Saturday, 24 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.11.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24  November 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ नोव्हेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



v मानवलोकचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया यांचं निधन

v ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड

v महायुतीत शिवसंग्रामला दिलेली राजकीय आश्र्वासनं पाळली गेली नसल्याची पक्षाध्यक्ष आमदार विनायक मेटे यांची खंत

v जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सोनिया चहल आणि मेरी कोम आपापल्या गटात अंतिम फेरीत

 आणि

v महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून पराभव

****



 बीड जिल्ह्यातल्या मराठवाडा नवनिर्माण लोकायत- मानवलोक या संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया यांचं काल रात्री अंबाजोगाई इथं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. बाबुजी या नावानं ते सर्वत्र परिचित होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. राष्ट्र सेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशॅलिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनांमध्ये त्यांनी काम केलं. जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे आणि संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होती. मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशकं विविध सामाजिक उपक्रम राबवले. मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचवलं. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित आणि परित्यक्त्या महिलांना आधार दिला. किल्लारी भूकंपाच्या काळात त्यांनी आपल्या सहकार्यांसह दिवसरात्र काम करून या भागातील पिडीतांचे संसार नव्याने उभे केले. ‘कधी न थांबलो’ आणि ‘गाव झिजत आहे’ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असोसिएशनतर्फे सामाजिक कार्यासाठीचा पुरस्कार, औरंगाबादच्या परिवर्तन संस्थेच्या वतीने पदमविभूषण अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आदी पुरस्कारांनी लोहिया यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता मानवलोकच्या मुख्य कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 राज्यात पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत ३० हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार करण्याचं उद्दीष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नागपूर इथं काल भारतीय रस्ते परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हे रस्ते तयार करण्यात येत असून, प्रस्तावित ३० हजार किलोमीटर पैकी १० हजार किलोमीटर रस्त्यांचं काम पूर्ण झालं असल्याचं, ते म्हणाले. राज्यातल्या रस्त्यांच्या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून गेल्या चार वर्षात एक लाख कोटी रुपये मिळाल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****



 ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या नाट्यसंमेलनाचं ठिकाण अजून जाहीर झालेलं नाही, मात्र लवकरच नागपूर, लातूर, पिंपरी चिंचवड या ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. नाट्यसंमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करुन अंतिम निर्णय घेईल.

****



 शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय अयोध्या दौऱ्याला आजपासून सुरूवात होणार आहे. आज सायंकाळी ठाकरे शरयू नदीच्या किनारी सायंकाळी पाच वाजता महाआरती करणार आहेत. याचवेळेस राज्यातही ठिकठिकाणी आरती करण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यातून हजारो  कार्यकर्ते अयोध्येत दाखल झाले आहेत.

****



 महायुतीत सहभागी झाल्यानंतर शिवसंग्रामला दिलेली राजकीय आश्र्वासनं पाळली गेली नसल्याची खंत या पक्षाचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना व्यक्त केली. पक्षाचा सतरावा वर्धापन दिन येत्या सहा जानेवारी रोजी औरंगाबादच्या आमखास मैदानावर महामेळावा घेऊन साजरा केला जाईल. त्यात पक्षाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असं ते म्हणाले. राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला अहवाल सरकारनं स्वीकारलेला नाही, पण शिफारसी स्वीकारल्या आहेत, त्यामुळे आरक्षण नाकारणं कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारला परवडणार नाही, असं आमदार मेटे यांनी यावेळी नमूद केलं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद  स्पर्धेत भारताच्या सोनिया चहल हिनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत ५७ किलो वजनी गटात सोनियानं उत्तर कोरियाच्या सोन वा जो हिला पराभूत केलं. यापूर्वी ४८ किलो वजनी गटात भारताची मेरी कोम अंतिम फेरीत पोहोचली आहे.



 दरम्यान, सिमरनजीत कौरला ६४ किलो वजनी गटात कास्यदक मिळालं आहे.

****



 महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला. नाणेफेक जिंकून  प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव २० व्या षटकात सर्वबाद ११२ धावांमध्ये संपुष्टात आला. विजयासाठी इंग्लडनं हे आव्हान दोन गड्याच्या मोबदल्यात १८व्या शतकात पूर्ण केलं.



 उद्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत होणार आहे.

****



 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथला दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना काल पावसामुळे रद्द करण्यात आला. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं ऑस्ट्रेलियाला फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियानं १९ षटकांत सात बाद १३२ धावा केल्या होत्या, तेंव्हा पावसाला सुरुवात झाली. नंतर पाऊस न थांबल्यानं सामना रद्द करण्यात आला.

****



 लातूर ते कुर्डुवाडी रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामाला गती आली असून, पुढच्या दिड वर्षात विद्युतीकरणाचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा यांनी दिली. लातूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी विविध उपक्रमाचा शुभारंभ काल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लातूर ते मुंबई आणखी एक नवीन रेल्वे सुरु करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं महाव्यवस्थापक शर्मा यांनी यावेळी सांगितलं.

****



 औरंगाबाद जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी चांगली होत आहे. या योजनेचा लाभ मिळाल्याने सावंगी इथल्या प्रसाद कुलकर्णी यांनी  आनंद व्यक्त केला आहे.

माझं नाव प्रसाद कूलकर्णी. मी सारा परिवर्तन हाऊसिंग सोसायटी, सांवगी परिसर, औरंगाबाद येथे फ्लॉट घेतला होता. आणि जवळपास एक वर्षांपूर्वी मी फ्लॉट घेतला होता. आणि खरेदी खतानंतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मला जवळपास  रजिस्ट्रेशन नंतर ३ महिन्यातचं माझ्या खात्यावर २लाख ६७हजार रूपये जमा झाले. आणि माझा हप्ता २हजार ३०० रूपयांनी  कमी झाला. स्वःताचं घर घेण्याचा आणि स्वताः च्या घरात मध्ये राहण्याचा आनंद मिळालेला आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे खूप-खूप आभार.

****



 लातूर महानगरपालिकेचे महापौर सुरेश पवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन बेकायदा बांधकाम करत महापालिकेची फसवणूक केली असल्याचा आरोप करुन  त्यांना अपात्र घोषित करावं अशी मागणी काँग्रेस पक्षाच्यावतीनं करण्यात आली आहे. पवार यांनी आपल्या निवासस्थानी दिलेल्या बांधकाम परवान्यापेक्षा अधिकचे बांधकाम करुन तसंच परवान्यासाठी आवश्यक असलेला कर नाममात्र भरुन महापालिकेची जवळपास ६१ हजार ५२५ रुपयांची कथित फसवणूक केल्याची माहिती नगरसेवक स्मिता खानापुरे, अशोक गोविंदपूरकर यांनी वार्ताहर परिषदेत दिली. यासंदर्भात सोमवारी आयुक्तांना निवेदन देणार असल्याचं गोविंदपूरकर यांनी सांगितलं.

*****

***

No comments: