Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 18 January 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १८ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.
****
·
सर्वोच्च
न्यायालयाकडून डान्सबारसंबंधी अनेक नियम शिथील तर
काही नियम रद्द
·
निकालावर
समाजाच्या विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया
·
मराठवाड्यात सूक्ष्म सिंचनाचं
क्षेत्र वाढवण्यासाठी ८०
टक्के अनुदानाची
घोषणा
·
महात्मा गांधी मिशन संगीत अकादमीच्या शार्ङ्गदेव
महोत्सवाला आजपासून प्रारंभ
आणि
·
भारत
आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा आणि
अंतिम क्रिकेट सामना आज
****
महाराष्ट्रातल्या डान्सबारबाबत अनेक नियम आणि अटी शिथील करत सर्वोच्च न्यायालयानं
काही नियम रद्द ठरवले आहेत. डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, बार
आणि नृत्याची जागा वेगळी करावी, आणि नृत्य
करणाऱ्या मुलींना बक्षीस देऊ नये, यासह
इतर अनेक नियम काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं रद्द केले.
डान्स बारला संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतची मर्यादा, तसंच
नृत्य करणाऱ्या मुलींवर पैसे उधळायला बंदी, या
अटी मात्र न्यायालयानं कायम ठेवल्या आहेत.
दरम्यान, हा निर्णय दुर्दैवी असून, याप्रकरणी सर्वोच्च
न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं आर. आर. पाटील फाऊंडेशनचे विनोद
पाटील यांनी म्हटलं आहे. डान्सबार मुळे अनेक गुन्हेगारी प्रवृत्ती वर येतील, अनेक कुटुंब
उध्वस्त होतील, असं पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. डान्स बार बाबतचा
२०१६ चा कायदा राज्य सरकारनं रद्द करावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी हा निर्णय
संमिश्र स्वरूपाचा असून, राज्यातल्या जनतेच्या प्रतिकूल भावनांचं प्रतिबिंब या
निकालात नसल्याचं म्हटलं आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखत, या
निकालाच्या अधीन राहूनच डान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पुन्हा सुरू
होणार नाही, असाच प्रयत्न राज्य सरकारचा असेल, असं
एका निवेदनाद्वारे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हा निकाल म्हणजे डान्सबारला खुली आणि धडधडीत सूट नाही, तर राज्य सरकारनं तयार केलेल्या काही नियमांच्याअधीन राहूनच डान्स बारला
परवानगी मिळणार असल्याची प्रतिक्रिया राज्य महिला
आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे.
डान्स बार पूर्णपणे बंद न करता त्यावर अनेक उपायांद्वारे
नियंत्रण ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सामाजिक
कार्यकर्त्यांनी मात्र स्वागत केलं आहे.
****
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद
पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात अद्याप आरोपपत्र दाखल
केलं नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास
संथगतीनं सुरु असल्याबद्दल न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय आणि गुन्हे
अन्वेषण विभाग - सीआयडीवर ताशेरे ओढले. या हत्या प्रकरणात फरार आरोपींचा शोध लावण्यासाठी
दोन्ही तपास यंत्रणांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असं न्यायालयानं सांगितलं आहे.
****
मराठवाड्यात सूक्ष्म सिंचनाचं
क्षेत्र वाढवण्यासाठी ८० टक्के अनुदानाची घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद
इथं, मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांच्या वार्षिक आराखड्याचा
आढावा घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. मराठवाड्यातलं वनक्षेत्र वाढवण्यासाठी ‘अटल आनंदवन’
या नाविन्यपूर्ण संकल्पाची माहिती मुनगंटीवार यांनी
दिली. ते म्हणाले..
मराठवाड्यामध्ये सुक्ष्म सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी
सबसिडीमध्ये आत्ता वाढ करतोय आणि या मध्ये ही वाढ ८० टक्के सबसिडीपर्यंत नेतो आहे.ज्यातून
८० टक्के अनुदान आणि २० टक्के शेतकऱ्यांचं योगदान, अनुदान आणि योगदान यामाध्यमातून
पर क्रॉप मोर ड्रॉप ही मराठवाड्यामध्ये योजना करतो आहे. यासोबत ‘अटल आनंदवन’ एक नवीन
जगातल्या स्तरावरची कल्पना आणतो आहे. एका एकरमध्ये १२ हजार ते वीस हजार झाडं लागतात
आणि दाट वन तयार होतं. जे दाट वन त्या क्षेत्राच्या पर्यावरणाचं रक्षण करत प्रदुषण
कमी करण्यामध्ये अतिशय उपयुक्त होतं.
कमी पाण्यात जास्त उत्पादन
देणाऱ्या जातीच्या वाणाच्या संशोधनासाठी परभणीच्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला १०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध
करून देण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. अंगणवाड्यांच्या
नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी मानव
विकास विभागातून निधी उपलब्ध करून देणं, मराठवाड्यातल्या वनक्षेत्राचा
विस्तार करण्यासाठी ईको बटालीयनचा विस्तार बीड आणि लातूरपर्यंत करणं, मराठवाड्यातील
घृष्णेश्वर, परळी वैद्यनाथ आणि औंढा नागनाथ या तीर्थ क्षेत्रांचा विकास, औंढा
नागनाथसाठी २५ कोटी रूपये निधी, परभणी आणि लातूर या
ठिकाणी सांस्कृतिक सभागृह बांधणं,
आदी
निर्णय घेण्यात
आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन संगीत अकादमीच्या
शार्ङ्गदेव समारोहाला आजपासून प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात
दररोज तीन सत्रात गायन, वादन आणि नृत्यशैलीबाबत कार्यशाळा, परिसंवाद तसंच प्रत्यक्ष
सादरीकरण होणार आहे. यंदाचा ‘शार्ङ्गदेव सन्मान’ गुरू बनमाली महाराणा यांना मरणोत्तर
जाहीर झाला आहे. या समारोहात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. औरंगाबाद इथं, एमजीएम परिसरात
हा महोत्सव होणार आहे.
****
राज्य शासनानं काल १२ जिल्ह्यांच्या, जिल्हा प्राणी क्लेष
प्रतिबंधक संस्थांच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली. यामध्ये
मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी, बीडसह अहमदनगर, नागपूर, यवतमाळ,
वर्धा, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या ग्रामीण तसंच नागरी
भागातली नळ पाणी पुरवठा योजनांची थकित विद्युत देयकं भरण्यासाठी शासनानं चोवीस कोटी
पन्नास लाख रुपये इतका निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी मराठवाड्याला सात कोटी
पन्नास लाख रुपये इतका निधी प्राप्त होणार आहे. विद्युत देयकं न भरल्यामुळे या भागांमध्ये
पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यानं काही योजना सध्या बंद आहेत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला तिसरा अणि शेवटचा सामना आज मेलबर्न इथं खेळला जाणार आहे. सिडनी इथं झालेला सामना आस्ट्रेलियानं तर, अॅडलेड इथं
झालेला सामना भारतानं जिंकल्यामुळे मालिकेत
१-१ अशी बरोबरी आहे, त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी हा सामना दोघांनाही महत्वाचा आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सकाळी सात वाजून ५० मिनीटांनी
सुरु होईल.
****
मलेशियात क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशियन मास्टर्स
बॅडमिंटन स्पर्धेत काल पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत आणि महिला एकेरीत सायना नेहवालनं
उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. किदांबी श्रीकांतनं हाँगकाँगच्या वॉंग विंग कीचा,
तर सायना नेहवालनं हाँगकाँगच्याच यिप पुई यिनचा पराभव केला. महिला दुहेरीत मात्र, अश्विनी
पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांना इंडोनेशियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
****
पुणे इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्रानं
काल आणखी चार सुवर्ण पदकं पटकावली. खो-खो मध्ये १७ वर्षांखालच्या राज्याच्या पुरुष
संघानं आंध्र प्रदेशचा १९ - आठ असा, तर महिला संघानं दिल्लीचा १९ - १७ असा पराभव करत
सुवर्ण पदक जिंकलं. एकूण ६८ सुवर्ण, ५१ रौप्य आणि ६२ कांस्य पदकं पटकावत महाराष्ट्र
अव्वल स्थानावर आहे. ४७ सुवर्ण पदकांसह दिल्ली दुसऱ्या, तर ३८ सुवर्ण पदकांसह हरियाणा
तिसऱ्या स्थानावर आहे.
****
लातूर इथं क्रीडा संकुलावर १५० फूट उंच राष्ट्रध्वज आज
फडकवला जाणार आहे. यानिमित्त काल शहरातून तिरंगा फेरी काढण्यात आली. अंबाजोगाई रस्त्यावर
अहिल्याबाई होळकर चौकातून निघालेली ही फेरी शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत,
बार्शी रस्त्यावर विसर्जित झाली.
****
अहमदनगर जिल्ह्यात शाळेची सहल बस आणि मालवाहू गाडी यांच्यात
समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. तर काही विद्यार्थी जखमी झाले.
अहमदनगर-कल्याण मार्गावर आळेफाटा इथं काल हा अपघात घडला.
दरम्यान, परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात येलदरी
धरणाजवळ जिंतूर-रिसोड बसचे ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाला, या दुर्घटनेत १४ प्रवासी
जखमी झाले.
//*************//
No comments:
Post a Comment