Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 November 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
काँग्रेस
सरकारच्या काळात लोकांचा ‘सरकार’ या संस्थेवरचा विश्वास उडाला होता, मात्र गेल्या साडेचार
वर्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं तो परत मिळवला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री
राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज भोपाळ इथं वार्ताहरांशी बोलत होते. सायबर गुन्ह्यांचा
सामना करण्यासाठी ‘आय-फोर-सी’ ही नवी प्रणाली लवकरच कार्यरत होणार असून, सायबर पोलिस
दलही उभारण्यात येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
****
कोरेगाव
- भीमा हिंसा प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप असलेले मानवाधिकार कार्यकर्ते
गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे आणि धर्मगुरू स्टॅन स्वामी यांना उद्यापर्यंत अटक करू नये,
असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले. या तिघांच्या, अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर
उद्या सुनावणी होणार आहे. या आरोपपत्रात इतर अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांची नावं
असून, त्यापैकी अरुण फरैरा, वर्नन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि पी. वरवरा राव हे
पोलिसांच्या ताब्यात आहेत, नवलखा यांची दिल्ली उच्च न्यायालयानं स्थानबद्धतेतून मुक्तता
केली आहे, तर, तेलतुंबडे आणि स्वामी यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही.
****
मराठा
समाजाला आरक्षण कोणत्या कोट्यातून द्यायचं यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या
शिफारशी विधीमंडळासमोर मांडण्याची प्रक्रिया सुरू आहे, असं आज राज्य शासनानं मुंबई
उच्च न्यायालयाला सांगितलं.
****
आदिवासींसाठी
वन हक्क कायदा लागू करणं, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी यासह अन्य मागण्यांसाठी
आदिवासी आणि शेतकऱ्यांचा मोर्चा आज सकाळी ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं निघाला आहे. मॅगेसेसे
पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चात ठाणे
आणि भुसावळ जिल्ह्यातले आदिवासी आणि मराठवाड्यातले शेतकरी सहभागी झाले आहेत. लोकसंघर्ष
मोर्चा या संघटनेच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा उद्या सकाळी विधानभवनावर पोचण्याची
शक्यता आहे.
****
राज्य
महानिर्मिती कंपनीच्या वीज निर्मिती क्षमतेमध्ये वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य भारनियमन
मुक्त झालं आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधार कंपनीचे संचालक
विश्वास पाठक यांनी आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री सौर ऊर्जेच्या
माध्यमातून कृषी पंपधारक शेतकऱ्यांना दिवसा सलग आठ तास वीज पुरवण्याचा प्रस्ताव शासनाच्या
विचाराधीन असल्याचंही त्यांनी सांगितलं. एलईडी बल्बच्या वापरामुळं राज्यात अकराशे कोटी
रूपयांची बचत झाल्याची माहिती पाठक यांनी यावेळी दिली.
****
आज
जागतिक मत्स्यव्यवसाय दिवस आहे. जगभरातले मच्छिमार समुदाय आजचा दिवस विविध कार्यक्रमांनी
साजरा करतात. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी मस्त्य व्यवसायाशी संबंधित
लोकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राज्यात
वाढत्या सायबर गुन्ह्यांनी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलं असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली
आहे. यातले सर्वात जास्त गुन्हे मुंबईत घडत असल्याचं या उत्तरात म्हटलं आहे. राज्यात
त्रेचाळीस सायबर पोलिस स्थानकं निर्माण केली असल्याचं आणि त्यातली छत्तीस कार्यरत झाली
असून उरलेली लवकरच कार्यरत होणार असल्याचंही या उत्तरात म्हटलं आहे. यावर्षीच्या ऑगस्ट
महिन्यात, पुण्यातल्या कॉसमॉस बँकेच्या सर्वरवर सायबर गुन्हेगारांनी हल्ला करून चौऱ्याण्णव
कोटी रुपये दोन दिवसात काढल्याच्या घटनेचा उल्लेख करत, संभाव्य सायबर हल्ले आणि डेबिट
कार्डसचा गैरवापर, याची बँकांना माहिती देण्यासाठी एक नॉलेज हब उभारण्याची प्रक्रिया
सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी या उत्तरात सांगितलं आहे.
****
वर्धा
जिल्ह्यातल्या पुलगाव आयुध निर्माण परिसरात झालेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी
अशी मागणी संरक्षण मंत्रालयाकडे तसंच या घटनेतल्या मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना
तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याची माहिती वर्ध्याचे खासदार रामदास
तडस यांनी दिली आहे. आपण या घटनेची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना
सविस्तर माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सातत्यानं
जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, हे लवकरच
घटनास्थळाला भेट देणार असल्याचं तडस यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment