Thursday, 22 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.11.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

इतर मागासवर्गीय - ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला न्याय देण्याची भूमिका सरकारची असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, छगन भुजबळ, गणपतराव देशमुख यांनी मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. धनगर आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस पाठवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यात शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त असून, ती तातडीनं भरण्यात यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत केली. आमदार विक्रम काळे, कपिल पाटील यांनी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली होती. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंद, उच्चाधिकार समितीमध्ये अंतिम करण्यात आला असून, त्याची लवकरच घोषणा केली जाईल, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या पेयजल योजनेचे शंभर कोटी रुपये गेल्या दोन वर्षांपासून खर्च न केल्याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आणि ग्रामीण पाणीपुरवठा विकास योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधान परिषदेत सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्येसंदर्भात सदस्य अमरनाथ राजुरकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.   

****

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेचा वापर करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. न्यायभूमी या स्वयंसेवी संस्थेनं ही याचिका दाखल केली होती. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा गैरवापर होऊ शकतो त्यामुळे मुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी या यंत्राचा वापर होऊ नये, असं या याचिकेत म्हटलं होतं. मात्र सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं याला सहमती दर्शवली नाही.

****

इतर मागासवर्गीय प्रवर्गातल्या उपजातींचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाची मुदत पुढच्या वर्षी ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळानं घेतला आहे. त्याचबरोबर मंत्रीमंडळानं आरोग्य सेवा विधेयक २०१८ला ही मंजुरी दिली आहे. दादरा नगर हवेली मधल्या सिल्वासा इथं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासही मंत्रीमंडळानं मान्यता दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.

****

सरकारनं विडी कामगारांना आठवडाभराचा पगार रोख रकमेच्या स्वरुपात कारखान्यांमध्येच वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. त्यानुसार आता तीन हजार रुपये प्रतिमाह किंवा त्यापेक्षा अधिक वेतन असलेल्या कामगारांना बँकेद्वारे थेट अथवा धनादेशाद्वारे वेतन देणं बंधनकारक नसून, कामगारांना रोखीनं देखील वेतन देता येणार आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या जोगवाडा नजिक वडाळी इथल्या तलावातून २५ ते ३० विद्युत मोटारीच्या साहाय्यानं लाखो लिटर पाण्याचा अवैधरीत्या उपसा केला जात असल्याची तक्रार पशुपालकांनी केली आहे. या तलावात अत्यल्प पाणीसाठा राहिला असून, असाच उपसा सुरू राहिला तर पाणीटंचाईचा मोठा धोका निर्माण होईल, तसंच उन्हाळ्याचा दिवसांत जनावरांना पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवेल, त्यामुळे पाटबंधारे विभागानं यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या किनवट आणि गोकुंदा इथं सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्याअंतर्गत १७ तंबाखू विक्रेत्यांकडून १६ हजार ३५० रुपये दंड आकारण्यात आला. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयातल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तहसिल कार्यालयावर आज ओबीसी समाजातर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण देताना सध्याच्या ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता तथा ओबीसी किंवा एसईबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करु नये आदी मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.

****

नवी दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक मुष्ठीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एम सी मेरीकोमनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या लढतीत मेरीनं ४८ किलो वजनी गटात उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मी हिचा पराभव केला.

****

No comments: