Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 November
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातले
अनेक शेतकरी तसंच आदिवासी यांनी आज सकाळी ठाण्यातून मोर्चाला सुरुवात केली असून हा मोर्चा विधान भवनावर
नेण्याचा त्यांचा मानस आहे. शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा आणि
तो देण्यासाठी न्यायिक व्यवस्था तयार करावी, पिढ्यान -पिढ्यांपासून वनजमिनी कसणाऱ्यांना
त्या जमिनी त्यांच्या नावावर करून द्याव्या, शेतकऱ्यांना दिवसाही अखंडित वीजपुरवठा
करावा, दुष्काळी भागातल्या सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं, यासह अन्य
अनेक मागण्यांसाठी, लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात
येत आहे.
****
महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईतल्या हुतात्मा
स्मारकामध्ये पुष्पं अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार ए.जी सावंत तसंच मुख्य
सचिव दिनेशकुमार जैन यांनीही यावेळी हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
भारत आणि सिंगापूर मधले लष्करी संबंध अधिक दृढ झाल्यानं
आणि भविष्यातल्या सहकार्याच्या वचनबद्धतेमुळे आसियान क्षेत्रात स्थैर्य येईल, असा विश्वास
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. भारत आणि सिंगापूरच्या संरक्षण
मंत्र्यांच्या बैठकीत त्या काल विशाखापट्टनम इथे बोलत होत्या. भारत सिंगापूर मधल्या
संयुक्त लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमासंबंधीच्या कराराला उजाळा देण्यासाठी ही बैठक आयोजित
करण्यात आली होती. सागरी क्षेत्रातल्या गुप्तचर माहितीचं आदान प्रदान करण्याबाबत सीतारामन
आणि सिंगापूरचे संरक्षणमंत्री एनजी ऐंग हेन
यांच्यात सहमती झाली. यासंदर्भातली पुढची बैठक पुढच्या वर्षी सिंगापूरमध्ये होणार आहे.
****
सर्वांना परवडतील अशी दर्जेदार औषधं उपलब्ध करुन
देण्याच्या सरकारच्या उपक्रमामुळे देशभरातल्या रुग्णांची पंधरा हजार कोटी रुपयांची
बचत झाली आहे, अशी माहिती केंद्रीय रसायन आणि खते विभागाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय
यांनी दिली आहे. जीवरक्षक आणि अत्यावश्यक औषधांसह हृदयात घातल्या जाणाऱ्या कोरोनरी
स्टेन्टची किंमतही सरकारनं कमी केली, याचा लाभ दहा लाख रुग्णांना झाला आहे तर गुडघे
प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च कमी केल्यामुळे दीड लाख रुग्णांना लाभ झाला आहे, असं
मांडवीय यांनी सांगितलं.
****
गोव्यातल्या काही काँग्रेस नेत्यांसह अनेक जणांनी
काल संध्याकाळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या घरावर मोर्चा काढला. पर्रीकर
यांनी अट्ठेचाळीस तासात राजीनामा द्यावा आणि गोव्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री असावा,
अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चाला काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि
शिवसेनेनं पाठिंबा दिला.
****
जगात सर्वात उंच ठरलेल्या, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
पुतळ्यामुळे नर्मदा नदीचा काठ जागतिक पर्यटन नकाशावर आला असून, अवघ्या दोन आठवड्यात
दोन लाख पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली आहे, यामुळे आगामी काळात या जागतिक
पर्यटनस्थळाचा लाभ या परिसरातल्या, महाराष्ट्राच्या हद्दीतल्या शेकडो आदिवासी गावं
आणि पर्यटन स्थळांना होणार असल्याचं जाणवत आहे, असं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी
म्हटलं आहे. आदिवासींच्या आर्थिक विकासाची ही संधी साधावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन
विभागानं पुढाकार घेतला असून, या परिसरातल्या
युवकांना पर्यटनाशी संबंधित कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात यावं, अशा सूचना रावल यांनी
संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
****
मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस
ईद उल मिलादुन्नबी आज साजरा होत आहे. या निमित्त औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथं पैगंबरांच्या
पवित्र पोशाखाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव दाखल
झाले आहेत.
हिंगोली इथं रामलीला मैदानावरून ईद-ए-मिलादनिमित्त
जुलूस काढण्यात आला. घोडे उंट यांचा समावेश असलेल्या या जुलूसमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या
संख्येनं सहभागी झाले होते.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन टीट्वेंटी
क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथे सुरू
होत आहे. भारतीय वेळेनुसार आता एक वाजून वीस मिनिटांनी हा सामना सुरू होईल. गेल्या
वेळी, २०१६ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला ३-० असं पराभूत केलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment