Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 November 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं संवाद उपग्रह जी सॅट २९ चं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.
या उपग्रहाला जीएसएलव्ही मार्क थ्री या प्रक्षेपकातून सोडण्यात आलं. आंध्र प्रदेशमध्ये
श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज संध्याकाळी पाच वाजता हे प्रक्षेपण
करण्यात आलं. जी सॅट २९ हा उपग्रह १० वर्षांपेक्षा अधिक काळ अवकाशात कार्यरत राहणार
असून, देशाच्या दुर्गम भागातली माहिती तो उपलब्ध करून देणार आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांची भेट
घेतली. संरक्षण साधनसामुग्रीच्या निर्यातीसाठी भारत एक उत्तम केंद्र बनू शकतो, यामुळे
यासाठीचे उद्योग भारतात स्थापन करण्यास अमेरिकेला मोठी संधी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी
या भेटीत केलं. तर, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताची अर्थपूर्ण भूमिका
असल्याचं सांगत, राजकीय आणि आर्थिक बाबींशी संबंधित मुद्द्यांसाठी भारतासह काम करण्यास
अमेरिका इच्छुक असल्याचं अमेरिकेचे उपराष्ट्रपती पेन्स यांनी नमूद केलं.
****
फ्रान्सकडून
राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या व्यवहाराबाबत न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा,
अशी मागणी करणाऱ्या याचिकांबाबतचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. सरन्यायाधीश
रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस.के.कौल आणि के.एम.जोसेफ यांच्या पीठासमोर या याचिकांवर
आज सुनावणी झाली. सरकार गोपनीयतेच्या मुद्याआड लपत राफेल विमानांची किंमत सांगत नसल्याचा
आरोप करत, या मुद्याची माहिती सादर करण्याची मागणी विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी केली,
तर या खरेदीची किंमत करारानुसार गोपनीय ठेवण्याची अट असल्याचं सांगत, सरकारनं गोपनीयतेच्या
मुद्याचं समर्थन केलं. या खरेदीचा तपशील जाहीर झाला तरच किमतीबाबत चर्चा होऊ शकेल,
असं स्पष्ट करत, हा तपशील जाहीर करायचा का नाही, याचा निर्णय घ्यावा लागेल, असं न्यायालयानं
म्हटलं आहे.
****
माजी
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज मुंबईतील वर्षा या आपल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं. विधान भवनातही नेहरू यांच्या प्रतिमेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे
नाईक-निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
विद्यार्थ्यांनी
अभ्यासाला महत्व देतानाच, सुप्त गुणांनाही वाव द्यावा, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे
यांनी म्हटलं आहे. बाल दिनी मुंबईतल्या जवाहर बाल भवन इथं एका कार्यक्रमात ते बोलत
होते. घरातल्या मोठ्या व्यक्तींशी मुलांचा संवाद असावा, अशी अपेक्षा व्यक्त करत, मैदानी
खेळ, नियमितपणा, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा समावेश बालकांच्या दिनक्रमामध्ये
आवश्यक आहे, असं मत तावडे यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
थोर
क्रांतीवीर लहुजी साळवे यांची आज जयंती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीवीर
लहुजी साळवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
धुळे
महापालिका निवडणुका जवळ आलेल्या असताना, भारतीय जनता पक्षात नव्यानं प्रवेश केलेल्या
नगरसेवकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. गेल्या दोन दिवसात आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह
नऊ जणांनी नगरसेवक पदाचे राजीनामे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे सादर केले
आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. येत्या
नऊ डिसेंबरला या महापालिकेची निवडणूक होणार असून, दहा डिसेंबरला निकाल जाहीर होणार
आहे.
****
परभणी
जिल्ह्यात ऑक्टोबरच्या उष्णतेनंतर आता तापमानात मोठी घट झाली असून, काल परभणीचं किमान
तापमान नऊ पूर्णांक पाच दशांश सेल्शियस, इतकं नोंदलं गेलं. हे तापमान राज्यातलं कालचं
सर्वात कमी तापमान होतं. आज परभणीचं तापमान दहा अंश सेल्शियस इतकं नोंदलं गेल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शासनानं
केरोसिन घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून गॅस जोडणी नसल्याबद्दलचं हमीपत्र घेणं बंधनकारक
केलं आहे. त्यानुसार, औरंगाबाद जिल्ह्यात दोन लाख पंच्याऐंशी हजार चारशे नऊ हमीपत्रं
या महिन्यासाठी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर भारत कदम यांनी
दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. हमीपत्रं चुकीची निघाल्यास संबंधितांवर
कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment