Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०२ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø भाजप - शिवसेना युतीचं जागावाटप निश्चित; उमेदवारांची
पहिली यादी जाहीर
Ø मराठवाड्यात विविध मतदार संघातून कालपर्यंत ७८ उमेदवारी
अर्ज दाखल
Ø ॲट्रोसिटी
कायद्यातल्या तरतुदी शिथील करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
आणि
Ø राष्ट्रपिता
महात्मा गांधीजींना आज दीडशेव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून अभिवादन
****
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं
जागावाटप निश्चित झालं असून, भाजप १४६ तर शिवसेना १२४ जागा लढवणार आहे. मित्रपक्षांना
अठरा जागा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या दोन्ही पक्षांनी
काल आपापल्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केल्या.
भाजपानं काल एकशे पंचवीस उमेदवारांची पहिली यादी
जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून तर
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवतील
असं पक्षाचे सरचिटणीस अरूण सिंग यांनी काल दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. औरंगाबाद
पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार अतुल सावे, गंगापूर - प्रशांत बंब, फुलंब्री - हरिभाऊ
बागडे, परळी - पंकजा मुंडे, परतूर - बबनराव लोणीकर, निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर,
औसा - अभिमन्यू पवार, तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील, भोकरदन - संतोष दानवे, बदनापूर
- नारायण कुचे, हिंगोली - तानाजी मुटकुळे, मुखेड - तुषार राठोड आणि भोकर मतदारसंघातून
बापुसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डीतून तर शिवेंद्रराजे
भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षानं विद्यमान बारा आमदारांना
उमेदवारी दिली नसल्याचं अरुण सिंग यांनी सांगितलं. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद
तावडे यांची नावं मात्र या पहिल्या यादीत नाहीत, मात्र खडसे यांनी काल उमेदवारी अर्ज
दाखल केला. पुढच्या यादीत आपलं नाव असेल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची जागा शिवसेनेला
सुटल्यामुळे भाजपच्या इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गंगाखेड इथं टाळ मृदुंग
वाजवून आत्मक्लेष आंदोलन केलं.
****
शिवसेनेनंही काल सत्तर उमेदवारांची पहिली यादी जाहीर
केली. आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या
वैजापूर मतदारसंघातून रमेश बोरनवे, परभणी - डॉ.राहूल पाटील, गंगाखेड - विशाल कदम, बीड
– जयदत्त क्षीरसागर, नांदेड दक्षिण - राजश्री पाटील, मुरूड - महेंद्र दळवी, हदगाव
- नागेश अष्टीकर, देगलूर - सुभाष साबणे, तर उमरगा - लोहरा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले
यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, औरंगाबाद मध्यमधून शिवसेनेनं माजी आमदार
प्रदीप जैस्वाल यांना एबी फॉर्म दिल्याचं जैस्वाल यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
****
काँग्रेसनं ५२ उमेदवारांची
दुसरी यादी काल जाहीर केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मराठवाड्यात हिंगोलीतून भाऊराव पाटील, परतूर सुरेशकुमार जेथलिया,
जालना - कैलास गोरंट्याल, लातूर ग्रामीण - धीरज देशमुख, तर उमरगा विधानसभा मतदारसंघातून
दिलीप भालेराव यांना उमेदवारी दिली
आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेनं २७ उमेदवारांची पहिली यादी काल
जाहीर केली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत नवगिरे
यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
संभाजी ब्रिगेडनं काल पंधरा उमेदवारांची तिसरी यादी
जाहीर केली. यामध्ये नांदेडच्या किनवट-माहूर मतदारसंघातून विशाल शिंदे, बीड - राहुल
वायकर तर जालना जिल्ह्यातल्या मंठा परतूर मतदारसंघातून राजीव मोरे यांना उमेदवारी दिल्याचं
प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी सांगितलं.
****
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही काल उमेदवारांची
पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे राज्य सचिव नरसय्या आडम यांना सोलापूर मध्य मधून उमेदवारी
देण्यात आली आहे.
****
मराठवाड्यात विविध मतदार संघातून कालपर्यंत ७८ उमेदवारांनी
उमेदवारी अर्ज दाखल केले.
जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह जिल्ह्यात आठ उमेदवारांनी काल १० अर्ज दाखल केले. जिल्ह्यातून आतापर्यंत १४ अर्ज दाखल झाले आहेत. बीड
इथं, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर यांच्यासह दहा जणांनी काल बारा अर्ज दाखल
केले. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून दोन, तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून एक उमेदवारी
अर्ज काल दाखल करण्यात आला. लातूर जिल्ह्यात
काँग्रेसचे बसवराज पाटील यांच्यासह अकरा उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. परभणी जिल्ह्यातून काल सहा उमेदवारांनी नऊ अर्ज
दाखल केले, जिल्ह्यात आतापर्यंत १५ अर्ज दाखल झाल्याचं वृत्त आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड मतदार संघातून शिवसेनेचे
अब्दुल सत्तार यांनी काल अर्ज दाखल केला. जिल्ह्यात कालपर्यंत एकूण १८ अर्ज दाखल झाले
आहेत.
सातारा इथं, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले
यांनी काल अनुक्रमे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अहमदनगर
जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथून बबनराव पाचपुते यांनी, तर कर्जत-जामखेड मतदारसंघातून
प्राध्यापक राम शिंदे यांनी भाजपकडून, तर कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील यांनी आणि
इस्लामपूर मधून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काल उमेदवारी अर्ज
दाखल केला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातल्या
तरतुदी शिथील करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आधीचा निर्णय न्यायालयानं काल रद्दबातल
ठरवला. मार्च २०१८ मधे सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठानं या कायद्यातल्या
तरतुदी शिथील केल्या होत्या. त्यावर फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारनं तसंच इतरांनी
याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती एम
आर शाह आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठानं काल हा आदेश दिला.
****
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी
या बँकेचं आधीचं व्यवस्थापक मंडळ आणि हाऊसिंग लिमिटेड आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
- एचडीआयएल या कंपनीच्या प्रवर्तकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पीएमसी
बँकेवर रिझर्व्ह बँकेनं नेमलेल्या प्रशासकाच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांच्या आर्थिक
गुन्हे विभागानं या अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि गुन्ह्याच्या कटाचा, तसंच बनावट कागदपत्र
तयार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०१४च्या
विधानसभा निवडणुकीच्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्या संदर्भातल्या
प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरु ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले
आहेत. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबादल ठरवली होती, या निर्णयाला सर्वोच्च
न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयाच्या
पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि राजकारण सोडून द्यावं
अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज शतकोत्तर सुवर्ण
महोत्सवी जयंती. यानिमित्त सर्वत्र स्वच्छता अभियानासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी
राज्यातल्या जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसंच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी
यांना आदरांजली वाहण्याचं आवाहन केलं आहे.
माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही आज जयंतीनिमित्त
आदरांजतली अर्पण करण्यात येत आहे.
स्वच्छता एक सेवा' या उपक्रमांतर्गत राज्याचे मुख्य सचिव
अजोय मेहता यांनी काल मंत्रालयात अधिकारी कर्मचाऱ्यांना एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळून करून पर्यावरणाच्या रक्षणात योगदान देण्याची शपथ दिली.
दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड विभागातर्फे गांधी जयंतिनिमित्त नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकावर महाश्रमदानाचा
कार्यक्रम होणार आहे.
****
औरंगाबाद इथं शहागंज परिसरातल्या महात्मा गांधी पुतळा
परिसरात प्रार्थना आणि अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरात रेल्वे स्थानकानजिक
उभारलेल्या महात्मा गांधी सर्वोदय भवनाचा शुभारंभ आज होणार आहे. या निमित्तानं येत्या
दहा ऑक्टोबरपर्यंत विविध विषयांवर व्याखान होणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात ‘फिट इंडिया’ अंतर्गत दौड आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रवेशद्वारापासून
सकाळी साडे सात वाजता या दौडला सुरुवात होईल.
****
मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार
पीक पध्दतीत बदल करण्याचं आवाहन पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक विजय दिवाण यांनी केलं
आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासन
केंद्राच्या वतीनं, गांधीजींच्या शत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘मराठवाड्याचा
पाणी प्रश्न’ या विषयावर बोलत होते. मराठवाड्यात उपलब्ध पाण्यापैकी ऐंशी टक्के पाणी
हे ऊसासाठी वापरलं जातं, त्यामुळे कमी पाण्यावर येणारी ज्वारी, बाजरी, मका या सारखी
पिकं घेणं गरजेचं असल्याचं प्रा. दिवाण यांनी सांगितलं. जायकवाडी धरणाच्या पाण्याचा
मराठवाड्यातल्या एक लाख बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणं आवश्यक आहे. प्रत्यक्षात
मात्र सिंचन व्यवस्थेअभावी पाच जिल्ह्यातल्या अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्रालाच याचा
लाभ होत असल्याची खंत दिवाण यांनी व्यक्त केली.
*****
***
No comments:
Post a Comment