Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 May 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालात
भारतीय जनता पक्षानं पंधरा जागांवर विजय मिळवला असून, दोनशे सत्याऐंशी जागांवर भाजप
उमेदवार तर मित्रपक्षांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार तीनशे चव्वेचाळीस जागांवर
पुढे आहेत. काँग्रेसनं आतापर्यंत दोन जागेवर विजय मिळवला असून, अठ्ठेचाळीस जागांवर आघाडी घेतली आहे, मित्रपक्षांसह संयुक्त
पुरोगामी आघाडीचे उमेदवार देशभरातल्या नव्वद जागांवर पुढे आहेत. धर्मनिरपेक्ष जनता
दलानं कर्नाटकातून एक जागा जिंकल्याची माहिती, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात
आली आहे.
सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीत झालेला विजय हा,
भारताचा विजय असून, जनतेनं पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा
विजय झाल्याचं, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
या विजयासंदर्भात बोलताना, सबका साथ सबका विकास या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत,
सशक्त आणि सर्वसमावेशक राष्ट्र उभारणीचा मनोदय व्यक्त केला आहे.
यंदा मोदी लाटेचं रुपांतर मोदी त्सुनामीत झाल्याची
प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी
बोलत होते. मोदी यांच्या नेतृत्वात केलेलं काम आणि त्यांनी जनतेला केलेल्या आवाहनामुळे
हा महाविजय साकार झाल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेनेनं निकालांच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. मोदींसमोर पुढली पंचवीस वर्षे कोणीही आव्हान
उभं करू शकणार नाही, असं मत पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना
व्यक्त केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं, हा राष्ट्रीय शक्तींचा
विजय असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या
नेत्या ममता बॅनर्जी यांनी, विजेत्यांचं अभिनंदन करत, पराभूतांनी पराभवाच्या कारणांचा
आढावा घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या
मतमोजणीचे कल अपेक्षेनुसार नसल्याचं, काँग्रेसनं म्हटलं आहे. मतमोजणी कलांचं रुपांतर निकालांमध्ये झाल्यास
पक्षाचं प्रचार अभियान देशातील जनतेशी जोडून घेण्यात अयशस्वी का झालं यावर पक्षाला
सखोल विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रीया पक्षाचे प्रवक्ते जयवीर
शेरगिल यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
आम आदमी पक्षानं
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभा निवडणुकीतील आकर्षक विजयाबद्दल
अभिनंदन केलं आहे. आपला पक्ष जनादेशाचा आदर करतो, अशी प्रतिक्रीया आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरव भारद्वाज यांनी
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना नोंदवली
****
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव
स्वीकारत असून, विधानसभा निवडणुकीत मात्र हे चित्र दिसणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर
पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणुकीला उभे असते,
तर चित्र वेगळं दिसलं असतं, असंही पवार म्हणाले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी मात्र आजचे हे निवडणूक निकाल अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया ट्वीटरवरून दिली
आहे.
****
मराठवाड्यात औरंगाबाद इथं वंचित
बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यात कडवी लढत सुरू
आहे. मतमोजणीच्या प्रारंभीपासून इम्तियाज यांनी राखलेली आघाडी मोडून काढत, खैरे यांनी
बावीसाव्या फेरीत, साडे चार हजारावर मतांनी आघाडी घेतली आहे.
जालना इथून भाजपचे रावसाहेब
दानवे दोन लाख एकसष्ट हजार मतांनी आघाडीवर, परभणी शिवसेनेचे संजय जाधव एकतीस हजार मतांनी
आघाडीवर, नांदेड इथून तेराव्या फेरीअखेर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर वीस हजार मतांनी
आघाडीवर, बीड इथून भाजपच्या प्रीतम मुंडे एक लाख चार हजार मतांनी आघाडीवर, हिंगोली
शिवसेनेचे हेमंत पाटील एक लाख एकसष्ट हजार आठशे मतांनी आघाडीवर, लातूर इथून भाजपचे
सुधाकर श्रृंगारे दोन लाखावर मतांनी आघाडीवर, उस्मानाबाद इथून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर
एक लाख वीस हजार मतांनी आघाडीवर असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
राज्यातल्या महत्त्वाच्या लढतींमध्ये नागपूर मतदार संघातून भाजपचे
नीतीन गडकरी, यवतमाळ इथून शिवसेनेच्या भावना गवळी, रावेरमधून
रक्षा खडसे, अहमदनगर इथून भाजपचे डॉ सुजय विखे, अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे, वर्ध्यातून भाजपचे रामदास तडस, तर गडचिरोली-चिमूर इथून
भाजपचे अशोक महादेव नेते, आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment