Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 November
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
मध्यप्रदेश आणि मिझोराम
मधल्या विधानसभा निवडणुका फक्त चार दिवसांवर येऊन ठेपल्या असल्यानं राजकीय पक्षांचा
प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार राजकीय
हल्ले करत आहेत. आज दिवसभरात दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते दोन्ही राज्यांच्या वेगवेगळ्या
भागांत प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशमधल्या छत्तरपूरमध्ये
प्रचारसभेला संबोधित करत आहेत. मध्यप्रदेशमध्ये एकूण २३० आणि मिझोराममध्ये ४० जागांसाठी
बुधवारी मतदान होणार आहे.
****
केंद्र सरकारनं प्रधानमंत्री
मातृवंदना योजनेमार्फत गेल्या
गुरुवारपर्यंत सोळाशे कोटी अठ्ठावन लाख रुपये मातांच्या बँक खात्यांमधे थेट हस्तांतरित
केले आहेत. ही आकडेवारी डिजिटल आर्थिक समावेशन केंद्राकडून प्रसिद्ध केली गेली. केंद्रानं हस्तांतरीतासाठी एक सॉफ्टवेअरची संकल्पना आणि आरेखन करुन त्याची निर्मिती केली
आहे. केंद्र सरकारनं एक जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना देशात लागू
केली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यांदा गर्भवती मातांना तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचं
हस्तांतरण थेट त्यांच्या बँक खात्यात केलं जातं.
****
भारतीय
हवामान खात्यानं पावसामुळे नदी आणि धरणांमधल्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ मोजण्यासाठी
एक नवं तंत्रज्ञान विकसीत केलं आहे. ’परिणाम आधारित हवामान अंदाज’ असं या नव्या तंत्रज्ञानाचं
नाव असून, यामुळे राज्यांना पावसाचा परिणाम आणि त्यावर आधारित निर्णय घेण्यास मदत होणार
आहे. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के जे रमेश यांनी विज्ञान आणि हवामान केंद्राच्या
वतीनं नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली. महापुरासारख्या नैसर्गिक
आपत्तीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, असं ते म्हणाले.
****
केरळमधल्या शबरीमाला अय्यप्पा मंदीरात
सर्व वयोगटातल्या महिलांना दर्शनासाठी आठवड्यातून दोन दिवस देता येतील, अशी भूमिका
केरळ सरकारनं राज्याच्या उच्च न्यायालयात मांडली आहे. महिला भाविकांनी दाखल केलेल्या
एका याचिकेवर सुनावणीच्या वेळी राज्य सरकारनं हा मार्ग सुचवला. या मंदीरात प्रवेश केल्यानंतर
महिलांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
****
पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी विशेष तपास पथकानं
बंगळूरुच्या सत्र न्यायालयात अतिरिक्त आरोपपत्र दाखल केलं असून, या आरोपपत्रात सनातन
संस्थेविरोधात आरोप निश्चित केले आहेत. सनातन संस्थेनं वैयक्तिक कारणामुळे लंकेश यांनी
हत्या केली नसल्याचं या आरोपपत्रात म्हटलं आहे. मात्र, पाच वर्षांपासून त्यांच्या हत्येचा
कट शिजत होता, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी पुढील तपास करण्याची परवानगीही
पथकानं मागितली आहे.
****
गुरु तेग बहादूर यांच्या शहीद दिनानिमित्त राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी अभिवादन केलं आहे. प्रतिष्ठा आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य यासाठी
गुरु तेग बहादूर यांनी दिलेलं योगदान देशाला सदैव स्मरणात राहील, आणि त्यांची शिकवण
लोकांना प्रेरित करत राहील, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
****
राज्य सरकारनं
गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४८ हजार
कोटी रुपये थेट जमा केले आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल
नागपूर इथं अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. कर्जमाफी योजनेंतर्गत
सुमारे २१ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले, तर
थेट लाभ हस्तांतरणाच्या विविध योजनांतर्गत २७ हजार
कोटी रुपये देण्यात आले, असं त्यांनी सांगितलं.
****
भारत हा गोष्टी आणि गाण्यांचा देश असल्याचं संगीतकार
गायक कौशल इनामदार यांनी म्हटलं आहे. दैनिक
दिव्य मराठी च्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित साहित्य महोत्सवात संगीत शिक्षणाची प्रमाणपात्रता
या विषयावर आज आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. संगीतकार गायक अवधूत गुप्ते, स्वप्नील
बांदोडकर, कवी गीतकार गुरु ठाकूर, जीतेंद्र जोशी, संगीताच्या प्राध्यापक डॉ शीतल मोरे
हे मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले होते. शिक्षण आणि गुणांची टक्केवारी याकडे बघण्याचा
दृष्टिकोन बदलणं आवश्यक असल्याचं गुरु ठाकूर यावेळी म्हणाले.
****
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध
अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताची अव्वल मुष्टीयोद्धा एम सी मेरीकोम आणि नवोदित सोनिया
चहल या दोघी आपापल्या गटात सुवर्ण पदकासाठी लढत देणार आहेत. ४८ किलो
वजनी गटात मेरीकोमचा सामना युक्रेनच्या हॅना ओखोटा बरोबर होणार आहे.
****
लखनौ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय
बॅडमिंटन स्पर्धेत आज सायना नेहवालसह अन्य सात भारतीय बॅडमिंटनपटू उपान्त्य पेरीत खेळणार
आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment