Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 November 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
v
राम मंदिर उभारणीसाठी सरकारनं संसदेत कायदा केला तर शिवसेनेचा पाठिंबा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
v
पावसामुळे नदी आणि धरणांमधल्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ
मोजण्यासाठी नवं तंत्रज्ञान विकसीत
v
कोल्हापूर
- रत्नागिरीमार्गावर डोहात मोटार बुडाल्यानं
पाच जणींचा मृत्यू
आणि
v
महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एम सी मेरी कोमला सहाव्यांदा
सुवर्ण पदक
****
अयोध्येत
राम मंदिर उभारणीसाठी सरकारनं संसदेत कायदा केला तर शिवसेना पाठिंबा देईल, असं शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राम मंदिराचं लवकर निर्माण व्हावं अशी मागणी
त्यांनी यावेळी केली. ते काल अयोध्येत दाखल झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. सरकारनं
राम मंदिर उभारणीची तारीख जाहीर करावी, असंही ते म्हणाले. विशेष रेल्वेगाडीनं हजारो
शिवसेना कार्यकर्ते याआधीच अयोध्येत पोचले आहेत. उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा अयोध्या
दौरा आणि विश्व हिंदू परिषदेचा आज होणारा कार्यक्रम या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश सरकारनं
अयोध्येत चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या
सर्व सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्याचं पोलिस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितलं.
दरम्यान, अयोध्येत शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे यांनी रामाची
आरती सुरू केली, त्याचवेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातही ठिकठिकाणी महाआरती
केली.
****
भारतीय हवामान खात्यानं
पावसामुळे नदी आणि धरणांमधल्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ मोजण्यासाठी एक नवं तंत्रज्ञान
विकसीत केलं आहे. ’परिणाम आधारित हवामान अंदाज’ असं या नव्या तंत्रज्ञानाचं नाव असून,
यामुळे राज्यांना पावसाचा परिणाम आणि त्यावर आधारित निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के जे रमेश यांनी विज्ञान आणि हवामान केंद्राच्या
वतीनं नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली. महापुरासारख्या नैसर्गिक
आपत्तीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, असं ते म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या
मालिकेचा हा ५०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११
वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्र आणि राज्य शासन
व्यापार तसंच उद्योग सुलभ धोरण आणि औद्योगिक विकासासाठी विविध कायद्यात सुधारणा करत
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं काल काथार
वाणी समाज सेवा संघाच्या वतीनं आयोजित अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे
संवाद साधला. सरकार नवउद्योग आणि लघुउद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन आणि विविध योजनांद्वारे
अर्थसहाय्य करत असून, त्याचा लाभ युवकांनी घेण्याचं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी, काथार
वाणी समाजातले विविध प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. काथार वाणी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या
शैक्षणिक प्रगतीसाठी राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये वसतीगृहांची उभारणी करण्याचं आश्वासन
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी दिलं. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ
बागडे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड यावेळी उपस्थित होते.
****
कोल्हापूर - रत्नागिरीमार्गावर
आंबेवाडीजवळ रेडे डोहात काल एक चारचाकी मोटार
पाण्यात बुडाल्यानं झालेल्या अपघातात चार अल्पवयीन मुली आणि एका महिलेसह पाच
जणींचा मृत्यू झाला. चारचाकीतले सर्व जण गणपती पुळे इथं देवदर्शन करून परत येत असतांना
ही दुर्घटना घडली. टायर फुटल्यानं चालकाचा ताबा सुटला आणि ही मोटार डोहात पडल्याचं
पोलिसांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
इसापूर धरणातलं पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात
यावं या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातल्या बोरी - रेणापूर इथं कोरड्या नदी पात्रात सुरु
असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा काल सहावा दिवस होता. माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय
जनता पक्षाच्या नेत्या सुर्यकांता पाटील यांनी काल आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यासंदर्भात
आपण मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी करण्याचं आश्वासन
पाटील यांनी दिलं.
****
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल जुन्या
मोंढ्यातल्या एका गोदामावर छापा टाकून चारचाकी वाहनांच्या इंजिनासह सुट्या भागांचा
मोठा साठा जप्त केला आहे. वाहनांचे हे भाग चोरीचे असल्याचा संशय असून या प्रकरणी पोलिसांनी
एका संशयितास ताब्यात घेतलं आहे.
****
दिल्लीमध्ये
सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अव्वल मुष्टीयोद्धा
एम सी मेरी कोमनं काल सुवर्ण पदक पटकावलं. ४८ किलो वजनी गटात मेरीकोमनं युक्रेनच्या
हॅना ओखोटावर पाच - शून्य अशी मात केली. मेरीकोमचं जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेतलं
हे सहावं सुवर्ण पदक आहे. या कामगिरीसह मेरी कोमनं आयर्लंडच्या केटी टेलरचा पाच विजेतेपदांचा
विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम नोंदवला आहे.नवोदित सोनिया चहलला या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
या विजयाबद्दल मेरी कोमचं अभिनंदन केलं आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान
तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज सिडने इथं खेळला
जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून २० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.
मालिकेतला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री
मुद्रा योजनेच्या माध्यमातून, व्यावसायवृद्धिसाठी शिशु, किशोर आणि तरुण या तीन श्रेणींमध्ये
राष्ट्रीयकृत बँकांद्वारे कर्ज उपलब्ध केलं जात आहे. सातारा जिल्ह्यातले रहिवासी राहुल
कांबळे यांनी व्यवसाय वाढीसाठी मुद्रा योजनेतून कर्ज घेत व्यवसाय वाढवला. त्याबद्दल
त्यांची प्रतिक्रिया त्यांनी सांगितली.
व्यवसाय वाढवण्यासाठी मी मुद्रा योजनेच्या
माध्यमातून कर्ज प्रकरणासाठी अर्ज केला होता. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला
राष्ट्रीयकृत बॅंकांकडून तात्काळ कर्ज मिळाले. त्या कर्जाद्वारे मला माझा व्यवसाय वाढविण्यास
मदत झाली.
****
मानवलोक संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया यांच्यावर काल अंबाजोगाईत अंत्यसंस्कार करण्यात
आले. त्यांच्या इछेनुसार त्यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले. अमर रहे अमर रहे बाबूजी
अमर रहे अशा घोषणा देत हजारो स्थानिक नागरिक
आणि कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार, जेष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे, प्रकाश आमटे, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे
यांच्यासह अनेक मान्यवरांनीही पाठवलेल्या शोक संदेशाचं वाचन करण्यात आलं.
****
अंबाजोगाई इथं आजपासून तीन दिवस यशवंतराव चव्हाण
स्मृती समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती
दिली. समारोहाचं हे चौतिसावं वर्ष असून यावेळी कवी संमेलन, बाल आनंद मेळावा, चित्रकला
स्पर्धा, शेतकरी परिषद, गझल गायन, आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. आज सायंकाळी साडे
पाच वाजता समारोहाचं उद्धाटन जेष्ठ समीक्षक आणि लेखक डॉ. किशोर सानप यांच्या हस्ते
होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर इथं काल किमान आधारभूत खरेदी
योजनेंतर्गत कापूस खरेदीच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ आमदार अमिता चव्हाण यांचे हस्ते
करण्यात आला. खासदार अशोक चव्हाण कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी होते.
*****
***
No comments:
Post a Comment