Thursday, 23 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.05.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ मे  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागा, तसंच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज सुरु आहे. आतापर्यंत लोकसभेच्या ५२९ जागांचे कल समोर आले असून त्यापैकी २८५ जागांवर भाजप आणि काँग्रेस ४९ जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३२४ आणि संयुक्त पुरोगामी आघाडी १०१ जागांवर आघाडीवर आहे . मतमोजणीमध्ये सकाळी आठ वाजता टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात झाली.  ती संपल्यावर मतदान यंत्रांमधल्या मतांची मोजणी करुन,  शेवटी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या पाच मतदान केंद्रांमधल्या व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी होणार आहे.  त्यामुळे निकाल संध्याकाळी उशीरा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 जनतेला निकालाची माहिती जलदगतीनं मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी जनतेला निकालाची फेरनिहाय माहिती देणार आहेत. निवडणूक आयोगानं नवी दिल्लीतल्या निर्वाचन सदनात चोवीस तास कार्यरत ईव्हीएम नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित तक्रारींवर हा कक्ष देखरेख ठेवेल. स्ट्राँगरुम मधली साठवणूक समस्या, स्ट्राँगरुमची सुरक्षा, स्ट्राँगरुममधे उमेदवाराला त्यांची माणसं तैनात करण्याची परवानगी, सीसीटीव्ही देखरेख, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची ने-आण आणि मतमोजणी दरम्यान ईव्हीएमशी संबंधित तक्रारी नियंत्रण कक्षाकडे  011-23052123 या क्रमांकावर पाठवता येतील.

 मतमोजणीचं वार्तांकन आणि त्यावर आधारित कार्यक्रमांसाठी आकाशवाणीचा वृत्त सेवाविभाग सलग 40 तास विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहे. राज्यातले चारही प्रादेशिक वृत्त विभाग ‘निवाडा  जनतेचा’ हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजून वीस मिनीटांपासून प्रसारित करत आहेत.  मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद प्रादेशिक वृत्तविभाग, आकाशवाणीचे प्रतिनिधी आणि वार्ताहर, तसंच राजकीय विश्लेषक यात सहभागी होणार आहेत.
****

 राज्यात सर्व ४८ जागांचे कल हाती आले आहेत.  त्यात भाजप २२,  शिवसेना २०, काँग्रेस एक तर राष्ट्रवादी काँग्रेस चार आणि वंचित बहुजन आघाडी एका जागेवर आघाडीवर आहे.
     
 नागपूर मतदार संघात पहिल्या फेरी भाजपचे नेते उमेदवार नितीन गडकरी  ४०,८५७ मतांनी आघाडीवर आहेत. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत. अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे तिसऱ्या फेरी अखेर २५ हजार पाचशे मतांनी आघाडीवर आहेत. सोलापूरमधून भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज साडे सतरा हजार मतांनी आघाडीवर आहेत.

 गडचिरोली-चिमूर क्षेत्राच्या  आठव्या फेरीत  भाजपचे उमेदवार अशोक महादेव नेते १४,०८२ मतांनी आघाडीवर आहेत. कोल्हापूर मतदारसंघातून पाचव्या फेरी अखेर शिवसेना उमेदवार संजय महाडिक ६०,३९९ मतांनी आघाडीवर आहेत. ठाण्यातून शिवसेनेचे राजन विचारे यांनी दुसऱ्या फेरी अखेर १६,८२४ मतांची आघाडी घेतली आहे.  
****

 औरंगाबाद मतदार संघात एमआयएमचे इम्तियाज जलील तिसऱ्या फेरी अखेरी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या पेक्षा दोन हजार पन्नास मतांनी मतांनी आघाडीवर आहेत. जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पहिल्या फेरीअखेर २० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेड मधून बाराव्या फेरी अखेर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यापेक्षा किमान १२ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.  बीडमध्ये भाजपच्या प्रितम मुंडे सहाव्या फेरी अखेर ३४ हजार मतांनी आघाडीवर आहेत.  उस्मानाबाद मध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर सुमारे साडे सात हजार मतांनी आघाडीवर आहेत.  लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे १६ हजार सातशे मतांनी आघाडीवर आहेत.  हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील १२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. परभणीत पहिल्या फेरी अखेर शिवसेनेचे संजय जाधव सहा हजार आठशे मतांनी आघाडीवर आहेत.
****

 लोकसभा निवडणुकीच्या आजच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध भागात हिंसाचार उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. स्ट्रॉंग रूम्स आणि मतमोजणी परिसराच्या सुरक्षेसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेशा उपाययोजना करायला सांगण्यात आल्याचं
मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी...