Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 18 November 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø केंद्र सरकार
लवकरच ई-वाणिज्य धोरण जाहीर करणार - केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू
Ø मराठा समाजाला
कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन
तर अहवाल फुटल्याच्या कारणावरून हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत आणण्याचा विरोधी पक्षनेते
राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा
Ø
दुष्काळ निवारणासाठी निश्चित कृती कार्यक्रम
हाती घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे
मागणी
Ø अॅडगुरू
अॅलेक पद्मसी यांचं निधन
आणि
Ø महिलांच्या टी-ट्वेंटी
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय
****
केंद्र सरकार लवकरच ई-वाणिज्य धोरण जाहीर करणार असल्याची
माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मुंबईत काल आयोजित केलेल्या
एका पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. उद्योग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांनी
या धोरणाचा मसुदा बनवला असून, त्याला औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्याकडून लवकरच
मंजूरी मिळेल, असंही ते म्हणाले. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आता
उद्योग सुलभतेच्या मानकांची अंमलबजावणी जिल्हा पातळीवर देखील करणार असल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं.
****
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण
देऊ, असं आश्वासन महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल विविध विकास कामांचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते झाला, त्यानंतर
ते वार्ताहरांशी बोलत होते. इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा
समाजाला आरक्षण दिलं जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
दरम्यान, वैजापूर तालुक्यातल्या शिऊर बंगला इथं शिऊर
बंगला-औराळा-चापानेर-कन्नड-हस्ता, शिऊर-येवला, आणि गंगापूर चौफुली इथं वैजापूर-गंगापूर-भेंडाळा
फाटा रस्त्यांचं भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झालं.
फुलंब्री तालुक्यातल्या सावंगी गावात विविध रस्ते
कामांचं भूमिपूजन केल्यानंतर वार्ताहरांशी
बोलतांना पाटील यांनी मराठा समाजाला देण्यात येणार आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी
राज्य सरकार वकिलांची फौज उभी करेल असं सांगितलं.
****
मराठा आरक्षणाच्या
मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचं बेमुदत उपोषण
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनांनंतर काल मागे घेण्यात आलं. महाजन
यांनी काल मुंबईत आझाद मैदान इथं जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उपोषणकर्त्यांच्या
मागण्या येत्या १५ दिवसात पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही महाजन यांनी यावेळी दिली.
****
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल
फुटला कसा? हा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नसताना आणि त्यातल्या शिफारसींची अधिकृत
माहिती नसताना मुख्यमंत्री त्याआधारे घोषणा करतात कसे? तसंच आयोगाचे सदस्य प्रसारमाध्यमांपुढे
जाऊन भाष्य करतात कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित करून यासंदर्भात हक्कभंग आणण्याचा इशारा
विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. मुंबईत आझाद मैदानावर
गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषणावर असलेले मराठा क्रांती मोर्चाचे संभाजी पाटील आणि
त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेत घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी काल ते बोलत होते.
****
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर
राज्य सरकारनं वेळीच पावलं उचलून निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी करणारं
एक पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. पवार यांनी या पत्रासोबतच
दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही मुख्यमंत्र्यांना
दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावं अशी अपेक्षाही त्यांनी
व्यक्त केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या
‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५०वा
भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक
एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र
मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जाहिरात श्रेत्रात मोठं नाव असलेले अॅडगुरू अॅलेक
पद्मसी यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. पद्मसी यांनी
१९८२ मध्ये ‘गांधी’ चित्रपटात मोहम्मद अली जिना यांची व्यक्तीरेखा साकारली होती. ‘हमारा
बजाज’, ‘सर्फ’, ‘चेरी ब्लॉसम’, ‘लिरील गर्ल’, ‘फेअर अँड लव्हली’, ‘हँडसम ब्रँड’ यासह
अनेक आकर्षक जाहिराती पद्मसी यांनी बनवल्या आहेत. जाहिरातींच्या क्षेत्रात योगदानासाठी
त्यांना २००० साली भारत सरकारच्या प्रतिष्ठीत ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं
आहे.
****
जायकवाडी धरणाचं हक्काचं पाणी मिळालायच हवं त्यासाठी
सर्वपक्षीयांनी एकत्र आवाज उठवायला हवा असं मत काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी
व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं विकास महर्षी शंकरराव चव्हाण, अप्पासाहेब नागदकर
ऋणानुंबध मंचाच उद्धाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी चव्हाण बोलत होते. शंकरराव
चव्हाण यांच्या दुरदृष्टीमुळं जायकवाडी धरण झालं, असं सांगून हक्काच्या पाण्यासाठी
अंत पाहू नका असं ते यावेळी म्हणाले.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत
एकवेळ समझोतासाठी येत्या ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत
मुद्दल आणि व्याजासह १ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी
याचा लाभ घ्यावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हा उपनिबंधक, प्रवीण फडणीस यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर, मुखेड आणि उमरी या तालुक्यात दुष्काळ सदृश्य
परिस्थिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर विविध
उपाययोजना आणि सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
****
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन सर्वोतपरी
प्रयत्न करत असल्याचं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं
आहे. लातूर जिल्ह्यातल्या मौजे काटेजवळगा इथं काल विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी
ते बोलत होते. नागरिकांनी एकत्र येऊन जलसंधारणाची कामं करावी, आपला जिल्हा कायमस्वरुपी
दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
लातूर इथं काल बहुविकलांग दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी
पाच दिवसीय मोफत प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते झालं.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं लातूर जिल्ह्यातल्या कर्णबधीर, अस्थिव्यंग,
अपंगासाठी मंजूर झालेल्या साहित्याचं वाटपही यावेळी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
“प्रधानमंत्री सहज बिल हर घर योजना - सौभाग्य” योजनेअंतर्गत
आतापर्यंत गोंदिया जिल्ह्याच्या आठ तालुक्यांत ४ हजार ३६६ ग्राहकांनी या योजनेचा लाभ
घेतला आहे. जिल्ह्यातले या योजनेचे कैलाश भोयर हे एक लाभार्थी असून त्यांना आपल्या
नवीन घरासाठी सौभाग्य योजनेअंतर्गत शुल्क न भरता लाभ मिळाला आहे. या योजनेच्या लाभाविषयी
कैलाश भोयर यांनी दिलेली ही माहिती -
आपल्याकडे कनेक्शन नसल्याने शेजाऱ्याकडून विद्यूत पूरवठा घेत होतो.
मात्र, ही योजना लागू झाल्यापासून विजेच्या कनेक्शन साठी अप्लाय केला असून सद्या स्थितीत
आमच्या कडे कनेक्शन लागला. या योजनेचा लाभ मिळाला असून, आपल्याला कुठलेही पैसे भरावे
लागले नाही.
****
महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत
भारतानं ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव केला. भारतीय संघान २० षटकांत ८ बाद १६७ धावा
केल्या. स्मृती मंधावान ८३ तर कर्णधार हरमनप्रीत कौर नं ४३ धावा केल्या. उत्तरादाखल
ऑस्ट्रेलियाचा संघ ११९ धावांत तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाकडून इलियास पेरी नं नाबाद राहत
सर्वाधिक ३९ धावा केल्या. तर भारताकडून अनुजा पाटीलनं सर्वाधिक ३ बळी घेतले.
****
औरंगाबाद इथं आज ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल
सुराणा यांना स्वातंत्र्य सेनानी श्यामराव बोधनकर तर हॅलो मेडीकल फाउंडेशनच्या डॉक्टर
शुभांगी अहंकारी यांना इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी ना वि देशपांडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले
जातील.
*****
***
No comments:
Post a Comment