Thursday, 17 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.10.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.
****
** राज्याला तीन मुख्यमंत्री देऊनही रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांपासून मराठवाडा अनेक वर्ष वंचित - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
** विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस; बीडमध्ये शरद पवार, नांदेड मध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि मुख्यमंत्र्यांच्या सभा
** उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला
आणि
** त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचा मराठवाडा साहित्य परिषदेकडून जाहीर सत्कार
****
राज्याला तीन मुख्यमंत्री देऊनही रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांपासून मराठवाडा अनेक वर्ष वंचित राहिल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल जालना जिल्ह्यात परतूर इथं महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेत बोलत होते. मुख्यमंत्र्यांचं क्षेत्र असूनही इथून विकास गायब होता, अशी टीका त्यांनी केली. केंद्र आणि राज्यात जनतेसाठी काम करणारं सरकार असणं आवश्यक असल्याचं सांगतानाच, या भागातले रस्ते, उद्योग विकास, आणि जलसिंचनासाठी गेल्या पाच वर्षांत झालेल्या कामांचा त्यांना आढावा घेतला. राष्ट्रवादाच्या मुद्यावरून बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देशाची भावना समजत नाही, त्यामुळेच या दोन्ही पक्षातले मोठा जनाधार असलेले अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणाऱ्या महायुतीसोबत आले असल्याचं नमूद केलं.
अकोला तसंच मुंबईत खारघर इथंही काल पंतप्रधानांनी सभा घेतल्या. आज पंतप्रधानांची बीड जिल्ह्यात परळी इथं सभा होणार आहे
****
विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस राहिले असल्यानं, सर्वच पक्षाचे नेते आणि उमेदवारांनी प्रचारात वेग घेतला आहे. सभा, कोपरा बैठका, प्रचार फेऱ्या आणि मतदारांशी थेट संपर्क यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यात नरसी, मुखेड आणि किनवट इथं महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत आपल्या सरकारनं पाच वर्षांत तिप्पट काम केलं असल्याचं मुख्यमंत्री मुखेड इथल्या सभेत म्हणाले. नांदेड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी खासदार गंगाधर कुंटुरकर आणि राजेश कुंटुरकर यांनी काल नरसी इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. नागपूर आणि अमरावती इथंही मुख्यमंत्र्यांनी काल प्रचारसभा घेतल्या.

लातूर इथले महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारासाठी काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी प्रचार सभा घेतली. काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला असल्यानं तो राज्याला दिशा देऊ शकणार नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. लातूरचा पाणी प्रश्र्न काँग्रेस नेत्यांमुळे बिकट झाल्याची टीका पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केली. तर मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन पाणी प्रश्न सोडवू, असं येडियुरप्पा म्हणाले.
****
देशात आणि राज्यात महायुतीचं सरकार असूनही राज्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. बीड इथं काल महाआघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी आदी मुद्यांवरुन त्यांनी सरकारवर टीका करतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांच्यावरही पवार यांनी टीका केली.

काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडसह जिल्ह्यात अर्धापूर तसंच तरोडा इथं प्रचार सभा घेतल्या. विमुद्रीकरणामुळे अनेक उद्योग बंद पडले. छोटे व्यापारी तसंच शेतकरी आजही संकटात असल्याचं सिन्हा म्हणाले.
****
कणकवली मतदार संघातले शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल कणकवलीत प्रचार सभा झाली. शिवसेनेनं वचननाम्यात सांगितल्याप्रमाणे सगळी आश्वासनं पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर ठाकरे यांनी कडाडून टीका केली.

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहीत पवार यांच्या प्रचारासाठीच्या सभेला काल पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी संबोधित केलं.
****
एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदउद्दिन ओवेसी यांनी काल सोलापूर इथं पक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी पदयात्रा काढली. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड मतदार संघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. प्रमोद दुथाडे यांना एमआयएम पक्षानं पाठींबा जाहीर केला आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिक इथं प्रचारसभा घेतली. राज्यातले मुलभूत विषय बाजुला सारुन सरकार कलम ३७० च्या मुद्यावरच प्रचार करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर इथंही काल राज ठाकरे यांची सभा झाली. तर गंगापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी जाहीर सभेला संबोधित केलं.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथं काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. तर औरंगाबाद इथं विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांची प्रचार सभा होणार आहे. 

