Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23
May 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मे २०१९ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणूक निकालात देशभरातल्या सर्व पाचशे बेचाळीस जागांचे
कल हाती आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दोनशे चौऱ्याण्णव जागांवर आघाडीवर असून,
मित्रपक्षांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं तीनशे सदोतीस जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस
पक्षाचे उमेदवार देशभरात पन्नास जागांवर तर मित्र पक्षांसह संयुक्त पुरोगामी आघाडीचे
उमेदवार एकशे दोन जागांवर पुढे असल्याची माहिती, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिली
आहे.
****
महाराष्ट्रातल्या सर्व अठ्ठेचाळीस जागांच्या मतमोजणीचे कल हाती
येत असून, भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक २४ जागांवर आघाडी घेतली असून, महायुतीतला दुसरा
घटक पक्ष असलेला शिवसेना पक्ष त्या खालोखाल २० जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस
पक्ष सध्या तीन जागांवर तर वंचित बहुजन आघाडी एका जागेवर आघाडीवर आहे.
मराठवाड्यातल्या आठ मतदार संघांपैकी औरंगाबाद मतदार संघ वगळता,
जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड मतदार संघातून भाजप शिवसेना
रिपाई महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
औरंगाबाद इथून वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील सतरा हजार आठशे
मतांनी आघाडीवर आहेत.
नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे अशोक चव्हाण पिछाडीवर
आहेत. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी चव्हाण यांच्यावर एकवीस हजार मतांनी आघाडी
घेतली आहे. चव्हाण हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड लोकसभा मतदार संघातून बाराव्या फेरीनंतर भाजपच्या प्रीतम मुंडे
एक्कावन्न हजार मतांनी तर जालना मतदार संघातून भाजपचे रावसाहेब दानवे चौथ्या फेरीअखेर
एकोणसत्तर हजार मतांनी आघाडीवर आहेत.
लातूर मतदार संघातून भाजपचे सुधाकर श्रृंगारे सत्तावन्न हजार मतांनी
तर उस्मानाबाद मतदार संघात सहाव्या फेरीअखेर शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर अडोतीस हजार
मतांनी आघाडीवर आहेत.
परभणी इथून शिवसेनेचे संजय जाधव पंचवीस हजार मतांनी तर हिंगोलीतून
शिवसेनेचे हेमंत पाटील तेवीस हजार पाचशे मतांनी आघाडीवर असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी
कळवलं आहे.
****
राज्यातल्या महत्त्वाच्या लढतींमध्ये, नागपूर मतदार संघातून भाजपचे
नीतीन गडकरी चाळीस हजार आठशे मतांनी आघाडीवर आहेत. अहमदनगर इथून भाजपचे डॉ सुजय विखे
सुमारे एकोणसत्तर हजार मतांनी आघाडीवर असून, हातकणंगले इथून शिवसेनेचे धैर्यशील माने
यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यावर पस्तीस हजार मतांनी आघाडी
घेतली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे विधीज्ञ प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला
या दोन्ही मतदार संघातून पिछाडीवर आहेत. सोलापूर इथं भाजपचे डॉ जय सिद्धेश्वर स्वामी
शिवाचार्य महाराज, तर अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर
आघाडी घेतली आहे.
सांगलीतून भाजपचे संजय काका पाटील, मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग
बारणे, बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे, साताऱ्यातून राष्ट्रवादी
काँग्रेसचे उदयनराजे भोसले, बुलडाण्यातून शिवसेनेचे प्रताप जाधव, वर्ध्यातून भाजपचे
रामदास तडस, रायगड मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग
मतदार संघातून शिवसेनेचे विनायक राऊत हे आघाडीवर आहेत.
मुंबई उत्तर मध्य मधून भाजपच्या पूनम महाजन, दक्षिण मध्य मुंबईतूल
शिवसेनेचे राहुल शेवाळे, दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत, उत्तरपूर्व मुंबईतून
भाजपचे मनोज कोटक, तर मुंबई उत्तर मधून शिवसेनेचे गोपाळ शेट्टी, कल्याण भाजपचे श्रीकांत
शिंदे, पालघर शिवसेनेचे राजेंद्र गावीत, तर भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील आघाडीवर आहेत.
****
देशभरातल्या आंध्रप्रदेश, ओरिसा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे निकालही हाती येत आहेत. आंध्रप्रदेशात
सत्ताधारी तेलगुदेसम पक्षाला अवघ्या २५ जागांवर आघाडी असून, वायएसआर काँग्रेसचे उमेदवार
एकशे बेचाळीस जागांवर आघाडीवर आहेत.
अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दहा जागांवर आघाडीवर
असून, काँग्रेस, संयुक्त जनता दल, आणि एक अपक्ष उमेदवार प्रत्येकी एका जागेवर आघाडी
घेतली आहे.
ओडिशात सत्ताधारी बिजू जनता दलानं चौऱ्याहत्तर जागांवर आघाडी घेतली
असून, भारतीय जनता पक्षानं २२ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस सहा जागांवर तर एका
जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.
सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं चार
तर सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटनं तीन जागांवर आघाडी घेतली असल्याचं, निवडणूक आयोगाकडून
सांगण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment