Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 November 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
§
राजकारणापेक्षा
भारताची एकात्मता आणि संस्कृती महान -पंतप्रधान नरेंद्र मोदी
§
हिंदुत्ववादी
मतांचं विभाजन होऊ नये, म्हणून शिवसेनेशी युती करण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका
- प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
§
राम
मंदिरासाठी कायदा करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांची मागणी
आणि
§
सय्यद
मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या समीर वर्माला पुरुष एकेरीचं सुवर्ण
पदक तर ऑस्ट्रेलियाविरूद्धचा टी- ट्वेन्टी क्रिकेट सामना जिंकत भारताची मालिकेत बरोबरी
****
राजकारणापेक्षा भारताची एकात्मता आणि संस्कृती
महान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात
या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा काल ५०वा भाग
प्रसारित झाला. मोदी येतील आणि जातील, मात्र या देशाची एकात्मता आणि कार्य कधीही
कमी होणार नाही. देशाची संस्कृती ही अमर राहील, असं ते म्हणाले. ‘मन
की बात’ या कार्यक्रमाविषयी केलेल्या सर्वेक्षणामधून सरासरी ७० टक्के
लोक नियमितपणे ‘मन की बात’ ऐकतात, असं दिसून आलं, यामुळे समाजात सकारात्मकता वाढीस लागली, अनेक सामाजिक उपक्रम
आणि चळवळी निर्माण झाल्या. हा कार्यक्रम राजकारणापासून अलिप्त रहावा यासाठी केलेल्या
प्रयत्नांना देशवासीयांनी साथ दिली असं ते म्हणाले.
संविधान दिन आज साजरा होणार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी,
‘घटना समिती’ म्हणजे
आपल्या देशातल्या महान प्रतिभावंत व्यक्तींचा एक संगम होता, असं नमूद केलं. या घटना समितीच्या केंद्रस्थानी राहिलेल्या डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर यांचा येत्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस आहे, त्यानिमित्त पंतप्रधानांनी आंबेडकर यांच्या स्मृतींना
वंदन केलं. २०१९ मध्ये श्री गुरु नानक यांच्या पाचशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त प्रकाश पर्व साजरा करण्याचे निर्देश सर्व राज्य सरकारं आणि
केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्याचं ते म्हणाले. २०२० मध्ये
एक स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून आपण ७० वर्ष पूर्ण करणार आहोत आणि २०२२ मध्ये
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५
वर्ष पूर्ण होणार आहेत, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधलं.
****
राम मंदिराचा मुद्दा हा नवीन नसल्यामुळे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अयोध्येला गेल्यामुळे त्यांना राजकीय फायदा होणार नाही
आणि भारतीय जनता पक्षाला तोटाही होणार नाही, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या संघटनात्मक
तयारीचा आढावा घेण्यासाठी ते काल लातूर इथं आले असता वार्ताहरांशी बोलत होते. हिंदुत्ववादी
मतांचं विभाजन होऊ नये, म्हणून शिवसेनेनं युती करावी अशी भाजपाची भूमिका असल्याचं ते
म्हणाले.
दरम्यान, उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना दानवे
यांनी राममंदिराचा अध्यादेश काढण्यासाठी भाजपकडे राज्यसभेत बहुमत नसून आगामी लोकसभा निवडणुकीनंतर ते शक्य होईल असं नमूद
केलं. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी येत्या एक डिसेंबरला जल्लोष करण्याच्या वक्तव्याचं दानवे यांनी यावेळी
बोलतंना समर्थन केलं.
****
दरम्यान, सध्याच्या सरकारकडून जर राम मंदिर उभारण्यात
येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
दिला आहे. अयोध्येत काल राम जन्मभूमीवर जाऊन भगवान रामाचं दर्शन घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी
बोलत होते. राम मंदिरासाठी अध्यादेश आणा, कायदा करा, शिवसेना पाठिंबा देईल, असा पुनरुच्चार
त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत
यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेला उशीर होत असल्यानं,
सरकारनं कायदा केला पाहिजे असं म्हटलं आहे.
नागपूर इथं विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित हुंकार मेळाव्यात ते काल बोलत होते.
