Wednesday, 28 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.11.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 November 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

 महिला सुरक्षेशी संबंधित सगळ्या खात्यांची लवकरच बैठक घेणार असून आश्रमशाळा आणि वसतीगृहांवर देखरेख ठेवण्याऱ्या पथकांची स्थापना करण्याबाबत त्यामध्ये विचार केला जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी गळ्यात घालण्याकरता पदकासारखं उपकरण तयार करण्याचा विचार करण्यात येत असून, त्याद्वारे पोलिसांची तत्काळ मदत उपलब्ध होईल, अशी यंत्रणा उभारण्याचं, तसंच अशी योजना राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं. दरम्यान, नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केल्यानंतर त्यांनी हे नमुद केलं.

****

 विदर्भातल्या बहुचर्चित सिंचन गैरव्यवहाराची चौकशी निष्पक्षपणे आणि पारदर्शीपणे सुरू असून, सरकार याप्रकरणी सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. या घोटाळ्याला तत्कालीन अधिकारी, मंत्र्यांसह माजी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री अजित पवार जबाबदार असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं न्यायालयाला सांगितल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारवर टीका केली होती, त्यानंतर महाजन यांनी ही माहिती दिली. दरम्यान, न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास असून, या प्रकरणाच्या चौकशीला आपण पूर्ण सहकार्य करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

****

 मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं  मतदान आज सकाळपासून सुरू आहे. सुरुवातीच्या तीन तासांमध्ये मध्यप्रदेश मध्ये  पंधरा टक्क्याहून जास्त मतदान झाल्याचं, तर मिझोरम मध्ये सुरुवातीच्या चार तासात एकोणतीस टक्क्यांहून जास्त मतदान झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश आणि मिझोराम मधील या निवडणुकीत प्रामुख्यानं युवकांचं अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी आवाहन केलं आहे.

****



 राजस्थान आणि तेंलगनामधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. दोन्ही ठिकाणी एकाच टप्प्यात सात डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये २०० आणि तेलंगनामध्ये ११९ जागा आहेत. छत्तीसगड, मध्यप्रदेश, मिजोराम, राजस्थान आणि तेलंगना या पाचही राज्यांतील मतमोजणी येत्या ११ डिसेंबर रोजी होईल.

****


 देशातल्या वाढत्या स्टार्ट उप उद्योगांची सूची तयार करण्याच्या दृष्टीनं भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक सर्वेक्षण हाती घेतलं आहे. बँकेनं काल मुंबईमध्ये एक पत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. या उद्योगांची एकूण उलाढाल, नफाक्षमता आणि मनुष्यबळ यांचा पूर्ण तपशील या सर्वेक्षणातून हाती येणार असून, या उद्योगांना येणाऱ्या समस्यांचीही माहिती यातून मिळेल, असं बँकेनं याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे. या सर्वेक्षणात सहभागी होता यावं, यासाठी बँकेनं सगळ्या नोंदणीकृत स्टार्ट उप उद्योगांना यासाठीचा अर्ज पाठवला आहे.

****

 लष्कर ए तोयबा या कुख्यात अतिरेकी संघटनेचा सदस्य अतिरेकी नावीद जुट्ट हा काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत मध्ये मारला गेल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. या चकमकीत अजून एक अतिरेकी ठार झाला असून, सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाल्याचंही वृत्त आहे.

****

 भारताच्या अत्याधुनिक हायसिस या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठीची उलट गणती आज पहाटे पाच वाजून अट्ठावन्न मिनिटांनी सुरू झाली. उद्या सकाळी नऊ वाजून अट्ठावन मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथून पीएसएलव्हीसी ४३ या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अवकाशात पोचवला जाईल. भूभागाच्या निरीक्षणाचं काम हा उपग्रह करणार असून, आठ देशांचे तीस अन्य उपग्रहही या उपग्रहासोबत  प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.

*****

***

No comments: