Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय
आयोगानं सादर केलेल्या अहवालावर कृती अहवाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत
सादर केला. या अहवालानंतर विधेयक मांडण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सभागृहाचं कामकाज
स्थगित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. धनगर आरक्षणाबाबतचा
अहवाल केव्हा मांडणार असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाचा अहवाल कायद्याच्या
अंतर्गत सादर केला असून, धनगर आरक्षणासंदर्भात उपसमिती शिफारशींचा अभ्यास करत असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, विधासनभेत कामकाज सुरु होताच प्रश्नोत्तराच्या
तासातच विरोधी पक्ष सदस्यांनी, सरकारनं आरक्षणावर स्पष्ट भुमिका घ्यावी, अशी मागणी
केली होती. अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे सरकारनं आरक्षणाच्या मुद्यावर
लक्ष द्यावं, आरक्षणाची टक्केवारी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित
पवार यांनी केली. अधिवेशन संपण्यापूर्वी आरक्षणासंदर्भात विधेयक मांडणार, जर उद्यापर्यंत
विधेयक मांडलं गेलं नाही, तर अधिवेशनाची मुदत वाढवू, असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत
पाटील यांनी दिलं. दरम्यान, भंडारा जिल्ह्यातल्या तुमसा मतदारसंघाचे माजी आमदार, काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते सुभाषचंद्र कारेमोरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव
मांडला. सभागृहानं कारेमोरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. कारेमोरे यांचं काल निधन
झालं.
****
देशात आरोग्य सेवेसाठी जीएसटीसारख्या
सांघिक संरचनेची आवश्यकता असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली इथं आज आरोग्याशी संबंधित शिखर बैठकीत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारं
आरोग्य सेवेसाठी वेगवेगळा निधी खर्च करत असल्याचं ते म्हणाले. आयुष्मान भारत योजनेमुळे
आरोग्य सेवा उपलब्ध करण्याची व्यवस्था आणखी सुधारली असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आर्थिक
वर्ष २०१९-२० चा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर करणार आहेत. अर्थसंकल्प
तयार करण्याचं काम सुरु झालं असल्याचं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. अर्थसंकल्पासाठी
पोलाद, वीज, गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या बैठका झाल्या असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून
आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. मध्यरात्री पाकिस्तानी सैन्यानं सीमेपलिकडून
भारतीय लष्करी चौक्या आणि रहीवाशी भागांना लक्ष्य करत गोळीबार सुरु केला.
****
वस्त्र उद्योगानं निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक
आराखडा तयार करावा, असं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी
केलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारतीय वस्त्रोद्योग मंहासंघाच्या जागतिक परिषदेत बोलत
होते. वस्त्रोद्योग क्षेत्राला शक्य ती सर्व मदत पुरवण्याची सरकारची तयारी असल्याचं
ते म्हणाले. या क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांचं निर्यातीतलं
योगदान वाढवता येईल, असं ते म्हणाले. भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रानं आपल्या
दृष्टिकोनात आधुनिकता आणावी आणि शेजारी राष्ट्रांच्या तुलनेत स्पर्धात्मक लाभ घ्यावा असं
आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री प्रभू यांनी
केलं.
****
तपास यंत्रणाच्या प्रमुखांची दुसरी राष्ट्रीय परिषद आजपासून
नवी दिल्लीत सुरु होत आहे. पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या या
दोन दिवसीय परिषदेत तपासाचा दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, विविध
कायदेशीर बाबी, प्रक्रिया यावर चर्चा होणार आहे. नवीन प्रकारच्या गुन्ह्यांच्या
या युगात पोलीस तपास संस्थांची क्षमता निर्मिती करणं ही या परिषदेची संकल्पना आहे.
राज्य गुन्हे शाखांचे प्रमुख, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष
कृती दलासारख्या राज्य पोलीस तपास संस्था यांच्यासह केंद्रीय अन्वेषण संस्था, राष्ट्रीय
तपास संस्था, सक्तवसुली संचालनालय या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या ८६ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त
अशा एकूण ११० सदस्य पदांच्या पोट निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. उपजिल्हाधिकारी
सुनील यादव यांनी ही माहिती दिली. येत्या दहा डिसेंबरला प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध
होईल, त्यावर १४ तारखेपर्यंत हरकती आणि सूचना दाखल होऊ शकतील आणि १७ डिसेंबर २०१८ला
अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
****
पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज दोन सामने होत
आहेत. ओदिशात भुवनेश्वर इथं आयोजित या स्पर्धेत, आज
संध्याकाळी पाच वाजता अर्जेटिंनाचा सामना स्पेनशी, तर
संध्याकाळी सात वाजता न्यूझीलंडची लढत फ्रान्सशी होईल. काल संध्याकाळी, भारतानं
प्रारंभीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर पाच - शून्य अशी सहज मात
करत विजयी सलामी दिली.
*****
***
No comments:
Post a Comment