Saturday, 24 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.11.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अव्वल मुष्टीयोद्धा एम सी मेरी कोमनं सुवर्ण पदक पटकावलं. ४८ किलो वजनी गटात मेरीकोमनं युक्रेनच्या हॅना ओखोटावर पाच - शून्य अशी मात केली. मेरीकोमचं जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेतलं हे सहावं सुवर्ण पदक आहे. या कामगिरीसह मेरी कोमनं आयर्लंडच्या केटी टेलरचा पाच विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम नोंदवला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विजयाबद्दल मेरी कोमचं अभिनंदन केलं आहे. नवोदित सोनिया चहलला या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

****

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी सरकारनं संसदेत कायदा केला तर शिवसेना पाठिंबा देईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राम मंदिराचं लवकर निर्माण व्हावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ते आज अयोध्येत दाखल झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. सरकारनं राम मंदिर उभारणीची तारीख जाहीर करावी, असंही ते म्हणाले. विशेष रेल्वेगाडीनं हजारो शिवसेना कार्यकर्ते याआधीच अयोध्येत पोचले आहेत. उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा अयोध्या दौरा आणि विश्व हिंदू परिषदेचा उद्या होणारा कार्यक्रम या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश सरकारनं अयोध्येत चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्याचं पोलिस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितलं.

****

केंद्र आणि राज्य शासन व्यापार तसंच उद्योग सुलभ धोरण आणि औद्योगिक विकासासाठी विविध कायद्यात सुधारणा करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आज काथार वाणी समाज सेवा संघाच्या वतीनं आयोजित अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. सरकार नवउद्योग आणि लघुउद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन आणि विविध योजनांद्वारे अर्थसहाय्य करत असून, त्याचा लाभ युवकांनी घेण्याचं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी, काथार वाणी समाजातले विविध प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. काथार वाणी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये वसतीगृहांची उभारणी करण्याचं आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी दिलं. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड यावेळी उपस्थित होते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. 

****

इसापूर धरणातलं पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात यावं या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातल्या बोरी - रेणापूर इथं कोरड्या नदीपात्रात सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या सुर्यकांता पाटील यांनी आज आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी करण्याचं आश्वासन पाटील यांनी दिलं. यावरही समस्या सुटली नाही तर सोमवारपासून आमरण उपोषणाचा इशारा ९० गावचे नागरिक आणि शेतकऱ्यांनी दिला.

****

गुरुशिष्य परंपरेतल्या कडक शिस्तीच्या संस्कारामुळे खरे कलाकार तयार झाल्याचं मत मराठवाड्याचे ज्येष्ठ गायक पंडित नाथराव नेरळकर यांनी व्यक्त केलं. दैनिक दिव्य मराठीच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित साहित्य महोत्सवात ‘गुरुशिष्य परंपरा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. गुरु सोबत असताना, छोट्या छोट्या प्रसंगातूनही शिक्षण सतत सुरू असतं, असं प्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता म्हणाल्या.

****

येत्या २७ तारखेपासून राज्यभरात गोवर - रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. औरंगाबाद आणि परभणी महानगरपालिकेनं या मोहिमेची तयारी पूर्ण केली आहे. या लसीमुळे बालकांना गोवर आणि रुबेला या आजारापासून संरक्षण मिळणार असल्याचं परभणी मनपा प्रशासनानं आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. परभणी जिल्ह्यातल्या २ लाख ८४ हजार बालकांना ही लस देण्यात येणार आहे.

****

जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज जुन्या मोंढ्यातल्या एका गोदामावर छापा टाकून चारचाकी वाहनांच्या इंजिनासह सुट्या भागांचा मोठा साठा जप्त केला आहे. वाहनांचे हे भाग चोरीचे असल्याचा संशय असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलं आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना उद्या सिडनी इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून २० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments: