Tuesday, 1 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.01.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01  january 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जानेवारी २०१९  दुपारी १.०० वा.

****



 संरक्षण संशोधन विकास संस्था - डीआरडीओचा स्थापना दिवस आज साजरा केला जात आहे. संरक्षण क्षेत्रात संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशानं केवळ दहा प्रयोगशाळांसोबत १९५८ साली डीआरडीओची स्थापना झाली होती. क्षेपणास्त्रासह इतर अनेक संरक्षण साधनांनी देश आज स्वयंपूर्ण असल्याचं डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी म्हटलं आहे. विकसित देशांप्रमाणे भारतासाठी प्रगत आणि अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****



 देशभरात नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे नवीन वर्ष आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, असं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. तर उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात, एक शांत, समृद्ध आणि समावेशी जग निर्माण करण्याचा सर्वांनी नवीन वर्षाचा संकल्प करावा, असं आवाहन केलं आहे.

****



 वस्तू आणि सेवा कर - जीएसटीचे कमी केलेले दर आजपासून लागू झाले. यामुळे चित्रपटाची तिकिटं आणि दूरचित्रवाणी संचांसह २३ वस्तू आणि सेवा आजपासून स्वस्त झाल्या आहेत. २२ डिसेंबरला झालेल्या बैठकीत जीएसटी परिषदेनं, २८ टक्के कगटाचं सुलभीकरण करताना, अनेक वस्तू या गटातून १८ टक्के कराच्या गटात आणल्या आहेत.  

****



 सार्वजनिक क्षेत्रातल्या चार बँकाना केंद्र सरकारनं एकूण १० हजार ८८२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या सात बँकांमध्ये केंद्र सरकार २८ हजार ६१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या रकमेचा भाग म्हणून काल युको बॅंकेला तीन हजार ७४ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रला चार हजार ४९८ कोटी तर सिंडिकेट बँकेला एक हजार ६३२ कोटी आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाला एक हजार ६७८ कोटी रुपये केंद्र सरकारनं हस्तांतरित केले.

****



 सरकारी बँकांच्या संचालनात सुधारणा होणं आवश्यक असल्याचं भारतीय रिर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं काल मुंबईत प्रकाशित केलेल्या सहामाही वित्तीय स्थैर्य अहवालाच्या प्रस्तावनेत दास यांनी ही बाब नमूद केली. सार्वजनिक क्षेत्रातल्या दुर्बल बँकांना पुनर्भांडवलीकरणाद्वारे आधार देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

****



 ज्येष्ठ अभिनेते लेखक कादर खान यांचं आज पहाटे सकाळी कॅनडात टोरांटो इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे आजारी असलेले खान यांच्यावर सुमारे सतरा आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. काबूल इथं जन्मलेले खान यांनी १९७३साली प्रदर्शित झालेल्या दाग या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. सुमारे तीनशे चित्रपटातून त्यांनी विविध भूमिका साकारल्या तर धरमवीर, कुली, अमर अकबर अँथोनी, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, आदी अडीचशेहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी संवाद लिहिले आहेत.

****

 भीमा - कोरेगाव लढ्याच्या विजयी दिनानिमित्त वाशिम इथल्या महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांनी स्मृति स्तंभांच्या प्रतिकृतीला अभिवादन करून सलामी दिली. दरम्यान, पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदी काठावरच्या कोरेगाव भीमा इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक दाखल झाले आहेत.

****



 सोलापूर जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातल्या ग्रामपंचायतींच्या ज्या ज्या सदस्य सरपंचानी  ग्रामपंचायत निवडणूक होऊन सहा महिन्यांच्या आत आपल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी प्रमाणपत्र सादर केलं नाही अशा पंधराशे २३ ग्रामपंचायत  सदस्य आणि काही गावच्या सरपंचांचं पद रद्द करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली. ज्या ज्या लोकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर केलं नाही अशा लोकांची येत्या पाच जानेवारीपासून सुनावणी घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर अशा सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

****



 कर्नाटकमधल्या विजयनगर इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत काल पहिल्या दिवशी दिल्लीची खुशबू टोकाज, प्रतिभा आणि आंध्र प्रदेशच्या ज्योति गोर्ली यांनी विजयी सुरुवात केली. तर ५१ किलो वजनी गटात मध्य प्रदेशची दीपिका कुमारी, उत्तर प्रदेशची मानसी शर्मा, बिहारची काजल कुमारी, महाराष्ट्राची दीया बाचे आणि राजस्थानच्या पुनमनंही आपापल्या सामन्यात विजय मिळवला.

****



 जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणात तापमानात लक्षणीय घट झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी तापमान एका अंशापर्यंत खाली घसरलं आहे.

*****

***

No comments: