Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 November
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ नोव्हेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
विधीमंडळ अधिवेशनाच्या आज तिसऱ्या
दिवशीही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल
सभागृहात मांडण्याची मागणी लावून धरली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी,
मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी, सरकारनं
अहवाल स्वीकारला की शिफारसी स्वीकारल्या, असा प्रश्न उपस्थित केला.
आयोगाच्या शिफारशींवर निर्णय घेणं अपेक्षित
असल्यानं, आयोगानं केलेल्या शिफारसी सरकारनं स्वीकारल्या आहेत, याबाबतचा संभ्रम नसावा,
असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
वृत्तवाहिन्यांनी आपल्याकडे होणाऱ्या चर्चांमधून
समाजात फूट पडणार नाही, याची काळजी घ्यावी, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
टाटा सामाजिक संशोधन संस्थेचा धनगर समाजाबाबतचा
अहवालही सदनासमोर सादर केला नसल्याचं, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
तसंच प्रश्नोत्तराचा तास स्थगित ठेवून या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली. यावरुन
झालेल्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधी
पक्षाच्या सदस्यांनी आपल्या मागण्यांसाठी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे
तालिका अध्यक्षांनी सदनाचं कामकाज पुन्हा दहा मिनिटांसाठी तहकूब केलं.
दुधात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद
करणारं विधेयक आज विधानसभेसमोर सादर करण्यात आलं. विरोधकांच्या गदारोळातच विधेयक मंजूर
करण्यात आलं, त्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
केलं.
विधान परिषदेत ऊसतोड कामगारांच्या विविध प्रश्नांवर
चर्चा झाली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार विनायक मेटे यांनी, ऊसतोड कामगारांच्या
विविध समस्यांकडे सदनाचं लक्ष वेधलं.
****
आदिवासींसाठी
वन हक्क कायदा लागू करणं तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, यासह
इतर मागण्यांसाठी आदिवासी आणि शेतकऱ्यांचा मोर्चा आज सकाळी मुंबईत पोहोचला. मॅगेसेसे
पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चात ठाणे
आणि भुसावळ इथले आदिवासी आणि मराठवाड्यातले शेतकरी सहभागी झाले आहेत.
****
राजस्थान
आणि तेलंगणा विधानसभा निवडणूकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
दोन्ही राज्यात सात डिसेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. राजस्थान विधानसभेत
२००, तर तेलंगणा विधानसभेत ११९ सदस्य आहेत.
दरम्यान, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा
आणि मिझोराम विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मध्यप्रदेशात
विविध राजकीय पक्षांचे नेते राज्याच्या विविध भागांचा दौरा करुन प्रचार सभा घेत आहेत.
मिझोराममधे विविध सेवातल्या मतदारांच्या टपालद्वारे मतदानाची वाढीव मुदत आज संपत आहे.
दरम्यान, जम्मू काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मालिक यांनी जम्मू काश्मीर
विधानसभा काल विसर्जीत केली. राज्यातली राज्यपाल राजवटीची मुदत येत्या १८ डिसेंबर रोजी संपत असून, त्यानंतर
तिथं राष्ट्रपती राजवट लागू होईल.
****
जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांनी
लष्कराच्या शिबिरावर हल्ला केला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात एक स्थानिक महिला जखमी
झाल्याचं वृत्त आहे. दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर अंदाधुंद गोळीबार केला, जवानांनीही
या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं.
****
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात
नियोजन विभागात सह सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातलं पत्र आज मुंढे यांना
मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुंढे यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदाचा
कार्यभार नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावा, असंही या पत्रात म्हटलं आहे
****
गोव्यात
पणजी इथ सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजापसून खुल्या मंचाला सुरुवात
होत आहे. भारतात आणि परदेशातले चित्रपट निर्माते, ज्युरी
सदस्य, चित्रपट महोत्सवांचे आयोजक यांच्यात मुक्त संवाद व्हावा हा या
खुल्या मंचाचा उद्देश असतो. चित्रपट संस्कृतीला प्रोत्साहन देण्याबाबत चित्रपट महोत्सवांची
भूमिका, आणि देशभरात चित्रपट महोत्सवांचा प्रसार हा मंचाचा आजच्या चर्चेचा
विषय आहे.
****
नवी
दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक मुष्ठीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची एम. सी. मेरीकोम
आणि लवलीन बोरगोहेन आज उपांत्य फेरीचे सामने खेळतील. पाचवेळा विश्वविजेती ठरलेल्या
मेरीकॉमची लढत ४८ किलो वजनी गटात, उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मी बरोबर होणार आहे. तर ६९
किलो वजनी गटात लवलीन बोरगोहेनचा सामना, चीनी ताइपैच्या चेन नियन-चिन बरोबर
होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment