Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 November 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
केवळ
अपेक्षा ठेवण्याऐवजी काही स्वीकारण्याची आणि प्रश्न नाकारण्याऐवजी चर्चेनं सोडवण्याची
भूमिका घेतली तर संवाद परिणामकारक होईल असं मत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त
केलं आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या ५०व्या भागात ते आज देशवासीयांशी संवाद साधत
होते. रेडिओ हे अतिशय व्यापक आणि परिणामकारक माध्यम असल्यामुळे २०१४ साली प्रधानसेवक
झाल्यानंतर देशातल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी रेडिओचा वापर करायचं
निश्वित केलं, असं ते म्हणाले. ‘मन की बात’मुळे समाजात सकारात्मकता वाढीस लागली, अनेक
सामाजिक उपक्रम आणि चळवळी निर्माण झाल्या. हा कार्यक्रम राजकारणापासून अलिप्त रहावा
यासाठी केलेल्या प्रयत्नांना देशवासीयांनी साथ दिली असं ते म्हणाले. ‘सेल्फी विथ डॉटर’,
स्वच्छता, रस्ते सुरक्षा, अंमली पदार्थ मुक्त भारत अशा विविध उपक्रमांत आपणहून पुढाकार
घेत सहभागी झालेल्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. या कार्यक्रमात सहभागी होणारे
नागरिक पंतप्रधानांशी नाही, तर निकटवर्तीयांशी बोलण्याच्या भावनेनं विचार मांडतात ही
गोष्ट महत्त्वाची असून, लोकांचे विचार आणि त्यांची पत्रं ह्यामुळे हा कार्यक्रम समृद्ध
होत गेला, असं मतही पंतप्रधानांनी व्यक्त केलं.
****
राम
मंदीर हा कोणासाठीही राजकीय विषय नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. सातारा इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं, ते अयोध्येत गेल्याचा आम्हाला आनंदच असल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले.
****
दरम्यान,
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या
कराड इथल्या चव्हाण यांच्या प्रीतीसंगम समाधी स्थळावर मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण
करून अभिवादन केलं.
सोलापूर
शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनंही शहरातल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
गोवर
आणि रुबेला लसीकरण मोहिमेला परवा २७ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. औरंगाबाद शहरात
१३० आरोग्य सेविकांमार्फत दीड महिना ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेच्या नियोजनासंदर्भात
महापालिका आयुक्त डॉ.निपुण विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी
डॉ.नीता पाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ३३ आरोग्य केंद्रं, तसंच छावणी,
एम जी एम महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी शाळा याठिकाणी लसीकरण मोहीम राबवण्यात
येणार आहे. तसंच बाह्य लसीकरण सत्र आणि मोबाईल टीम द्वारे उर्वरित लाभार्थ्यांना लसीकरण
करण्यात येणार आहे.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या कोळसा इथले ग्रामसेवक गोपाळ बेंगाळ यांच्या मृत्यू
प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीकडे सोपवण्यात आला असून, याबाबतचे आदेश
पोलिस महासंचालक कार्यालयानं काढले आहेत. त्यानुसार आज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व
कागदपत्रे ताब्यात घेतली. कोळसा इथल्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं
शुक्रवारी छापा टाकला होता, त्यात बेंगाळ यांचाही समावेश होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात
घेतल्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला.
****
देशभरात
उद्या संविधान दिवस साजरा केला जाणार आहे. भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, या
उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्तानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व शासकीय,
निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधानाचं सामुहिक वाचन करण्याचं आवाहन सामाजिक न्याय विभागाच्या
सहायक आयुक्तांनी केलं आहे. तसंच उद्यापासून ते दोन डिसेंबर पर्यंत संविधान सप्ताह
साजरा करण्यात येणार आहे.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनी इथं झालेला तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं सहा
गडी राखून जिंकत मालिकेत एक - एकनं बरोबरी साधली आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं
प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, त्यांनी २० षटकांत सहा बाद १६४ धावा केल्या. कृणाल पंड्यानं
चार, तर कुलदीप यादवनं एक गडी बाद केला. भारतीय संघानं कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद
६१ धावांच्या बळावर विजयासाठी असलेलं १६५ धावांचं लक्ष्य विसाव्या षटकात पूर्ण केलं.
शिखर धवननं ४१, रोहित शर्मानं २३, दिनेश कार्तिकनं २२ धावा केल्या. टी ट्वेंटी सामन्यांच्या
मालिकेनंतर दोन्ही संघात चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना सहा डिसेंबरपासून
ॲडलेड इथं खेळला जाणार आहे.
****
लखनौ
इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या
सायना नेहवालला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. आज झालेल्या उपान्त्य सामन्यात
चीनच्या हान यु नं सायनाचा २१ - १८, २१ - आठ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment