Thursday, 17 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –17 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****

भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सातारा इथं भाजपच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होते. भारतानं गेल्या पाच वर्षांत देशातील सैन्य दलाला जगातील सर्वाधिक सशक्त सैन्यांच्या रांगेत नेऊऩ उभं केलं असल्याचं ते यावेळी म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सैन्याच्या शौर्याबद्दल प्रश्र्न उपस्थित करतात, त्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी याची शिक्षा मिळाली होती यावेळीही त्यांना राज्य तसंच हरयाणातील जनता कठीणात कठीण शिक्षा देईल, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. पेट्रोल, डिझेलमध्ये येणाऱ्या काळात किमान दहा टक्के इथेनॉलचा उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल, असं त्यांनी यावेळी नमुद केलं. एक भारत, श्रेष्ठ भारत निर्माण करण्याची शक्ती भाजपला शिवाजी महाराजांच्या संस्कारातून मिळाली असून भाजपकडे आजवर केवळ शिवाजी महाराजांचे संस्कार होते आता पक्षाकडे त्यांचा संपूर्ण परिवारही आला असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमुद केलं.
****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक स्थिती आणि राज्यातील मुद्दांवरून भाजपचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी त्यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केली आहे. राज्याला आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी आज मुंबईत प्रमुख व्यावसायिक तसंच पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात अऩेक अशा समस्या आहेत की ज्या कृत्रिम आहेत, असंही डॉ. मनमोहनसिंग यावेळी म्हणाले.
****

शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्तापरिवर्तन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यांनी आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि पिंपळगाव इथं प्रचार सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. भाजप- शिवसेनायुतीचं सरकार शेतकरी विरोधी सरकार असून कांद्याची निर्यात बंद केल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली.
****

भाजप सरकारनं कृषी कर्ज माफी चुकीच्या पध्दतीनं केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथं पक्षाचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचार सभेत ते आज बोलत होते. गेल्या पाच वर्षांत राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळं शेती उत्पादन घटल्याचं अजित पवार यांनी यावेळी नमुद केलं. 
****

केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन मोहात पाडत आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जोतिरादित्य शिंदे यानी केली आहे. ते आज नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील बारड इथं भोकर विधानसभा मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभेत बोलत होते. कैलासवासी शंकरराव चव्हाण यांनी धरणं बांधून जमीनी सिंचनाखाली आणल्या तर अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात कारखाने सुरू केले यामुळे नांदेड जिल्ह्याचा कायापालट झाल्याचं ते  यावेळी म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी लातूरमध्ये बार्षी रस्त्यावरही आज प्रचार सभा घेतली. राज्याच्या विविध भागात उद्योग बंद पडत असल्यानं राज्य बेरोजगाराचं केंद्र झालं असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****

भाजप सरकारच्या कार्यकाळातील महागाई, मंदीच्या लाटेमुळे बेरोजगारीचं संकट आलं असून हे सरकार सर्वसामान्य जनतेचे पैसे लुटत असल्याची खरमरित टीका काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केली आहे. ते बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्र्वर पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
****

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेत असताना पंधरा वर्ष राज्याचं मोठं नुकसान केलं असून ते भरून काढण्यासाठी पुन्हा शिवसेना, भाजपच्या महायुतीला विजयी करा, असं आवाहन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते आज धुळे इथं महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
****

कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या पत्नीनं स्वाक्षऱ्या केलेल्या दस्तावेजावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या स्वाक्षऱ्या आढळल्यानं अंमलबजावणी संचालनालयानं त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. अंमलबजावणी संचालनालयानं पटेल यांना उद्या मिर्चीच्या अवैध मालमत्तेच्या तपास प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. मिर्ची हा फरार गुंड दाऊत इब्राहीमचा साथीदार आहे.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...