****
राम मंदीर हा कोणासाठीही
राजकीय विषय नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यात
कऱ्हाड इथं काल ते
वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन श्रीरामाचं
दर्शन घेतलं, ते अयोध्येत गेल्याचा आम्हाला आनंदच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
राज्याचे
पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त काल सातारा जिल्ह्यातल्या
कऱ्हाड इथल्या चव्हाण यांच्या प्रीतीसंगम समाधी स्थळावर मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र
अर्पण करून अभिवादन केलं. सोलापूर शहर काँग्रेस समितीच्यावतीनंही शहरातल्या यशवंतराव
चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईत काल ३४ व्या यशवंतराव चव्हाण तीन दिवसीय स्मृती समारोहाचं उद्घाटन समिक्षक डॉक्टर किशोर सानप यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत
डॉक्टर अशोक चौसाळकर होते, राज्यातल्या शेतीला नवसंजीवनी देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांच्या
विचारांमध्ये असल्याचं सानप यांनी यावेळी बोलतांना सांगितलं.
****
भारताच्या समीर वर्मानं सय्यद मोदी
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं सुवर्ण पदक पटकावलं आहे. काल वर्मानं
चीनच्या गुआंगझु लू याला १६ - २१, २१ - १९ आणि २१ - १४ असं हरवलं.
तर महिलांच्या एकेरी सामन्यात साईना नेहवाल तसंच महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि
सिक्की रेड्डी तसंच पुरुष दुहेरीत सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मात्र
रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत, काल सिडनी इथं
झालेला तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं, सहा गडी राखून जिंकत मालिकेत एक -
एकनं बरोबरी साधली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी स्विकारत, निर्धारीत
२० षटकांत सहा बाद १६४ धावा केल्या. विजयासाठी असलेलं १६५ धावांचं लक्ष्य भारतानं विसाव्या षटकात पूर्ण केलं.
येत्या सहा डिसेंबरपासून दोन्ही देशांदरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला
ॲडलेड इथं सुरुवात होणार आहे.
****
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या
३९१ ग्रामपंचायतींमध्ये २७ हजार गॅस जोडणी देण्याचं उद्दिष्ट होतं. यात जिल्ह्यात २१ हजार ५५४ पात्र लाभार्थींना या योजनेअंतर्गत
१०० रुपयात गॅस जोडणी देण्यात आली आहे. या जोडणीमुळे घरात चुलीमुळे होणारा धुराचा त्रास
कमी झाल्याची प्रतिक्रिया देतांना जिल्ह्यातल्या तांदळी गावच्या लाभार्थी अनिता खरसडे म्हणाल्या -
आम्हाला प्रधानमंत्री उज्वला योजनेतून १०० रूपयांमध्ये
गॅस मिळाला आहे. त्यामूळे आमचा खूप फायदा झाला.
पहिले आम्हा गॅस नव्हता. तेव्हा घरामध्ये धूपट – धूपट व्हायचं, इंधन आण्यासाठी खूप
दूर- दूर जावं लागत होतं, काट्या कूट्यातून मधून काड्या आणाव्या लागत होत्या, गोऱ्या
थापाव्या लागत होत्या आणि भाकरी करतांना खूप त्रास व्हायचा. मूलपण ओरडायची धूपट धूपट
. आता गॅस मूळे खूप फायदा झाला आहे. मूलांचा डब्बा पण लवकर होतोय. पहिले खूप उशिर व्हायचा.
आता सर्व कामे कशी वेळेवर व्हायले. मूलांना पण आता शाळेत जायला उशिर होत नाही. म्हाताऱ्या
माणसांना पण धूपटा पासून खूप त्रास व्हायचा. त्यामूळे या प्रधानमंत्री उज्वला योजनेतून
गॅस मिळाल्यापासून आम्हाला खूप फायदा झाला.
****
देशभरात
आज संविधान दिवस साजरा केला जाणार आहे. भारतीय संविधानाबाबत जनजागृती
व्हावी, या उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्तानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधानाचं सामुहिक वाचन करण्याचं आवाहन सामाजिक
न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे. तसंच उद्यापासून ते दोन डिसेंबर पर्यंत
संविधान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment