Tuesday, 27 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.11.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 November 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 राज्य विधीमंडळाच्या याच हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात कायदा केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. मराठा आणि धनगर समाजाला नियमानुसारच आरक्षण दिलं जाईल, असं ते म्हणाले. विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करण्याच्या मुद्यावर विरोधक ठाम राहीले., यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली. हा अहवाल तात्काळ सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अहवाल मांडला नाही, तर सभागृहाचं कामकाज होऊ देणार नाही, अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी दिला. धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचं विधेयक आणण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, कामकाज सुरु होण्यापूर्वी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये मराठा आरक्षणाच्या अहवालासंदर्भात बैठक झाल्याचं वृत्त आहे.

****



 देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांची निवड झाली आहे. सध्याचे आयुक्त ओम प्रकाश रावत येत्या शनिवारी पदावरुन निवृत्त होत आहेत. याबाबतची अधिकृत सूचना लवकरच जारी होईल, असं सूत्रांनी सांगितलं. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अरोरा यांची निवडणूक आयुक्तपदी नेमणूक झाली होती. १९८० सालच्या राजस्थान केडरचे प्रशासकीय अधिकारी असलेले अरोरा यांनी वित्त, वस्त्रोद्योग मंत्रालय तसंच नियोजन आयोगाचं यापूर्वी काम पाहिलं आहे.

****



 भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रो येत्या गुरुवारी पीएसएलव्ही - सी ४३ या उपग्रह प्रक्षेपण यानाचं प्रक्षेपण करणार आहे. हे रॉकेट पृथ्वीचं निरीक्षण करणा-या हिसइस उपग्रहाबरोबरच इतर ३० उपग्रह अवकाशात नेणार असून, त्यापैकी २३ उपग्रह अमेरिकेचे आहेत. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन पीएसएलव्हीचं हे प्रक्षेपण केलं जाईल. ‘हिसइस’ हा या मोहिमेचा प्राथमिक उपग्रह असून, तो पाच वर्षे काम करेल, अशी अपेक्षा आहे.

****



 मध्य प्रदेश आणि मिझोराम विधानसभेसाठी उद्या मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत असून या निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी संपला. भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष तसंच जाती आधारित वाटा प्रणालीला विरोध करणाऱ्या एका नव्या संघटनेनं मध्यप्रदेशमधील सर्व २३० जागांवर उमेद्वार उभे केले आहेत. राज्यात पाच कोटींपेक्षा अधिक मतदार आहेत.

****



 गोव्यामध्ये सुरु असलेल्या एकोणपन्नासाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात उद्या प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना इफ्फी विशेष जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

****



 २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी सुनावणी करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयात येत्या तीन डिसेंबरपासून साक्षीदारांच्या साक्षी होणार आहेत. या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सात आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. न्यायालयानं सात आरोपींविरुद्ध दहशतवादी कारवाया, गुन्हेगारी कट आणि हत्येचा आरोप निश्चित केला आहे.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या नवउद्योजकांकडून मुद्रा बँक योजनेसाठी सादर होणारे अनेक कर्ज प्रस्ताव पुरेशा माहितीअभावी अपूर्ण असतात आणि त्यामुळे बँकांकडून नाकारले जातात असं दिसून आल्यामुळे, बेरोजगार होतकरू तरुणांना याबाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी औरंगाबादमध्ये मुद्रा योजना समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे हा कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षात सेवानिवृत्त बँक अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या पैनगंगा नदीच्या पात्रात इसापूर धरणाचं पाणी तात्काळ सोडावं, या मागणीच्या पाठपुराव्यासाठी विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेचे अध्यक्ष  भागवत देवसरकर यांनी काल विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन, पैनगंगेच्या पाणीप्रश्नसंदर्भात त्यांना सविस्तर माहिती दिली. विखे पाटील यांनी यावर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी चर्चा केली असून, याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा असल्याचं देवसरकर यांनी आकाशवाणीच्या वार्ताहराला सांगितलं.

****



 चौदाव्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचं आज संध्याकाळी भुवनेश्वर इथं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होईल. स्पर्धेत १६ संघ असून बेल्जियम, कॅनडा, दक्षिण आफ्रिकेसह भारताचा पूल-सी मध्ये समावेश आहे. उद्या संध्याकाळी सात वाजता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 

*****

***

No comments: