आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
देशातल्या १२९
जिल्ह्यांमधल्या नागरिकांना पाईप जोडणीद्वारे गॅस वितरण करण्याच्या प्रकल्पाची
पायाभरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार
आहे. त्यात राज्यातल्या औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश
आहे.
****
नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते
गौतम नवलखा, प्राध्यापक आनंद तेलतुंबडे, आणि अन्य एकाच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयानं
एका दिवसाची स्थगिती दिली आहे. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. पुणे पोलिसांनी
प्राथमिक माहिती अहवालात या तिघांवर भीमा कोरेगाव हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप
लावला आहे, यावर तिघांनी न्यायालयाकडे आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी
चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पोलीस दलाची सर्व कार्यालये आणि पोलीस ठाणे यांना
आयएसओ आणि स्मार्ट पोलीस मानांकन प्राप्त झालं आहे. गृहराज्य मंत्री तथा सिंधुदुर्ग
जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी इथं झालेल्या कार्यक्रमात
या मानांकनांच वितरण करण्यात आलं. पोलीसांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेतले
पाहिजेत, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना
पोलीसांचा आदर आणि आधार वाटला पाहिजे, असं केसरकर यांनी यावेळी म्हणाले.
****
लातूरच्या
श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानानं यावर्षी चारा छावणी सुरू करणार असल्याचं
घोषित केलं आहे. मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थिती
पाहता शेतकऱ्यांना स्वतःचं पशुधन सांभाळणं जिकरीचं झालं आहे, या पार्श्वभूमीवर राज्याचे
धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिग्गे यांनी राज्यातले मंदिर आणि देवस्थान यांनी पुढाकार
घेऊन चारा छावण्या उभारण्याचं आवाहन केलं होतं.
****
राज्य शासनानं घोषित केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या
अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या वीस हजाराहून जास्त विद्यार्थ्यांना
राज्य परिवहन महामंडळाकडून मोफत बस पासचं वितरण सुरू झालं आहे. नि:शुल्क प्रवासाची
ही सवलत त्यांना पुढच्या वर्षीच्या पंधरा एप्रिलपर्यंत मिळणार असून, या सवलतीमुळे विद्यार्थ्यांना
मोठा दिलासा मिळाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment