आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
देशभरात आज संविधान दिवस साजरा होत आहे. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्मित संविधानाचा मसुदा संविधान
समितीनं १९४९ साली आजच्या दिवशी स्विकारला होता. नवी दिल्लीत आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकरांनी भारताला दिलेलं संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान असून त्यामुळेच भारतीय
लोकशाही प्रगल्भ आणि परिपूर्ण आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक
न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पुणे इथं काल अल्पसंख्यांक समाज मेळाव्यात ते बोलत होते. जाती, धर्म, भाषा, प्रांत,
आणि विविधता असलेल्या देशाला राष्ट्रीय एकात्मतेच्या तत्वातून एकसंघ भारत उभारण्याचं
काम संविधानामुळेच झालं आहे, असं ते म्हणाले.
****
मुंबईवरच्या २६/११
दहशतवादी हल्ल्याला आज दहा वर्षे पूर्ण झाली. दक्षिण मुंबईतल्या जिमखाना इथल्या पोलिस
स्मारकावर या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राज्यपाल
सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र पोलिस प्रमुख दत्ता पडसलगीकर,
मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जैस्वाल यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण
करुन अभिवादन केलं. मुंबईच्या सुरक्षेसाठी प्राण गमावलेल्यांना वंदन करत असल्याचं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांविरुद्ध न्यायालयीन
कारवाईस उशीर होण्यास पाकिस्तान सरकारच जबाबदार
असल्याचं या खटल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. काल बडोदा
इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पाकिस्तान आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप
त्यांनी केला. लष्कर-ए-तय्यबा चा संस्थापक हाफिज सईद आणि जकी उर रहमान लखवी या हल्ल्याचे
खरे सुत्रधार असल्याचं विशेष सरकारी वकील निकम यावेळी म्हणाले.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
हरीश्चंद्र गडावर अडकेले २० गिर्यारोहक सुरक्षित असल्याचं राजुर पोलिसांनी सांगितलं.
काल मुंबई आणि औरंगाबाद इथले काही युवक गडावर गेले होते. अंधारात वाट न सापडल्यानं
ते अडकले होते.
*****
***
No comments:
Post a Comment