आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर करवीर तालुक्यात आंबेवाडी
नजीक आज पहाटे कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. टायर
फुटल्यानं ही कार रेडे डोह नावाच्या छोट्या तलावात कोसळून हा अपघात झाला. तसंच तीन
वर्षांची मुलगी तलावात बेपत्ता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. महापालिका,
अग्निशामक दल तसंच जिल्हाधिकारी कार्यालयातल्या आपत्ती निवारण कक्षानं मदत कार्य सुरु
केलं आहे.
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय
अयोध्या दौऱ्याला आजपासून सुरूवात होत आहे. आज सायंकाळी ठाकरे शरयू नदीच्या किनारी
महाआरती करणार आहेत. याचवेळेस राज्यातही ठिकठिकाणी आरती करण्याच्या सूचना पक्षाच्या
पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातून हजारो कार्यकर्ते अयोध्येत दाखल झाले
आहेत. दरम्यान, ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडक पोलिस बंदोबस्त
तैनात करण्यात आला आहे.
****
यावर्षी ७२ टक्के पाऊस होऊनही विकेंद्रीत पाणी साठ्यामुळे
अनेक ठिकाणी कृषी उत्पादनात वाढ झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. नागपूर इथं आयोजित ॲग्रोव्हीजन प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते.
या प्रदर्शनीमुळे नव्या तंत्रज्ञानाचा परिचय शेतकऱ्यांना होत
असून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात ॲग्रोव्हीजन
मैलाचा दगड ठरेल, असं ते म्हणाले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी
आदित्यनाथ यांची विशेष उपस्थिती होती.
****
मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करण्यात यावं या मागणीसाठी
काल नांदेड जिल्ह्यातल्या कंधार इथं जमियत उलेमाये हिंद शाखेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर
धरणे आंदोलन करण्यात आलं. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.
****
जालना शहरात काल गुरुनानक जयंती निमित्त शहरातून
गुरुनानक यांच्या प्रतिमेची रथातून शोभायात्रा काढण्यात आली. शिख आणि सिंधी समाजबांधवांनी
या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन
की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५०वा भाग
असेल.
*****
***
No comments:
Post a Comment