Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 November
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ नोव्हेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या
आठवड्याची सुरुवात आज गदारोळात झाली. विधानसभेत मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा
मुद्दा विरोधी पक्षांनी लाऊन धरला. मराठा आरक्षणासंदर्भातला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल
सभागृहात सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. धनगर
आरक्षणासंदर्भातही सरकारनं योग्य तो निर्णय घेऊन, त्याचा अहवालही सादर करावा, असं ते
म्हणाले. काही इतर सदस्यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. गदारोळ वाढत गेल्यानं
अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केलं होतं. कामकाज पुन्हा
सुरु झाल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा लाऊन धरत विरोधीपक्ष सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी
केली. अध्यक्षांनी या गदारोळातच कामकाज सुरु ठेवलं.
****
संविधान दिवस आज देशभरात साजरा होत आहे. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना
संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संविधान सभेच्या विभूतींचं देश सदैव स्मरण
करेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जिवनात संविधानाच्या
मुलभूत उद्देशांचं पालन करणं ही आपली जबाबदारी असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात
म्हटलं आहे.
****
औरंगाबाद शहरात संविधान दिनानिमित्त भडकेलगेट परिसरातल्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विविध पक्ष, संघटना आणि नागरिकांच्या वतीनं
संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. शिवछत्रपती महाविद्यालयाच्या आजीवन शिक्षण आणि
विस्तार विभागाच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक माजी न्यायमूर्ती डी. आर. शेळके
यांचं व्याख्यान झालं. संविधानामुळेच गेल्या सत्तर वर्षात कधीही देशात लष्करी उठाव
झाला नसल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
मुंबईवरच्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला आज दहा वर्ष
पूर्ण झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात
प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या
कुटुंबियांसोबत संपूर्ण देश असून, हुतात्मा पोलिसांना देश नमन करत असल्याचं राष्ट्रपतींनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारत दहशतवाद संपवण्यासाठी कटीबद्ध असल्याचंही राष्ट्रपतींनी
नमू्द केलं. या हल्ल्यात प्राणांची आहुती देणारे पोलिस आणि नागरिकांप्रती देश सदैव
कृतज्ञ राहील, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत दहशतवादाचा
सामना करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने तयार आणि संघटीत असल्याचं नौदल प्रमुख सुनिल
लांबा यांनी म्हटलं आहे. समुद्रात भारताची सुरक्षा मजबूत बनली असल्याचं त्यांनी पीटीआय
या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. आवश्यकता आणि गरजांना लक्षात घेता सागरी सुरक्षेमध्ये
मोठा बदल करण्यात आल्याचं ते म्हणाले.
****
दरम्यान, वर्ष २००८साली मुंबईवरील या
हल्ल्याच्या गुन्हेगारांना कोणत्याही देशात अटक अथवा शिक्षेकरता सहकार्यासाठी उपयुक्त
माहिती देणाऱ्याला पाच दशलक्ष डॉलर बक्षीस अमेरिकेनं जाहीर केलं आहे. पाकिस्तानातील
लष्कर ए तय्यबाच्या दहा दहशतवाद्यांनी त्या हल्ल्यात मुंबईमध्ये बेछूट गोळीबार करत
दहा अमेरिकी नागरिकांसह १६६ जणांचे बळी घेतले होते.
****
सरकारी तेल कंपन्यांना देशभरात सुमारे ५६ हजार
पेट्रोल पंप सुरू करून त्यांच्या किरकोळ व्यवहारांचा मोठ्या प्रमाणात विस्तार करायला
सरकारनं परवानगी दिली आहे. रोजगार निर्मितीला आणि हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला
चालना मिळणार आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि ओेएनजीसीकडून चालवली जाणारी हिंदुस्तान
पेट्रोलियम या कंपन्यांसह सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आपल्या जाळ्याचा विस्तार करण्याचं
काम हाती घेतलं आहे, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अधिकारी पार्थ व्होरा
यांनी मुंबईत वार्ताहरांना दिली.
****
मध्य प्रदेश आणि मिझोराम मध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठीचा
प्रचार संपणार आहे. मध्यप्रदेशात २३० जागांसाठी तर मिझोराम मध्ये ४० जागांसाठी परवा
बुधवारी मतदान होणार आहे.
****
छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात काल झालेल्या
चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले तर एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. जिल्हा राखीव सुरक्षा
दल आणि विशेष कृती दल यांचं संयुक्त पथक मद्देद भागातल्या जंगलात गस्त घालत असताना
ही चकमक झाली.
****
२०१९ मधल्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानात शेतकऱ्यांच्या सहकार्यानं राज्यात चार कोटी बांबूची लागवड करण्यात येणार असल्याचं वनमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी सांगितलं. नागपूर इथं आयोजित कृषी महोत्सवात काल ‘बांबू
लागवड आणि संधी’ या विषयावरच्या परिषदेत ते बोलत होते. बांबूच्या लागवडीतून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य
आणि रोजगार या अशा मूलभूत गरजा पूर्ण होणं शक्य आहे असं वनमंत्र्यांनी नमूद केलं.
*****
***
No comments:
Post a Comment