालं असून, हे पदक जिंकल्यावर, ती महिला
जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपदाच्या इतिहासात सर्वात जास्त पदकं जिंकणारी आतापर्यंतची
सर्वश्रेष्ठ मुष्टीयोद्धा ठरणार आहे. मेरी कोमसह लवलीना बोरगोहेन, सोनिया चहल आणि सिमरनजीतकौर
या भारतीय खेळाडूंनीही आपापल्या गटाच्या उपान्त्य फेरीत प्रवेश करून पदकं निश्चित केली
आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment