Tuesday, 13 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 13.11.2018....18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

शासकीय आणि गायरान जमिनींवरही आता ‘सर्वांसाठी घरं’ ही योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियमात दुरुस्ती करण्यात येणार असून, यामुळे परवडणाऱ्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे. काम करण्यास सक्षम अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं सेवासमाप्तीचं वय ६० वरून ६५ वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आला. आरोग्य सक्षमतेचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतर प्रथम तीन वर्ष आणि पुढे आणखी दोन वर्ष सेवा करता येणार आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्याचा, तसंच पुण्याच्या गुंजवणी प्रकल्पासाठी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.

****

दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेनं अवनी वाघीणीच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.

****

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्य अग्रेसर राहण्यासाठी नॅसकॉम सोबत झालेला करार महत्वपूर्ण असून, यामुळे राज्यातल्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत उद्योगांना चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई इथं आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली नामवंत संस्था नॅसकॉमसोबत राज्य शासनाच्या उद्योग विभागानं पाच वर्षांसाठी सामंजस्य करार केला, त्यावेळी ते बोलत होते. या करारानुसार नॅसकॉमची ‘टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम’ ही परिषद पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात होणार असून, या परिषदेअंतर्गत जागतिक गुंतवणूकदार राज्यात आकर्षित होणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा फायदा सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे यावर भर दिला आहे. नवी दिल्ली इथं आज विज्ञान, तंत्रज्ञान सल्लागार परिषद सदस्यांशी ते संवाद साधत होते. देशवासीयांचं जीवन सोपं करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परिषदेच्या सल्लागारांनी शिक्षण संस्था, संशोधन, विकास प्रयोगशाळा, उद्योग आणि विविध सरकारी विभागांशी दृढ संबंध स्थापन करण्यासाठी कार्य करण्याचा पंतप्रधानांनी यावेळी आग्रह धरला.

****

केंद्रीय संसदीय कार्य मंत्री अनंत कुमार यांच्या पार्थीव देहावर आज दुपारी बंगळूरु इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह, धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांच्यासह विविध नेत्यांनी यावेळी अनंत कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली. अनंतकुमार यांचं काल बंगळूरु इथं निधन झालं, ते ५९ वर्षांचे होते.

****

माजी मुख्यमंत्री, सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.  

****

कोरेगाव-भीमा प्रकरणी राज्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना भिमा कोरेगाव दंगलीच्या चौकशी आयोगासमोर बोलवावं, अशी मागणी भारीप - बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते आज पुण्यात या प्रकरणी चौकशी आयोगात सुनावणीसाठी आले असताना बोलत होते.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मालेगाव इथं आज जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकानं अचानक धाडी टाकून १३ तंबाखू विक्रेत्यांकडून चार हजार ९०० रुपये दंड वसूल केला. जिल्हा रुग्णालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध - कोटपा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी तक्रार करण्याचं आवाहन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.पी.कदम यांनी केलं आहे.

****

धनगर समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे आज औरंगाबाद इथं कोकणवाडी ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास एक जानेवारी पासून राज्यातल्या भाजप आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन तसंच सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचा इशारा आंदोलकांचे नेते आमदार रामराव वडकुते यांनी यावेळी दिला. आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आलं.

****

उस्मानाबाद आणि तुळजापूर परिसरात आज दुपारी दोन वाजून ४४ मिनीटांनी जमिनीतून जोरदार आवाज झाला. आवाज मोठा असल्यामुळे घरांच्या खिडक्या, तावदानं हादरली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: