Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
§
मराठा आरक्षणासंदर्भात मागसवर्गीय आयोगाच्या अहवालावरील ‘कृती
अहवालासह’ विधेयक आज विधीमंडळात सादर होणार.
§
विधान
परिषदेत राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर चर्चा;
केंद्राकडून विशेष निधी मंजूर करून घेण्याची मागणी
§
कृषी
उत्पन्न बाजार समिती अधिनियम सुधारणा विधेयक मागे; माथाडी कामगारांचं आंदोलन स्थगित
आणि
§
अफवांवर
विश्वास न ठेवता गोवर - रुबेला लसीकरणात सहभाग घेण्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत
यांचं आवाहन.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मागसवर्गीय आयोगानं दिलेल्या अहवालावरच्या ‘कृती अहवालासह’
विधेयक आज राज्य सरकार विधीमंडळात मांडणार आहे. आरक्षण देताना कुठल्याही कायेदशीर किंवा
तांत्रिक त्रुटी राहू नयेत या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाधिवक्ता
आशुतोष कुंभकोणी यांच्यासह अन्य कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ
उपसमितीचीही काल बैठक झाली. आज सकाळी पुन्हा या समितीची बैठक होणार आहे, त्यानंतर हे
विधेयक विधीमंडळात मांडलं जाईल.
दरम्यान,
मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधानसभेच्या या अधिवेशनात अधिक विचार विनिमय करण्यासाठी,
गरज भासल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात येईल, असं महसूल मंत्री आणि सभागृह नेते
चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. राज्य मागासवर्गीय आयोगाचा यासंदर्भातला अहवाल विधीमंडळाच्या पटलावर
मांडावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केल्यानंतर पाटील बोलत होते.
****
विधान परिषदेत काल राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर
चर्चा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती. दुष्काळाचा एकत्रितपणे
सामना करण्याची गरज असताना सरकार या प्रश्नाला गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप विधानपरिषदेचे
विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं
केंद्राकडून विशेष निधी मंजूर करून घ्यावा, आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,
खाजगी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा निधी सरकारनं ताब्यात घेऊन तो दुष्काळ
निवारणाच्या कामाला वापरावा, असंही मुंडे यांनी सुचवलं. राज्यातला दुध व्यवसाय, सरकारच्या
चुकीच्या धोरणांमुळे आणि दुधाला वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत ठेवल्यामुळे डबघाईला
आल्याचा आरोप करत, सरकारनं याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून योग्य धोरण राबवावं,
अशी मागणी काँग्रेस पक्षानं यावेळी केली.
****
नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्यात आल्याची
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. हा प्रकल्प रद्द करण्याची
मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केल्यानंतर त्यांनी हे नमूद केलं.
****
विधानसभेनं परवा मंजूर केलेलं कृषी उत्पन्न बाजार
समिती अधिनियम सुधारणा विधेयक काल सरकारनं विधान परिषदेत मागे घेतलं. शेतकरी, व्यापारी
आणि माथाडींच्या प्रतिनिधींची एक अभ्यास समिती स्थापन करून या विधेयकाचा अभ्यास केला
जाईल आणि त्यात सुधारणा करून नव्या कायद्यात रूपांतर केलं जाईल, असं पणनमंत्री सुभाष
देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितलं. त्यांनंतर माथाडी कामगार संघटनेचं सुरू असलेलं
बाजार समिती बंदचं आंदोलन मागं घेण्यात आलं.
****
राज्यातल्या
विविध प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या जवळपास
तीस हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शासकीय अनुदानाचा देण्यासाठी आगामी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूद करण्यात येईल, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे
यांनी काल एका निवेदनाद्वारे विधानपरिषदेत सांगितलं. त्याचप्रमाणे खासगी अनुदानित
शाळांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध, अधिवेशन
संपल्यानंतर १५ दिवसात मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरिता सादर केला जाईल, असंही
त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली
काल शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, शिक्षक
परिषदेचे अध्यक्ष आदींची बैठक विधानभवनात झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
विदर्भातल्या बहुचर्चित सिंचन गैरव्यवहाराची चौकशी
निष्पक्ष आणि पारदर्शीपणे सुरू असून, सरकार याप्रकरणी सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा
विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. या
घोटाळ्याला तत्कालीन अधिकारी, मंत्र्यांसह माजी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री अजित
पवार जबाबदार असल्याचं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं न्यायालयाला सांगितल्याच्या बातम्या
माध्यमांमध्ये आल्यानंतर, राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष
नेते धनंजय मुंडे यांनी काल सरकारवर टीका केली होती. त्यानंतर महाजन यांनी ही माहिती
दिली. दरम्यान, न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास असून, या प्रकरणाच्या चौकशीला आपण पूर्ण
सहकार्य करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची उद्या निवडणूक होणार आहे.
चार वर्षाच्या खंडानंतर विधानसभेला उपाध्यक्ष प्राप्त होणार आहे. काल या निवडणुकीची
घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज आज दुपारी पावणे बारा वाजेपर्यंत दाखल करता येतील,
त्यानंतर लगेचच या अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली.
****
पालकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता गोवर
- रुबेला लसीकरणात सहभाग घ्यावा असं आवाहन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी केलं
आहे. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी परवा राज्यातल्या सुमारे १० लाख, ७७ हजारांहून
अधिक बालकांना ही लस देण्यात आली. यापैकी सुमारे ५० बालकांना खाज येणे, पुरळ अशी लक्षणं
दिसून आली, मात्र त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या लसीमुळे
कुठलाही विपरीत परिणाम होत नाही तसंच शारीरिक दुर्बलता येत नाही असंही सावंत यांनी
नमूद केलं.
****
केंद्र
सरकारनं काल प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत एकूण २ लाख, ५
हजार ,४४२ घरं बांधण्यास मंजुरी दिली. यामध्ये
महाराष्ट्रासाठीच्या १ लाख, १६ हजार, ४२ घरांचा समावेश आहे. केंद्रीय
मान्यता आणि संनियंत्रण समितीच्या काल
नवी दिल्लीत झालेल्या ४० व्या बैठकीत
ही मंजुरी देण्यात आली. या मंजुरीनंतर राज्यात केंद्र सरकारकडून मंजुर करण्यात
आलेल्या घरांची संख्या ७ लाख, ४८ हजार, ४९९ एवढी झाली आहे.
****
महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल
राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात
त्यांना आदरांजली वाहिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद अध्यक्ष रामराजे
निंबाळकर यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद इथं औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले यांच्या
पुतळ्याला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिक तसंच महापौर नंदकुमार घोडेले
यांनी अभिवादन केलं. बीड शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं महात्मा
फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.
गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महिला
मॅरेथॉन स्पर्धा झाली.
*****
***
No comments:
Post a Comment