Friday, 30 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.11.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे ५०० कोटी रुपये निधीचा प्रस्ताव पाठवला असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. या निधीव्यतिरिक्त राज्य सरकारनं पुरवणी मागण्यांमध्ये दोन हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचं ते म्हणाले. सभागृहात दुष्काळासंबंधी चर्चेला ते उत्तर देत होते. दुष्काळ घोषित करण्यासंबंधी केंद्र सरकारचे नियम चुकीचे असल्याचा आरोप विरोधी पक्ष सदस्यांनी केला. त्यावर बोलताना पाटील यांनी, केंद्राच्या निकषाव्यतिरिक्त राज्य सरकारनंही वेगळे निकष तयार करुन जास्त मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याचं सांगितलं. राज्यात ज्या भागात दुष्काळ जाहीर केला, त्या भागातला विद्यार्थी राज्यात कुठेही शिक्षण घेत असला तरी त्याला शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. सरकारनं विद्यार्थ्यांचं निम्मं शुल्क याआधीच भरलं असल्याचं पाटील यांनी सांगितलं. दुष्काळामुळे काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून, दुष्काळी कालावधीतल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांचं विजेचं बील सरकार भरणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. जनावरांसाठी चारा छावणीबाबतीतही सरकारनं नियोजन केल्याचं ते म्हणाले.

****

राज्यात अवैध वाळू तस्करी प्रकरणी कडक कारवाई करण्यात येते असून, अवैध वाळू रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या मौजे इंदलगाव इथल्या जप्त वाळूसाठा प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, असं ते म्हणाले. सदस्य विनायक मेटे यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती.

****

राज्यातल्या आजी, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी, योजनांच्या अंमलबजावणीसाठी तसंच त्यांच्या सन्मानासाठी शासन कटिबद्ध आहे, असं माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सदस्य सतेज पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. युद्धात धारातीर्थ पडलेल्या सैनिकांना देण्यात येणारी रक्कम वाढवून २५ लाख करण्यात आली असून, ही रक्कम ४८ तासांच्या आत सन्मानानं परिवारास सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले, त्याचप्रमाणे वीर पत्नी विधवांना मिळणारी तीन हजार रुपयांची पेंशन वाढवून सहा हजार करण्यात येणार असल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं.

****

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेअंतर्गत राज्यात रस्त्यांमधल्या अपघातांमध्ये जखमी झालेल्या आणि तत्काळ वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्या व्यक्तीस तात्काळ उपचार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधान परिषदेत दिली. अशा रुग्णांना ७४ उपचारांच्या वैद्यकीय सेवा नजीकच्या अंगीकृत रुग्णालयामधून पहिल्या ७२ तासांसाठी देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

****

शाळांच्या पटपडताळणी मोहिमेमध्ये बोगस पटसंख्या दाखवून गैरप्रकार केलेल्या शाळांवर येत्या दोन महिन्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यातल्या शाळांमध्ये ‘सरल’ प्रणालीद्वारे सर्व विद्यार्थ्यांची माहिती आधार क्रमांकाशी जोडणी करुन भरण्यात येत आहे. त्यामुळे बोगस पटसंख्या दाखविण्यास वाव राहिलेला नाही, असं ते म्हणाले. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजच्या कामकाजानंतर संस्थगीत करण्यात आलं. पुढील अधिवेशन १८ फेब्रुवारी २०१९ला सुरू होणार आहे.  

****

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर ऑल इंडीया मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन - एआयएमएम पक्ष मुस्लीम आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. पूर्वीच्या काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देतानाच मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण जाहीर केलं होतं. एआयएमएमचे आमदार इम्तीयाज जलील यांनी विधीमंडळ परिसरात आज पत्रकारांना ही माहिती दिली. आपला पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाविरुद्ध नाही पण मुस्लिमांना सुद्धा हा निकष लागू केला पाहिजे, असं ते म्हणाले.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथले अतिरिक्त विस्तार अधिकारी बालाजी गोरे याना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज अटक करण्यात आली. घरकूल योजनेच्या यादीत लाभार्थीचं नाव समाविष्ट करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

राज्यात सर्वत्र गोवर रुबेला लसीकरण मोहीमेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, परभणी जिल्ह्यात तीन दिवसांत ४६ हजार २०१ बालकांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. लसीकरणानंतर एकाही बालकावर गंभीर दुष्परिणाम झाला नसून, पालकांनी आफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.

****

No comments: