Friday, 18 January 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.01.2019....18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 January 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करण्यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान देण्याची गरज असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. लातूर इथं उभारण्यात आलेल्या मराठवाड्यातल्या सर्वात उंच राष्ट्रध्वजाचं लोकार्पण आज तावडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आठवड्यातली एक संध्याकाळ सायबर मुक्त संध्याकाळ म्हणून ईलेक्ट्रॉनिक साधनांपासून दूर राहावं, त्यादिवशी मैदानी खेळ तसंच कुटुंबासाठी वेळ द्यावा, हा लातूर पॅटर्न यशस्वी झाला तर आपण राज्यभरात तो लागू करू असंही तावडे यावेळी म्हणाले. नागरिकांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी यासाठी हा राष्ट्रध्वज उभारला असल्याचं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यावेळी म्हणाले. राज्याचं क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या वतीनं हा १५० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे.

****

गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांची महसूल विभागणी सुत्रानुसार ऊस दर काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दिले आहेत. मुंबईत आज ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत सन २०१७-१८ हंगामामध्ये गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांची महसूल विभागणी सुत्रानुसार ऊस दर निश्चित करुन या दरांना मान्यता देण्यात आली. काही कारखाने ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च जास्त दाखवतात त्यांची तपासणी करावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली होती, साखर आयुक्तालयानं या दरांची तपासणी करावी, असे निर्देशही जैन यांनी यावेळी दिले.

****

जालना तालुक्यातल्या कल्याणी नदीच्या पुनुरुज्जीवनामुळे पाणी साठवण क्षमता वाढून तीन हजार एकर जमीन ओलिताखाली येईल, असं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निरखेडा इथल्या कल्याणी नदी खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज खोतकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. या नदीच्या खोलीकरणामुळे परिसरातली पाणीपातळी वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल, पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, असं खोतकर यावेळी म्हणाले. 

****

धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं. राज्यभर सुमारे १८ वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षकांना थकीत वेतन मिळावं, २००५ पासून नियुक्त शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लागू करावी, २०१२-१३ पासून नियुक्त शिक्षकांना त्वरीत मान्यता द्यावी, आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

पोलिस कल्याण योजनांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमध्ये जालना जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. नागपूर इथं सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांदरम्यान राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते जालन्याचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. २०१४ ते २०१८ मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी पोलीस कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. 

****

धुळे इथं येत्या दोन आणि तीन फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नागालँडचे राज्यपाल पद्मनाथ आचार्य यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं झालेला तिसरा एकदिवसीय सामना भारतानं सात गडी राखून जिंकला आहे. या विजयाबरोबरच भारतानं तीन सामन्याची मालिकाही दोन - एकनं जिंकली आहे. आजच्या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारतीय संघाला २३१ धावांचं लक्ष्य दिलं होतं. भारतीय संघानं हे लक्ष्य चार चेंडू राखत पूर्ण केलं. महेंद्रसिंह धोनीनं नाबाद ८७, केदार जाधवनं नाबाद ६१ आणि कर्णधार विराट कोहलीनं ४६ धावा केल्या. या सामन्यात सहा गडी बाद करणारा यजुवेंद्र चहल सामनावीर, तर दोन सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावणारा महेंद्र सिंह धोनी मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.  

****

मलेशियामधल्या क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात सायनानं जपानच्या नोझोमी ओकुहाराचा २१ - १८, २३- २१ असा पराभव केला. उपान्त्य फेरीत उद्या सायनाचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरीन विरुद्ध होणार आहे.

****

पुणे इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत आज महाराष्ट्रानं कांस्य पदकाची कमाई केली. १७ वर्षांखालील गटात टेनिस मध्ये राज्याच्या गार्गी पवारनं आंध्र प्रदेशच्या लक्ष्मी रेड्डीचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं.

****

No comments: