Tuesday, 27 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.11.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७  नोव्हेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 जम्मू काश्मीरमधील पुलगाम जिल्ह्यातील रेडवानी भागामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले तर सैन्य दलाच्या एका जवानाला वीरमरण आलं आहे. अन्य एका कारवाईत तरालमध्ये दोन ते तीन दहशतवाद्यांना कोंडीत पकडण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही ठिकाणी सुरक्षा दलांची मोहीम सुरू आहे.

****



 गोवर आणि रुबेला या आजारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आजपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. नऊ महिने ते पंधरा वर्षाखालच्या सुमारे तीन कोटी अडोतीस लाख मुलांना लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. लसीकरणाच्या पहिल्या सत्रात म्हणजेच पहिल्या दोन आठवड्यांमध्ये सगळ्या शाळा, आणि त्यापुढच्या दोन आठवड्यांमध्ये आणि अंगणवाड्यांमध्ये, तसंच फिरत्या पथकांमार्फत लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.

****



 स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यू हे साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी अभ्यास गटाची नेमणूक करुन संशोधन आणि उपाययोजना केल्या जातील, असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात काल विधानसभेत मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सावंत यांनी ही माहिती दिली. डास नियंत्रणासाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापनाअंतर्गंत विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 रौप्यमहोत्सवी पोलिस क्रीडा स्पर्धेचा काल लातूरमध्ये पोलिस अधीक्षक राजेंद्र माने यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या स्पर्धेमध्ये नांदेड परिक्षेत्रीय पोलिस विभागातल्या नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यातल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. येत्या तीस तारखेला या क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे.

****



 कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल परभणीत वार्ताहरांशी बोलतांना व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामावर जनतेचा विश्वास असल्याचं नमूद करत, समविचारी पक्षांनी या निवडणुकीत एकत्र यावं, अशी इच्छाही दानवे यांनी यावेळी व्यक्त केली.

*****

***

No comments: