आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज ‘हायसिस’ या पृथ्वी निरीक्षक अत्याधुनिक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र
प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी नऊ वाजून ५८ मिनिटांनी पीएसएलव्ही
सी ४३ या अवकाशयानाद्वारे आठ
देशांच्या इतर ३० उपग्रहांसह ‘हायसिस’चं प्रक्षेपण करण्यात आलं. इस्रोचं हे सर्वात
दीर्घ प्रक्षेपण असून, हा उपग्रह पाच वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत राहील.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मागसवर्गीय आयोगानं दिलेल्या
अहवालावरच्या ‘कृती अहवालासह’ विधेयक आज राज्य सरकार विधीमंडळात मांडणार आहे. आरक्षण
देताना कुठल्याही कायेदशीर किंवा तांत्रिक त्रुटी राहू नयेत या दृष्टीनं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह अन्य कायदेतज्ज्ञांसोबत
चर्चा केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचीही काल बैठक झाली. आज सकाळी पुन्हा या
समितीची बैठक होत असून, त्यानंतर हे विधेयक विधीमंडळात मांडलं जाईल.
****
लातूर महापालिकेकडून होत असलेली अवाजवी कर आकारणी रद्द करण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांच्या
शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांकडे काल केली. ही
महापालिका ‘ड‘ वर्गातली असूनही सध्या केली जाणारी कर आकारणी ही अधिक असल्याचं व्यापाऱ्यांनी दिलेल्या
निवेदनात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद इथं काल विश्व हिंदु परीषदेतर्फे ‘हुंकार
सभा’ घेण्यात आली. परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक यांनी या सभेला मार्गदर्शन
केलं.
****
एक हजार रुपयांची लाच घेतांना परभणी जिल्ह्यातल्या
केसापुरी इथल्या तलाठी स्वाती घुगेसह अन्य एकाला काल अटक करण्यात आली. तक्रारदाराची
जमीन पत्नीच्या नावे करून नवीन फेरफार करण्यासाठी स्वाती घुगेनं ही लाच मागितली होती.
बीड इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली.
****
पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल भुवनेश्वर
इथं झालेल्या सलामीच्या सामन्यात यजमान भारतानं दक्षिण अफ्रिकेवर पाच -शुन्यनं मात
करून शानदार विजय मिळवला. यात भारताच्या सिमरनजितसिंगनं दोन गोल केले. भारताचा पुढील
सामना बेल्जियम सोबत येत्या दोन डिसेंबरला होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment