आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
नाणार प्रकल्पग्रस्तांच्या
आंदोलनाचा मुदा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाचा
अध्यादेश रद्द करण्याची मागणी आमदार नीलेश राणे यांनी केली. तर, उद्योग विभागानं भूसंपादनाची
कारवाई थांबवल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. महात्मा ज्योतीबा
फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सदस्यांनी त्यांना अभिवादन केलं.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. थोर समाजसुधारक, शिक्षणक्रांतीचे
अग्रणी आणि ज्यांनी मागास समाजाला प्रगतीच्या सूर्योदयाकडे नेलं, ते क्रांतिसूर्य महात्मा
जोतिबा फुले यांना पुण्यतिथीदिनी शत शत नमन, असं मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे.
****
जी ट्वेंटी
शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अर्जेंटिनाला रवाना होत
आहेत. पंतप्रधान तिथं शिखर परिषदेसह अन्य द्विपक्षीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.
जी ट्वेंटी हा प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांचा एक अग्रणी मंच असून, त्यात गंभीर आर्थिक
आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं जागतिक धोरणं ठरवली जातात.
****
मध्य प्रदेश
आणि मिझोराम या राज्यांतलं विधानसभेच्या निवडणुकीसाठीचं मतदान आज सकाळी सुरू झालं.
मिझोरममध्ये चाळीस जागांसाठी दोनशे नऊ तर मध्य प्रदेश मध्ये दोनशे तीस जागांसाठी दोन
हजार आठशे नव्व्याण्णव उमेदवार आहेत.
****
एकोणपन्नासाव्या
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज पणजीमध्ये समारोप होत असून आज यात प्रसिद्ध
पटकथा लेखक सलीम खान यांना विशेष जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. नऊ दिवस
चाललेल्या या महोत्सवात सदुसष्ट देशांचे दोनशे बावीस चित्रपट दाखवले गेले.
*****
चौदाव्या
हॉकी विश्वचषक स्पर्धेला आज ओडिशातल्या भुवनेश्वर इथे सुरूवात होत आहे. या स्पर्धेच्या
पहिल्या फेरीचा पहिला सामना बेल्जियम आणि कॅनडा यांच्यात संध्याकाळी पाच वाजता, तर
दुसरा सामना यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.
*****
***
No comments:
Post a Comment