Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
विधिमंडळाच्या
दोन्ही सभागृहात आज मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभा पटलावर मांडलं. मराठा समाज आरक्षण विधेयक २०१८ला विरोधी
पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून, तर अजित पवार यांनीही या विधेयकास
एकमतानं मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटलं. या विधेयकात मराठा समाजाला १६ टक्के
आरक्षण देण्यात आलं असून, मराठा समाजाचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास - एस ई बी
सी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात
आरक्षण मिळणार आहे.
त्यानंतर
मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेतही मराठा आरक्षण विधेयक मांडलं. या सभागृहातही चर्चेविना
विधेयक मंजूर करण्यात आलं. विधेयक मंजूर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे
आभार मानले.
विधानपरिषदेत
आज धनगर आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. पुढच्या अधिवेशनापर्यंत धनगर आरक्षणाचा
प्रश्न मार्गी लाऊ, तसंच आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
****
दरम्यान,
सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार सर्व वैधानिक प्रक्रिया भाजप सरकारनं मराठा
आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण केली असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं
आहे. ते औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. भाजपनं विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात
दिलेलं वचन पाळलं असून, याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो, असं दानवे म्हणाले.
****
दरम्यान,
मराठा समाज आरक्षण विधेयक मंजूर केल्यामुळे राज्यभरात आनंद साजरा केला जात आहे. भारतीय
जनता पक्षाच्या वतीनं आज औरंगाबाद इथं जल्लोष करण्यात आला. परभणी शहरात मराठा समाज
बांधवांनी आतिषबाजी करुन आनंद साजरा केला, मिठाई वाटप केल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. जालना जिल्ह्यात या निर्णयाचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातल्या
सकल मराठा समाजानंही या विधेयकाचं स्वागत केलं.
****
पात्र
माथाडी कामगारांनाच माथाडी कायद्याचा लाभ मिळावा यासाठी माथाडी कामगारांची यादी लवकरच
ऑनलाईन जाहीर करणार असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज
विधान परिषदेत दिली. माथाडी कामगार आणि त्यांच्या प्रश्नाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य
प्रवीण दरेकर यांनी मांडली होती.
****
समाजकल्याण
विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना वेळेवर सोई-सुविधा न देणाऱ्या अधिकाऱ्यांची दहा
दिवासात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप
कांबळे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. औरंगाबाद शहरातल्या समाजकल्याण विभागाच्या
वसतिगृहांची बकाल अवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा
उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचं आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून
दिलं होतं.
****
ड्रोन
आणि कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरानं शेतीचा शाश्वत विकास होईल, तसंच शेतकऱ्यांच्या
जीवनमानात नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त
केला आहे. मुंबईत आज शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराविषयी आयोजित चर्चासत्रात ते बोलत
होते. ड्रोन आणि कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा
शेती आणि जलसिंचन क्षेत्रासाठी वापर करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
वन्य
प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास तसंच पशुधनाचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या
अर्थसहाय्यात वाढ करण्यात आल्याची माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत
दिली. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आल्याचं ते म्हणाले. वन्य प्राण्यांच्या
हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारं अर्थसहाय्य आता १५ लाख इतकं करण्यात
आलं असून, गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजार भावाप्रमाणे असलेल्या किंमतीच्या
७५ टक्के किंवा ६० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल, असं ते म्हणाले.
****
केंद्र
सरकारनं भाषा संगम नावाचा उपक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना २२
भारतीय भाषांची माहिती दिली जाणार आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत राबवण्यात येणारा
हा उपक्रम, या महिन्याच्या २२ तारखेपासून सुरु करण्यात आला असून, २१ डिसेंबर पर्यंत
चालणार आहे. विद्यार्थ्यांना भारतीय भाषांची माहिती व्हावी आणि त्यांच्यामध्ये सहिष्णुता
आणि राष्ट्रीय एकतेची भावना वाढीस लागावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
****
पुरुषांच्या
हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज दोन सामने होत आहेत. ओदिशात भुवनेश्वर इथं आयोजित या स्पर्धेत
पहिला सामना अर्जेटिंनाविरुद्ध स्पेन असा आणि संध्याकाळी सात वाजता न्यूझीलंडची लढत
फ्रान्सशी होईल.
****
No comments:
Post a Comment