Wednesday, 28 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.11.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधानसभेच्या या अधिवेशनात अधिक विचार विनिमय करण्यासाठी गरज भासल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात येईल, असं महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. राज्य मागास आयोगाचा यासंदर्भातला अहवाल विधीमंडळाच्या पटलावर मांडावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केल्यानंतर पाटील बोलत होते.

****

राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी शासनानं जाहीर केलेल्या  विशेष ज्येष्ठ नागरिक धोरणाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत दिली. वृद्धाश्रमांसाठी आमदार निधीतून निधी देण्याबाबत आणि ज्येष्ठांच्या विमा योजनांबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

विधानसभेनं काल मंजूर केलेलं कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम सुधारणा विधेयक आज सरकारनं विधान परिषदेत मागं घेतलं. शेतकरी, व्यापारी आणि माथाडींच्या प्रतिनिधींची एक अभ्यास समिती स्थापन करून या विधेयकाचा अभ्यास केला जाईल आणि त्यात सुधारणा करून नव्या कायद्यात रूपांतर केलं जाईल, असं पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितलं. या विधेयकाच्या विरोधात राज्यभरातल्या बाजार समितींनी पुकारलेला संप आता मागे घ्यावा, असं आवाहनही देशमुख यांनी केलं. या निर्णयाचं स्वागत करताना आंदोलक माथाडी संघटनेनं लवकरच हे आंदोलन मागं घेण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.

****

विधान परिषदेत आज राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर चर्चा सुरू आहे. दुष्काळाचा एकत्रितपणे सामना करण्याची गरज असताना सरकार या प्रश्नाला गांभीर्यानं न घेता विरोधी पक्षांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. कर्ज माफी योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्यानं बहुसंख्य शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी मिळत नसल्याचं सांगत, कर्ज माफीची घोषणा ही फसवी असल्याची टीका मुंडे यांनी केली. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्यसरकारनं केंद्राकडून विशेष निधी मंजूर करून घ्यावा, आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, खाजगी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा निधी सरकारनं ताब्यात घेऊन तो दुष्काळनिवारणाच्या कामाला वापरावा, असंही मुंडे यांनी सुचवलं. राज्यातला दुग्ध व्यवसाय, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि दुधाला वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत ठेवल्यामुळे डबघाईला आल्याचा आरोप करत, सरकारनं याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून योग्य धोरण राबवावं, अशी मागणी काँग्रेस पक्षानं यावेळी केली.

****

विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी येत्या ३० तारखेला निवडणूक होणार आहे. सर्वाधिक चार वर्षाच्या खंडानंतर विधानसभेला उपाध्यक्ष प्राप्त होणार असल्याचं आज या निवडणुकीची घोषणा झाल्यानं स्पष्ट झालं. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरू होत असून अर्जांची छाननी उद्या होणार असल्याची माहिती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली.

****

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात त्यांना आदरांजली वाहिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद इथं औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिक तसंच महापौर नंदकुमार घोडेले यांनी अभिवादन केलं. बीड शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महिला मॅरेथॉन स्पर्धा झाली.

****

विधानसभा निवडणुकीसाठी आज मध्यप्रदेश मध्ये दुपारी चार वाजेपर्यंत अट्ठावन्न टक्के तर मिझोरममध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सदुसष्ट टक्के मतदान झालं. मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे.

//************//






No comments: