Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01 January 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कपात; अनुदानित
सिलिंडर सहा रूपये ५२ पैसे तर विना अनुदानित सिलिंडर १३३ रूपयांनी स्वस्त
Ø ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांचे
आरोप - प्रत्यारोप
Ø तिहेरी तलाक विधेयक छाननीसाठी संसदीय निवड समितीकडे पाठवण्यावर विरोधी पक्ष
ठाम
आणि
Ø दारु पिऊन वाहन चालवल्यास, वाहन परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा राज्य
रस्ता सुरक्षा परिषदेचा निर्णय
****
घरगुती वापराच्या
गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. या कपातीनुसार आता अनुदानित १४ किलो दोनशे
ग्रॅमच्या सिलिंडरची किंमत सहा रूपये ५२ पैशांनी कमी झाली आहे, तर विना अनुदानित सिलिंडरचा
दर १३३ रूपयांनी कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव घटल्यामुळे तसंच डॉलरच्या
तुलनेत रूपयाचे मूल्य वधारल्यामुळे, गेल्या सहा महिन्यानंतर प्रथमच गॅसच्या दरात कपात
झाली आहे. मध्यरात्रीपासून ही दरकपात लागू झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक व्यवहार समितीनं
उज्ज्वला योजनेचा विस्तार करून देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मोफत घरगुती गॅसचं कनेक्शन
उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, असं तेल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.
****
ऑगस्टा वेस्टलँड
हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षानं
काल वार्ताहर परिषदा घेत एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना, ख्रिश्चियन मिशेल हा या प्रकरणातला महत्त्वाचा
संशयित असल्याचं नमूद करत, त्यानं गांधी परिवारातल्या व्यक्तींची नावं उघड करणं आणि
काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचं वकीलपत्र घेतल्या संदर्भात, काँग्रेस पक्षानं स्पष्टीकरण
द्यावं अशी मागणी केली. या व्यवहारात सव्वाशे कोटी रुपयांची दलाली दिल्याचा आणि या
आर्थिक व्यवहारातल्या एकूण रकमेचा बावन्न टक्के हिस्सा काँग्रेसच्या नेत्यांना दिला
गेल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.
दरम्यान, ऑगस्टा
वेस्टलँड कंपनीला, काँग्रेसच्याच सरकारनं काळ्या यादीत टाकलं होतं. मग याच कंपनीला
काळ्या यादीतून बाहेर काढून मेक इन इंडियाचा भाग का बनवलं असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
अशोक चव्हाण यांनी केला. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत हेाते. यासंदर्भात राज्य
आणि केंद्र सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सक्त वसुली संचालनालयाची
मदत घेऊन हे सरकार फसवे आरोप करत आहे. स्वत:चे घोटाळे झाकण्याची ही नवी पध्दत असल्याचं
चव्हाण यावेळी म्हणाले. २०१९ च्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला बदनाम करण्याचं
सरकारचं हे षडयंत्र असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
****
तिहेरी तलाक विधेयक
छाननीसाठी संसदीय निवड समितीकडे पाठवण्याची मागणी विरोधी पक्षांनी काल राज्यसभेत लावून
धरली. मुस्लीम महिलांच्या वैवाहिक हक्कांचं रक्षण करण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप सरकारनं केला. तिहेरी तलाक
विधेयकाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सदस्यांचा आणि कावेरी नदीवरील प्रस्तावित धरणाला
विरोध करत अण्णा द्रमुक पक्षाच्या सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं उपसभापती हरिवंश
सिंह यांनी आधी पंधरा मिनिटांसाठी आणि त्यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब
केलं.
****
देशातल्या २५ राज्यांनी १०० टक्के विद्युतीकरणाचं
उद्दिष्ट पूर्ण केलं आहे, असं ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी सांगितलं. आता फक्त
१० लाख ४८ घरांना वीज पुरवठा करणं शिल्लक असून ही घर आसाम, राजस्थान, मेघालय आणि छत्तीसगड
या राज्यातली आहेत, असं त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
महाराष्ट्रात १००
टक्के विद्युतीकरण झालं असून सौभाग्य योजनेत राज्यातल्या १० लाख ९३ हजार ६१४ घरांना
वीज जोडणी देण्यात आली असल्याची माहिती महावितरण कंपनीनं दिली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
नवीन वर्षाचं मध्यरात्री सर्वत्र जल्लोषात स्वागत
करण्यात आलं. मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास नयनरम्य आतिषबाजी करून, तरुणाईनं परस्परांला
नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला
नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी २०१९ हे वर्ष राज्यातल्या सर्वांना सुख,
समाधान आणि भरभराटीचं जावो तसंच आपलं राज्य प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहो, असं राज्यपालांनी
आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटले आहे.
****
दारु पिऊन वाहन चालवल्यास संबंधित वाहन चालकाचा परवाना
सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या काल झालेल्या
बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर विमा नसलेले किंवा विम्याची मुदत संपलेले वाहन रस्त्यावर
उतरवल्यास अशा वाहनांवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात
आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री आणि रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी
सांगितलं. अतिरिक्त वजन घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनांवर, न्यायालयाच्या निर्देशानुसार
थेट गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचनाही रावते यांनी दिल्या.
****
वर्ष २००३ मधल्या मुद्रांक घोटाळ्यातल्या, रेल्वे
बोगीतून २३ कोटी रुपयांचे मुद्रांक चोरी प्रकरणात आरोपी असलेले रेल्वे सुरक्षा दलातले
सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सीबीआयच्या नाशिक इथल्या विशेष न्यायालयानं काल सबळ
पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़. यातला मुख्य आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगी
याचा गेल्या वर्षी शिक्षा भोगत असताना तुरुंगात मृत्यू झाला होता.
****
पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदी काठावरच्या कोरेगाव
भीमा इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर
नागरिक इथं दाखल झाले आहेत. या ठिकाणी आज विशेष अभिवादन सभाही होणार आहे. गेल्यावर्षी
इथं झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसारात मोठ्या प्रमाणात
बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक - माध्यमिक, खाजगी
शाळा तसंच बालवाड्या नियोजित वेळेच्या दोन तास उशीरा भरवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी
जी. श्रीकांत यांनी दिल्या आहेत. हवामान खात्यानं पुढचे चार दिवस मराठवाड्यात थंडीच्या
लाटेची शक्यता वर्तवली आहे, त्यापार्श्वभूमीवर हे निर्देश दिले आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या गोवर रुबेला लस मोहिमेमध्ये
ज्या शाळा सहभाग घेणार नाहीत अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे
सादर करण्यात येईल असं जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केलं आहे. २९ डिसेंबरपर्यंत
तीन लाख, पंचावन्न हजार साठ मुला-मुलींना ही लस देण्यात आली असून एकूण उद्दीष्टाच्या
सुमारे सत्तर टक्के लसीकरण झालं आहे.
****
जालना जिल्ह्यात काल दुपारी ट्रक आणि दुचाकीच्या
अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. घनसावंगी तालुक्यातल्या कंडारी फाट्यावर हा अपघात
झाला.
****
लातूर जिल्ह्यातल्या मांजरा धरणात ३० जूनपर्यंत पुरेल
इतका पाणीसाठा आहे, मात्र मोठ्या प्रमाणावर ऊस असलेल्या गावात पाणी टंचाई भासत असल्याची
माहिती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे. ते काल मासिक वार्तालाप कार्यक्रमात
बोलत होते. जिल्ह्यात अद्याप एकही टॅंकर सुरु नाही, पण मार्च एप्रिलमध्ये टॅंकरची गरज
भासेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
*****
***
No comments:
Post a Comment