****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
 ****
स्मानाबाद जिल्ह्यातल्या पडोळी इथं प्रचार फेरीदरम्यान शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर काल सकाळी चाकू हल्ला झाला. अजिंक्य टेकाळे असं हल्लेखोराचं नाव असून, शिराढोण पोलिसांनी त्याला अटक केली. तो भाजपच्या माहिती तंत्रज्ञान शाखेचा तालुका अध्यक्ष असल्याचं समोर आलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर विधानसभा मतदारसंघातले भाजप उमेदवार बबनराव लोणीकर यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रत्नाकर महाजन यांनी केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी लोणीकर हे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.
****
कन्नड मतदार संघातले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात औरंगाबाद इथं विविध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
****
विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे शत्रू हे लोकशाहीचे शत्रू असतात असं मत उस्मानाबाद इथल्या नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं काल ज्येष्ठ कवी ना.धो महानोर यांच्या हस्ते त्यांचा औरंगाबाद इथं सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दिब्रिटो यांच्या १५ पुस्तकं आणि पाच अनुवादित पुस्तकांवर साहित्यिक डॉ.ऋषीकेश कांबळे आणि प्राध्यापक जयदेव डोळे यांनी भाष्य केलं. मराठीचे पाईक असणारे फ्रान्सिस दिब्रिटो यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून महामंडळानं परिवर्तनाचं मोठ काम केल्याचं महानोर म्हणाले.
****
एअर इंडियाच्या औरंगाबाद - उदयपूर विमानसेवेला कालपासून प्रारंभ झाला. काल सकाळी सव्वासात वाजता औरंगाबाद विमानतळावरून उदयपूरसाठी पहिल विमान रवाना झाल. आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि रविवारी हे विमान मुंबई वरून सकाळी पाच वाजता निघून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी औरंगाबादला, तर औरंगाबादहून सव्वा सातवाजता निघून सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी उदयपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात त्याच दिवशी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी हे विमान उदयपूरहून औरंगाबादसाठी उड्डाण करेल आणि अकरा वाजता औरंगाबादला पोहचेल. या विमानसेवेला आज पहिल्या दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळल्याची माहिती एअर इंडीयाचे औरंगाबाद इथले व्यवस्थापक अरूण गलाटे यांनी दिली.
****
मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत काल मराठवाड्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं पथनाट्य सादर करण्यात आलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयातल्या युवकांशी संवाद साधत ग्रामीण भागात विविध कला प्रकारातून मतदार जनजागृती करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांनी मी मतदान करणारच हे पथनाट्य सादर केलं. तर लातूर इथं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार स्वप्निल पवार यांच्या उपस्थितीत चुनावी पाठशाला हा उपक्रम राबवण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं पोवाडा, लोकगीत आणि वगनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली असून, शेतकरी पुन्हा नव्या जोमानं कामाला लागल्याचं चित्र आहे. परतीचा पाऊस समाधानकारक झाला आणि जमिनीत ओलावा आहे हे पाहून शेतकरी पेरण्या करतांना दिसून येत आहेत. नुकत्याच झालेल्या हंगामातली सोयाबीन, कपाशी ही पीकं वाचल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
****
नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून परतला आहे, हवामान विभागानं काल ही माहिती दिली. ईशान्य भारतातून सुरु झालेला पावसाचा परतीचा प्रवास काल आठ दिवसानंतर पूर्ण झाला, नैऋत्य मोसमी पावसाची ही आजवरची सर्वात जलद माघार असावी असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात अठरा ऑक्टोबरनंतर ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पीकं सुरक्षित ठेवावीत, दुपारनंतर येणारे वादळी वारे आणि वीजांपासून स्वत:चं संरक्षण करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...