Friday, 23 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.11.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

केंद्र सरकानं देशांतर्गत सुवर्ण परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित भारतीय सुवर्ण आणि आभूषण संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज ही माहिती दिली. संबंधित उद्योंगाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी एकीकृत सुवर्ण धोरण तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रत्न आणि आभूषण व्यवहारावर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होऊ नये यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय खबरदारी घेईल आणि यासाठी अर्थ मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचं प्रभू म्हणाले. रत्न आणि आभूषण व्यवसाय वाढवण्यासाठी भारतानं इतर देशांबरोबर भागीदारी करायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला.

****

पूर्व भारतातल्या चार राज्यात ४४ नवे कोळसा साठे सापडले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागानं ही माहिती दिली. पश्चिम बंगालमधल्या पुरुलिया आणि वीरभूम जिल्ह्यात, ओदिशातल्या तालचेर शहरात, बिहारमधल्या भागलपूर आणि झारखंडमधल्या पूर्व बोकारो आणि दक्षिण करणपूरा या भागांमध्ये हे साठे सापडल्याची माहिती जी. एस. आय च्या पूर्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक आर.के. किसक् यांनी दिली. या सर्व ठिकाणी एकत्रितपणे २५ हजार दशलक्ष टन इतक्या कोळशाचां साठा असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

****

गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा सुगम्य भारत अभियानाअंतर्गत अंध व्यक्तींसाठी दोन चित्रपट दाखवण्यात येत आहेत. या लोकांसाठी ऐकण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आज या अंतर्गत ‘शोले’ हा पहिला चित्रपट दाखवण्यात आला, तर उद्या ‘हिचकी’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

****

राज्यात पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत ३० हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार करण्याचं उद्दीष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नागपूर इथं आज भारतीय रस्ते परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हे रस्ते तयार करण्यात येत असून, प्रस्तावित ३० हजार किलोमीटर पैकी १० हजार किलोमीटर रस्त्यांचं काम पूर्ण झालं असल्याचं, ते म्हणाले. राज्यातल्या रस्त्यांच्या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून गेल्या चार वर्षात एक लाख कोटी रुपये मिळाल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

महायुतीत सहभागी झाल्यानंतर शिवसंग्रामला मिळालेली राजकीय आश्र्वासनं पाळली गेली नसल्याची खंत या पक्षाचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पक्षाचा सतरावा वर्धापन दिन येत्या सहा जानेवारी रोजी औरंगाबादच्या आमखास मैदानावर महामेळावा घेऊन साजरा केला जाईल. त्यात पक्षाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असं ते म्हणाले. राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला अहवाल सरकारनं स्वीकारलेला नाही पण शिफारसी स्वीकारल्या आहेत, त्यामुळे आरक्षण नाकारणं कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारला परवडणार नाही, असं आमदार मेटे यांनी यावेळी नमूद केलं.

****

लातूर ते कुर्डुवाडी रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामाला गती आली असून, पुढच्या दिड वर्षात विद्युतीकरणाचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा यांनी दिली. लातूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी विविध उपक्रमाचा शुभारंभ आज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लातूर स्थानकावर मोटरमनच्या तपासणीसाठी श्वासवाचक यंत्र, प्लास्टीक बाटल्या नष्ट करण्याचं यंत्र, तसंच रेल्वे पोलीस ठाण्याचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. लातूर ते मुंबई आणखी एक नवीन रेल्वे सुरु करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं महाव्यवस्थापक शर्मा यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात येत्या २७ तारखेपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून जालना जिल्ह्यातला एकही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये याबाबत काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. जालना जिल्ह्यात नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातल्या सहा लाख १५ हजार बालकांना गोवर, रुबेला लस देण्याचं नियोजन प्रशासनानं केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५०वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथला दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज पावसामुळे रद्द करण्यात आला. फलंदाजी लादली गेल्यानंतर ऑस्ट्रेलियानं १९ षटकात सात बाद १३२ धावा केल्या होत्या तेंव्हा पावसाला सुरुवात झाली. 

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...