Monday, 19 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.11.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ नोव्हेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग निर्माण करून मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. हे आरक्षण देताना अन्य कोणत्याही आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****



 प्रबोधिनी कार्तिकी एकादशी आज साजरी होत आहे. यानिमित्त पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यातल्या ठिकठिकाणच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. आज पहाटे पंढरपूर इथं विट्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाली. दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला देत असलेलं आरक्षण न्यायालयात टिकू दे, असं साकडं विठ्ठलाच्या चरणी घातल्याचं, पाटील यांनी सांगितलं.

****



आज जागतिक शौचालय दिन पाळण्यात येत आहे. स्वच्छतेच्या समस्यांचा सामना करण्याच्या उद्देशांन जागतिक स्तरावर जागृती करण्याच्या दृष्टीनं हा दिवस साजरा केला जातो. जगभरात सुमारे साडेचार अब्ज लोक सुरक्षित शौचालयाशिवाय राहत असून सुमारे ९० कोटी लोक अजूनही उघड्यावर शौचाला जातात. भारतात मात्र, ग्रामीण भागात उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांचं प्रमाण गेल्या चार वर्षात ५५ कोटींवरुन दहा कोटीपर्यंत कमी झालं आहे.

****



 योध्येत राम मंदिर उभारण्यासाठी अध्यादेश काढण्याचा पर्याय असूनही केंद्र सरकारसह उत्तर प्रदेश  सरकार टाळाटाळ करत असल्यानं त्यांना मंदीर उभारणीत स्वारस्य नसल्याचं स्पष्ट होतं, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मंदीर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजंरग दल, शिवसेना यांनी एकत्र बसून आपापली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं.

*****

***

No comments: