Tuesday, 1 January 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01.01.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 January 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

आयुष्मान भारत ही योजना आरोग्य सेवा देणारी महत्त्वाची योजना असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. आयुष्मान भारत योजनेला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक माध्यमावर दिलेल्या संदेशात जेटली यांनी, या योजनेच्या पहिल्या शंभर दिवसात सहा लाख ८५ हजार रुग्णांना मोफत उपचार मिळाल्याचं सांगितलं. तळागाळातल्या लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचल्यावर दर वर्षी एक कोटी नागरिक याचा लाभ घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के लोकांना या योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचाराची खात्री दिली असल्याचं जेटली यांनी नमूद केलं.

****

निवडणूक रोखे विक्रीच्या सातव्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. हा टप्पा या महिन्याच्या १० तारखेपर्यंत सुरु राहणार आहे. भारतीय स्टेट बँकेत हे निवडणूक रोखे उपलब्ध असून, बँकेच्या २९ प्राधिकृत शाखांमध्ये ते मिळणार आहेत. राजकारणात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीनं राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या रोख रकमेला पर्याय म्हणून हे निवडणूक रोखे जारी करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सहाव्या टप्प्यात काही कंपन्या आणि नागरिकांनी एक हजार सत्तावन्न कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले होते.

****

सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गियांच्या कल्याणासाठी सुरु असलेल्या चार महामंडळांसाठी एकूण ३२५ कोटी रुपयांची हमी देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यामध्ये महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहीदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ आणि अपंग कल्याणासाठी सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य अपंग आर्थिक आणि विकास महामंडळाचा समावेश आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली.

राज्याच्या पर्यटन प्रसिद्धीसाठी, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित कार्यक्रमांना पर्यटन विभागाअंतर्गत प्रायोजकत्व देणारी योजनाही या बैठकीत मंजुर करण्यात आली.

****

पुणे जिल्ह्यात भीमा नदी काठावरच्या कोरेगाव भीमा इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी  अभिवादन केलं. यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आणि महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीच नागसेन कांबळे उपस्थित होते. वढू-बुद्रुक इथं जाऊन संभाजी राजांच्या समाधीचंही केसरकर यांनी दर्शन घेतलं.

****

नागपूर शहराचा मध्य भाग आणि उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. मुंबईत आज झालेल्या बैठकीत महामेट्रोच्या वतीनं नागपूर मेट्रो टप्पा दोन चं सादरीकरण करण्यात आलं. या दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे ११ हजार २१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

****

हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता, विनोदी कलाकार, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक कादर खान यांच्या निधनानं अष्टपैलू कलाकार गमावला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कादर खान यांचं आज कॅनडामध्ये टोरांटो इथं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते.

****

मुंबईच्या अंधेरी भागातल्या कामगार रुग्णालयात गेल्या महिन्यात लागलेल्या आगीत दहा जणांचे प्राण वाचवणाऱ्या मुंबई इथल्या सिद्दरामेश्वर हुमानाबादे यांचा केंद्रीय कामगार आणि रोजगार कल्याण राज्य मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी गौरव केला. मुंबईत आज झालेल्या कार्यक्रमात सिद्दरामेश्वर यांना एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं. 

****

राज्यातल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जालना जिल्ह्यातल्या बाराशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं, स्वच्छता निरीक्षकांचा राज्य संवर्ग तयार करण्यात यावा, यासह अन्य मागण्यासांठी हा संप पुकारण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातल्या चार नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींचे कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक सेवा असलेल्या पाणीपुरवठा आणि अग्निशमन दलाचे कर्मचारीही उद्यापासून या संपात सहभागी होणार असल्याचं राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे सचिव केशव कानपुडे यांनी सांगितलं.

****

राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका अजूनही कायम आहे. आज सर्वात कमी चार पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान अहमदनगर इथं नोंदवलं गेलं. नाशिक सहा पूर्णांक दोन, परभणी सात पूर्णांक पाच, औरंगाबाद आठ पूर्णांक चार, तर उस्मानाबाद इथं दहा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

//**********//


No comments: